" ले का ची आ ई "

Submitted by अनुराधा म्हापणकर on 14 April, 2013 - 01:48

' लेकीची आई ' वाचून बऱ्याच ' लेकीच्या आयां ' नी प्रतिसाद दिला आणि ' लेकाच्या आया ' मात्र हिरमुसल्या . एक लेकाची आई तडकलीच फोनवर . ' काय गं ? लेकीचंच कवतिक ! मुलाच्या आईपणाच्या काही भावनाच नसतात की काय ?' मी हसत म्हटलं , ' नाही गं , पण मुलाच्या आईच्या भावना , लेकीच्या आईपेक्षा वेगळ्या !' ती फुरफुरली , ' मग लिही ! तुलाही मुलगा आहेच की !' नवा भुंगा तिने लावून दिला आणि माझ्यातली ' लेकाची आई ' विचार करत राहिली .

' इट्स अ बेबी बॉय ' असं डॉक्टर सांगतात तेव्हा त्या नवजात आईला काय वाटतं ? ' मुलगा ' या गर्भलिंगाचे कौतुक करणाऱ्या समाजातील बहुतेकांसारखी तत्क्षणी त्या आईलाही ती आपल्या जीवनाची इतिपूर्णता वाटते ? शब्दशः तस्संच नसेल पण , ' चला सुटलो ! मुलगाच हवा होता , म्हणून नाही . पण निदान ' मुलगा - मुलगा ' करणाऱ्या या रूढीभ्रष्ट समाजात आपणही ' मुलगा ' जन्माला घालून एकदा आपलं आणि घराण्याचं कल्याण करून घेतलं ' हा सुटकेचा निःश्वास ' लेकाची आई ' सोडत असावीच ! त्यावेळी ' मुलगा झाला ' म्हणून शेफारून जाण्याची भावना तिच्या मनात कधीच नसते . असेल ते स्वीकारण्यासाठी तिचं मातृत्व नेहमीच उत्सुक असतं . तरीही मुलाच्या जन्मानंतरच्या त्या सुटकेच्या श्वासाचा अर्थ मात्र कधी कधी तिचा तिलाच लावता येत नाही .

मुलगा मोठा होत असतो तेव्हा , ' मुलग्या ' चं कौतुक जपणारी माणसं आजूबाजूला , काही आपल्याच घरात आहेत , याचं प्रत्यंतर तिला येत असतं . ती मात्र त्याचा पुरुषी अहंकार जोपासण्यापेक्षा , तिचं आईपण जास्त जपत असते . मुलाचं बालपण हे तिच्या अपेक्षेपेक्षा फारच विस्तृत असतं . त्याची मस्ती , अतिउत्साह , न थकणारी एनर्जी लेव्हल हे सारंच तिच्या स्त्रीसुलभ आकलनशक्तीबाहेरचं असतं .

पहिलं वर्ष पूर्ण होण्याआधी चालता आलं , तरी बाराव्या वर्षापर्यंत त्याला जमिनीवर चार पावलं सरळ म्हणून टाकता येत नाहीत . एक तर उड्या मारत चालायचं किंवा अंगात वारं आल्यासारखं धावायचं . जमिनीला पाय न लावता , सोफ्यावरून खुर्चीवर , खुर्चीवरून टेबलावर , टेबलावरून बेड ... आपण माकडाचे वंशज आहोत हे सिद्ध करण्याचा खटाटोप ! मोबाइल , पुस्तक , पेन - पेन्सिल - हातातली कुठलीही वस्तू बॉलच असल्यासारखं सतत हवेत उडवत राहायचं . आपला दहा बाय बाराचा हॉल जणू वानखेडे स्टेडियम आहे , असे शॉट्स मारायचे . टीव्हीवरच्या अंपायरचं किंवा बॅट्समॅनचं एखाद्या बॉलवरून लक्ष विचलित होऊ शकतं , पण यांचं नाही . ' बॉल टू बॉल ' मॅच पाहिली नाही , तर पुढल्या मॅचमध्ये घेणार नाहीत , असं ! क्रिकेटचा गंध नसला , तरी त्याच्यासाठी बॉलर व्हायचं , बॅट पकडायची . त्याने ' हाउझ्दॅट ' म्हटलं की , बोट वर करून अंपायरही व्हायचं , हे तिचं नेहमीचंच . दुसरी आवड गाड्या ! मार्केटमधली नवी गाडी रस्त्यावर धावण्याआधी तिचे स्पेअरपार्टस आपणच बनवल्याच्या थाटात त्या गाडीबद्दलचं ज्ञान पाजळायचं . बीएमडब्लू ... ऑडी क्यू७ ... रॅन्गरोव्हर ... गाड्यांची नावं अशी तोंडावर की , आपल्या गेल्या सात पिढ्या परदेशी गाड्यांतूनच फिरताहेत . आणि स्टॅमिना आणि एनर्जी लेव्हलबद्दल तर काय बोला ? ही एनर्जी येते कुठून ? अगदी ' बाळ ' वयातही दिसेल ते ओढलंच पाहिजे आणि ते काचेचे असेल तर फोडलंच पाहिजे हा अलिहिता नियम ! तिला रुची नसलेले हे क्रिकेट , गाड्या , गेम्ससारखे विषय , बाबांकडे वेळ नसल्याने तिला भंडावून सोडणारे प्रश्न , त्यावर योग्य उत्तर देता येत नाही म्हणून तिची झालेली चिडचिड , हे रोजचंच !

