खरेच मी फारसा कुठे येत जात नाही!

Submitted by कर्दनकाळ on 16 April, 2013 - 12:01

खरेच मी फारसा कुठे येत जात नाही!
अलीकडे मैफिलीत मी फार गात नाही!!

कुठून आणू तमा तुला मी प्रकाश वेड्या?
असाच कंदील एक मी, ज्यात वात नाही!

जनावरेही बरी, अशी माणसे अघोरी.....
खरेच माणूसकी अता माणसात नाही!

असेलही सत्य तू मला सांगतोस ते, पण;
अजून माझ्या तरी तसे वाचनात नाही!

तमाम नकली खडेच मखरात बैसलेले....
खरा हिरा, तोच नेमका कोंदणात नाही!

सुने सुने घर उठे मला खायला, गिळाया!
मुलेच झाली विभक्त, घरपण घरात नाही!!

तुझ्यासवे मी उन्हात सुद्धा मजेत होतो!
तुझ्याविना मौज आज या चांदण्यात नाही!!

भले किती पावसावरी तो लिहील गझला....
अजून भिजला कधीच तो पावसात नाही!

कितीक वेळा करेल तडजोड तो तुझ्याशी?
खरेच आहे, करू नये जे मनात नाही!

अजूनही स्वप्न पाहतो चंद्रचांदण्याचे!
अजून मी पाहिली कधी चांदरात नाही!!

**************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिलकधारी आला आहे.

असेलही सत्य तू मला सांगतोस ते, पण;
अजून माझ्या तरी तसे वाचनात नाही!

भले किती पावसावरी तो लिहील गझला....
अजून भिजला कधीच तो पावसात नाही!

कितीक वेळा करेल तडजोड तो तुझ्याशी?
खरेच आहे, करू नये जे मनात नाही!

वा वा वा! टक्करके शेर! बधाई हो मियाँ!

काय रे कर्दनकाळा, तूही रोज गझला करतोस का?

मतला असंबद्ध आहे. जनावरे हा शेर डांबरी रोडसारखा सपाट आहे.

कर्दनकाळा, तुझ्यात वीज आहे.

तिलकधारी निघत आहे.

वीज आहे.>>> आहेच मुळी

तुम्हाला माहीत नाही काय तिलकधारीजी ; भट साहेब यांच्याबाबतच तर म्हणाले होते

<<< विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही

हेच ते / तेच हे .......कर्दनकाळ जी !!!

धन्यवाद तिलकधारीजी गौरवोद्गाराबद्दल व परखड मतांबद्दल!

काय रे कर्दनकाळा, तूही रोज गझला करतोस का?

कार्पोरेशनचे पाणी आले की, आम्हाला पाणी भरावेच लागते!

मतला असंबद्ध आहे कसा ते वदाल काय?
सुसंबद्ध मतला द्याल काय, शक्यतोवर उला मिसरा कायम ठेऊन?अधिक सशक्त वाटल्यास आम्ही दोन्ही मतले ही गझल पेश करताना आपल्या नावासकट पेश करू!
तूर्तास मैफिलीवरून आमचा एक प्राचीन शेर आठवला तो देतो म्हणजे वरील मतल्याबाबत आपले मत बदलावे, किंवा वरील मतल्यातील सु/असंबद्धता आपल्या लक्षात यावी.......

तू कधी होतेस जेव्हा गुणगुणाया ओठ माझे.....
बोलका एकांत होतो! मौनही मैफील होते!

जनावरे हा शेर डांबरी रोडसारखा सपाट आहे. <<<<<<<<कसे काय?
माणसात नाही चा असपाट( उत्तुंग)/ खाचखळग्यांचा शेर द्याल काय? आवडला तर तो देखिल आमच्या सादरीकरणात सन्मानपूर्वक सामावून घेऊ!

............इति कर्दनकाळ

व्वा.
सुरेख गझल…

कुठून आणू तमा तुला मी प्रकाश वेड्या?
असाच कंदील एक मी, ज्यात वात नाही!

असेलही सत्य तू मला सांगतोस ते, पण;
अजून माझ्या तरी तसे वाचनात नाही!

भले किती पावसावरी तो लिहील गझला....
अजून भिजला कधीच तो पावसात नाही!

कितीक वेळा करेल तडजोड तो तुझ्याशी?
खरेच आहे, करू नये जे मनात नाही!

आवडले.

तुझ्यासवे मी उन्हात सुद्धा मजेत होतो!
तुझ्याविना मौज आज या चांदण्यात नाही!!

>> विशेष आवडलं!

पूर्ण गझल छान आहे. आवडली!