वेडा

Submitted by उद्दाम हसेन on 18 April, 2013 - 02:04

रडीचा, तुझा डाव, खेळून झाला
तरी का अशांती, असे सांत्वनाला

तुझ्या याच खोड्या, अशा ओळखीच्या
जसा, एक नाठाळ, भेटे तुक्याला

झळा लागल्या ना, तुला सावलीने
उन्हाचा तडाखा, तुझ्या तोतयाला

तुला वाटते मी, ठरो ठार वेडा
किती लाभ सांगू, छबीचा जगाला

नवा मी, जुना तू, तुझा गाव सारा
नव्याने, जुना तोच, इतिहास झाला

जरी तू, कडेलोट, केलास माझा
नवा देह झाला, नव्या जीवनाला

Kiran...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वा रे किरण् वा

सांत्वनाला अशांती >> इथेच इंप्रेस्स करायला सुरुवात केलीस

जसा एक नाठाळ भेटे तुक्याला>>>> शेराचा उत्तम समारोप (तुझी खो दंगे असे वृत्तात बसेल )

तुला झळा -तोतयाला तडाखे !!.....दोघातला फरक सूक्ष्मपणे व अलगद उलगडला आहेस छानच ( आमक्या तमक्याचे घर आपण उन्हात बांधू असे लहान मुलांची समजूत घालताना आपण म्हणतो ते आठवले )

तुला वाटते मी, ठरो ठार वेडा>>>आवडला मिसरा <<वेडे होण्याचे जगात अनेक फायदे असतात अशा काहीश्या आशयाची एक चारोळी आठवली

नवा मी, जुना तू, तुझा गाव सारा
नव्याने, जुना तोच, इतिहास झाला>>>> हे मात्र समजले नाही काहीतरी राहिले आहे शायद Or काहीतरी जास्त झाले आहे

असो

आवडली गझल
नवा देह झाला, नव्या जीवनाला>>> हेही आवडले

वैभु
माझ्यासारख्या नवख्याची गझल इतकी प्रेमाने वाचलीस त्याबद्दल आभार. समजून घेतलीस त्याबद्दल धन्यवाद.
मी प्रयत्न करतो उलगडून सांगण्याचा.

तुझ्या याच खोड्या, अशा ओळखीच्या
जसा, एक नाठाळ, भेटे तुक्याला >>

तुला कळालाच आहे शेर. अवघड नाहीच काही. नायकाला संत (किंवा बावळट) समजून त्रास देणारे काही लोक असतात. त्यांच्या या खोड्या त्याला चांगल्याच ठाऊक आहेत. पण त्याच्या शांतपणाचं रहस्य सांगताना संतांचं दुसरं रूप देखील तो त्यांना सुचवतोय

नाठाळाचे माथी देऊया काठी - तुका म्हणे Happy

झळा लागल्या ना, तुला सावलीने
उन्हाचा तडाखा, तुझ्या तोतयाला >>>

आधी हा शेर तू सुचवला तसाच लिहीला होता. पण रियादेवींनी वुपूत सुचवल्याप्रमाणे बदल केला. या २० एप्रिलला एका ननायकाची जयंती आहे. अ‍ॅडॉल्फ हिटलर त्याचं नाव. त्याने जे काही केलं त्याचे परिणाम (शेवट सोडला तर) आयुष्यभर त्याला भोगावे लागले नाहीत. त्याचे अनेक डमी (तोतये) होतात असे म्हणतात. सेव्हन्थ सीक्रेट या आयर्विंग वॉलेसच्या कादंबरीत तर हिटलरच्या बंकर मधे सापडलेले प्रेत त्याचे नव्हतेच असा प्लॉट आहे. तसा प्रवादही आहे. डिस्कव्हरी वर एक फिल्म आली होती मध्यंतरी. या तोतयांनी त्याचे गुन्हे स्वतःवर घेतले आणि स्वतःचा बळी दिला.

उन्हाचे तडाखे त्यांना बसले पण या ननायकावर त्यांनी सावलीच धरली. हे सद्दाम हुसेनला लागू होतं. अनेकांना लागू होतं. आणि निरनिराळ्या छटा लक्षात घेतल्या तर अनेक ठिकाणी लागू होतं.

नवा मी, जुना तू, तुझा गाव सारा
नव्याने, जुना तोच, इतिहास झाला

नायक त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या गावात (क्षेत्रात म्हणूयात) नवा आहे. कधीतरी तो प्रतिस्पर्धीही नवा असेल तेव्हां असंच कुणाचं तरी नाव असेल, सारा गाव त्याच्या शब्दात असेल. तोच जुना इतिहास आताही नव्याने लिहीला जात आहे असं त्याला म्हणायचंय.

हिस्टरी रिपीटस अगेन असं एक आंग्ल वचन आहे.

धन्यवाद वैभु
खुलासा करायची संधी दिल्याबद्दल.

नवा मी, जुना तू, तुझा गाव सारा
नव्याने, जुना तोच, इतिहास झाला

नायक त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या गावात (क्षेत्रात म्हणूयात) नवा आहे. कधीतरी तो प्रतिस्पर्धीही नवा असेल तेव्हां असंच कुणाचं तरी नाव असेल, सारा गाव त्याच्या शब्दात असेल. तोच जुना इतिहास आताही नव्याने लिहीला जात आहे असं त्याला म्हणायचंय.

सुंदर... अप्रतिम.... पोहोचले