तरीही दोघांचं नातं फार भावनेने घट्ट बांधलेलं . मुलाचं ' आई ' म्हणत तिच्या सतत गळ्यात पडणं , आणि ' माझं पिल्लू ' म्हणत तिने त्याचे मुके घेणं याला काळवेळेचं बंधन नसतं .. बाबांचा मूड पाहत सावधपणे बाबांच्या गळ्यात पडणारा मुलगा , आईला मात्र कधीही ' मम्माज बॉय ' होऊन बिलगत असतो . त्याचं ' मम्माज बॉय ' असणं आईलाही सुखावत असतं !

या ' मम्माज बॉय ' ला मिसरूड फुटू लागतं , तसं मम्माशी अंतरही वाढू लागतं . आईची जागा मित्र घेऊ लागतात . घरी आवडीची पुरणपोळी वाट पाहत असताना मित्रांबरोबरचा पिझ्झा त्याला आवडू लागतो . त्याचं घराबाहेर रमणं वाढलं की , तिची घालमेल वाढते . वाढत्या वयानुसार कित्येक गोष्टी त्याला समजावयाच्या असतात . ' त्याच्याशी बोला , त्याला विश्वासात घेऊन ,' म्हणून नवऱ्याच्या मागे ती भुणभुणतही राहते . पण आपली उत्तरं त्याने घराबाहेर , बऱ्याचदा मित्रांतच शोधली असतात . त्याच्यातल्या शारीरिक , मानसिक बदलाने तिच्यातली ' आई ' अस्वस्थ होत राहते . त्याला वाईट संगत तर नसेल ना लागली ? तो कुठल्या मुलीशी टारगटपणे तर नसेल ना वागत ? त्याच्या तोंडाला दारूचा वास आला का ? यायला उशीर का बरं झाला ? यांसारखे असंख्य प्रश्न तिला छळत राहतात . खुळ्यागत डिटेक्टिव्हगिरी करत ती त्याचे खिसे - बॅगही तपासत राहते . काही मिळालं नाही की , तात्पुरते निःश्वासही सोडते . ही अस्वस्थता शिगेला पोहोचेपर्यंत तो करिअरमध्ये मार्गी लागतो .

मग तिला ' दोनाचे चार ' करायची घाई होते . वधुपक्ष , वरपक्ष वगैरे न मानणारी आधुनिक ' आई ' लग्नादिवशी मात्र ' वरमाय ' म्हणून जमिनीच्या वर दोन इंच चालू लागते . नंतर बायकोच्या मागेपुढे करणाऱ्या आपल्या पिल्लाला पाहून किंचित दुखरीही होते . कितीही विरक्ती आणली , तरी सूनेच्या हाती संसार सोपवणं सोप्पं , पण आपला मुलगा सोपवणं कर्मकठीण वाटतं तिला ! पण तशातही ' आई गं , आज तुझ्या हातचेच कांदेपोहे खावेसे वाटताहेत ' असं त्याने म्हणायचा अवकाश की , तिला हत्तीचं बळ येतं . काळ पुढे जातो ... आणि एक दिवस ती आजी होते . संसारातून सुटू , सुटू म्हणताना नकळत कधी नातवंडात रमते , ते तिलाही समजत नाही . निश्चिंतपणे ऑफिसला गेलेल्या लेकासुनेच्या बाळाला नाचणीचं सत्व पाजत , ते लडिवाळ मुख मायेच्या पदराने पुसणाऱ्या ' लेकाच्या आई ' ची जबाबदारी खरंतर आयुष्यभर संपत नाही .

वाटलं , ' मुलाची आई ' असणं कदाचित थोडं कठीण , गुंतागुंतीचं . पण म्हणूनच ते ' गुंतणं ' सहजासहजी सोडवत नसावं . हं ! कदाचित माझं मलाच मी रिवाइंड करून , पुन्हा फास्ट फॉरवर्ड केले होते की काय ? दारावर बेल वाजत राहिली . मी तंद्रीतून जागी झाले . दार उघडलं , वा ! रावसाहेब आज पुन्हा पडून आले आहेत . कोपरं फुटलेली ... ढोपरांना चिखलमाती ... दरवाजा उघडताना चढलेला माझा पारा तेवढ्याच वेगाने खाली आला . मातीचिखलाची पर्वा न करता त्याला घट्ट छातीशी कवटाळलं , म्हटलं , ' कसा रे पडलास राजा ?' माझ्या गळ्यात हात टाकत तो खुळा ' मम्माज बॉय ' म्हणतो कसा , ' काही नाही गं मम्मा , कॅच घेताना पडलो ... पण क्काय कॅच पकडलाय माहितेय ! विराट कोहलीसारखा !' आणि त्याच्या निर्व्याज हसण्यात पुन्हा गुंतून पडले , नेहमीसारखीच !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19534332.cms
महाराष्ट्र टाईम्स : शेवटचं पान १४ एप्रिल २०१३

-अनुराधा म्हापणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पण निदान ' मुलगा - मुलगा ' करणाऱ्या या रूढीभ्रष्ट समाजात आपणही ' मुलगा ' जन्माला घालून एकदा आपलं आणि घराण्याचं कल्याण करून घेतलं ' हा सुटकेचा निःश्वास ' लेकाची आई ' सोडत असावीच<<>>
हे एक वाक्य सोडल्यास लेख मस्तं जमलाय.
मला मुलगाच आहे. पण अगदी नक्की आठवतय (आणि आता आतापर्यंत डॉक्टर आठवण काढत असत). ... आमच्या पात्राला एकीकडे घेऊन स्वच्छं-बिच्छं करेपर्यंत मी एकाच प्रश्नाचा धोशा लावला होता... सगळं ठीक आहे ना...
तेव्हाच असिस्टंट डोक्टरने आश्चर्यानं विचारलं होतं... काय झालं नाही विचारलत ते?
आणि मी भयंकर भडकले होते अगदी त्या वेळीही.. जवळ जवळ हिस्टेरिक.

तेव्हा.. इतर मुलांच्या मातांचं माहीत नाही. जन्मवेळी आणि नंतरही सगळं व्य्वस्थित आहे... मूल निरोगी आहे ह्या एका आणि एकाच गोष्टीसाठी 'माझा निश्वास' होता.

पुढे अनेक मार्गांनी त्याचं "मुलगा"पण जपलं गेलं. कधी आजूबाजूच्यांकडून तर कधी माझ्याकडूनही. अन त्या मार्गातले सगळे अनुभव अगदी अगदी सुरेख टिपलेत, अनुराधा.

आईपणाची भावना एकच असते... "आईपणाची". ती मुलीसाठी-मुलासाठी तितकीच सखोल अन पूर्णही. मुलगा अन मुलगी ह्यांच्याशी आईचं "आईपण" वेगळं नसतं... त्यांच्याबरोबरचा भौतिक प्रवास वेगवेगळी मात्र वळणं घेतो. अन ती ह्या अन आधीच्या लेखात अगदी हुबेहुब उतरलीत.
(असो... ते एक वाक्य खटकलं मात्र.)

छान लेख !
दाद >> +१
मलाही मुलगा झाला तेव्हा, डॉक्टरांनी बाळाला मला दाखवले , बाळ normal आहे ना ?.. काही health issues नाही ना एवढ्च मी विचारल.. नंतर जवळपास १०-१५ मिं. नी , डॉक्टरांना मी विचारल मुलगा झाला आहे की मुलगी.. डॉक्टरां सकट तिथे असलेल्या सगळ्या नर्स माझ्या ह्या प्रशनावर मस्त हसले Happy त्यांच्या नजरेत हा माझा वेंधळेपणा होता Uhoh .. पण माझ्यासाठी गौण मुद्दा होता Happy

आईपणाची भावना एकच असते... "आईपणाची". ती मुलीसाठी-मुलासाठी तितकीच सखोल अन पूर्णही. मुलगा अन मुलगी ह्यांच्याशी आईचं "आईपण" वेगळं नसतं...
<<<<<<<<
प्रचंड अनुमोदन

लेख आवडला Happy

दाद, स्मित, चला म्हणजे मी एकटी नाही तर! माझंही असच झालं होतं. तर डॉक्टरांनी विचारलं,"दुसरीकडे सोनोग्राफी करून लिंग निदान केलं होतं ़का? " Sad सगळं नॉर्मल असण हेच महत्वाचं होतं माझ्यासाठी!
लेख आवडला. माझ्या मुलाची मस्ती बघून आई बाबा अवाक व्हायचे आणि माझ्या सासूबाई " त्याच्या बाबा आणि काका पेक्षा शांत (?) आहे हो हा!" असं म्ह्ह्णायच्या.

आईपणाची भावना एकच असते... "आईपणाची". ती मुलीसाठी-मुलासाठी तितकीच सखोल अन पूर्णही. मुलगा अन मुलगी ह्यांच्याशी आईचं "आईपण" वेगळं नसतं...
<<<<<<<<
प्रचंड अनुमोदन >>>> बरोबर! बोल नावाचा एक 'पाकिस्तानी' सिनेमा होता, मुलगा पूर्ण पुरुष नसतो. पण म्हणून आई-बहिणीची त्याच्या बद्दलची माया काही कमी नसते.
लेकीची आई ह्या लेखाची गरज होती कारण काही अंशी समाजात आजही लेकीची आई असणे हे 'तापदायक' मानले जाते. त्यातील आनंद उलगडून सांगणे गरजेचे. 'लेकाची आई' ही सुद्धा जबाबदारी आहे, प्रेम आहे इ इ पण तरी ह्या विषयाचे फारसे 'अपील' वाटले नाही. (अर्थात हा लेख ही ठीकच आहे कारण वाचणार्या एका जरी पुरुषाला आपली आई काय काय स्थित्यंतरातून गेली हे समजले तरी हा लेख सुफल.)

<<पण निदान ' मुलगा - मुलगा ' करणाऱ्या या रूढीभ्रष्ट समाजात आपणही ' मुलगा ' जन्माला घालून एकदा आपलं आणि घराण्याचं कल्याण करून घेतलं ' हा सुटकेचा निःश्वास ' लेकाची आई ' सोडत असावीच<<>>

हे वाक्य खटकण्यासारखेच आहे... पण असे विचार करणारी स्त्री अस्तित्वात आहे, हे नाकारता नाही ना येत..

अहो किती छान!
मलाही एकच मुलगा. तो आता घोडा झालाय. तुमचा लेख वाचत असताना त्याचं आणि माझं मिळुन जे जग होतं ते पुन्हा एकदा रिवाईन्ड झालं. मजा आली. आमच्या दोघांचं घट्टंमुट्टं मैत्र आहे.
लहानपणी मी त्याच्या पाठीवरचं दप्तर काढायचे आणि म्हणायचे, बाई गं किती दमलं पिलू ते..खांदे दुखत असतील ना. बस आणि शांतपणे पाणी पी बरं आधी..
आज उलटं होतं. मी कामावरुन घरी जाते आणि तो जर घरी असेल तर सेम सीन रिपिट होतो. तो माझी बॅग घेतो. मला खुर्चीवर बसवतो आणि पाच मिनिटात चहाचा कप हजर होतो. अशाच आमच्या दोघांच्या खुप खुप गोष्टी आहेत.

<<पण निदान ' मुलगा - मुलगा ' करणाऱ्या या रूढीभ्रष्ट समाजात आपणही ' मुलगा ' जन्माला घालून एकदा आपलं आणि घराण्याचं कल्याण करून घेतलं ' हा सुटकेचा निःश्वास ' लेकाची आई ' सोडत असावीच<<>>
हे एक वाक्य सोडल्यास लेख मस्तं जमलाय.

असतात अशा काही जणी विचित्र वागणार्‍या आणि मुलाचं कौतूक मिरवणार्‍या. माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगते. तिला एकच मुलगी आहे. तिचं सिझेरियन झालं. खुप त्रास झाला होता तिला. दवाखान्यात भेटायला आलेल्या एक बाई तिला म्हणाल्या होत्या, बरं झालं बाई. इतका त्रास सहन करुन मुलगाच झाला ते...
त्या क्षणी संतापाने तिचं बीपी एकदम वाढलं होतं. डॉक्टरांना धावपळ करावी लागली. शेवटी त्यांनी व्हिजिर्टस नॉट अलाऊड चा बोर्ड लावला.
तिचं पण लेकीचं आणि तिचं मस्त जग आहे.

असतात अशा काही जणी विचित्र वागणार्‍या आणि मुलाचं कौतूक मिरवणार्‍या. माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगते. तिला एकच मुलगी आहे. तिचं सिझेरियन झालं. खुप त्रास झाला होता तिला. दवाखान्यात भेटायला आलेल्या एक बाई तिला म्हणाल्या होत्या, बरं झालं बाई. इतका त्रास सहन करुन मुलगाच झाला ते...??????कळले नाहि.

....अपूर्णच प्रतिक्रिया पोस्ट झाली..
त्या बाईंना जेव्हा कळालं, तिला मुलगी झाली ते. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, अगं बाई एवढं सहन करुन मुलगीच झाली...मुलगा तरी व्हायला पाहिेजे होता.

माझ्या दोनीही मुली सिझेरियन(एक ६ व दुसरि ४) पण मला, नवर्याला किंवा माझ्या सासू सासर्यांना याबाबत काहीच खेद वाटत नाही. अगदी गेल्यावर्षी ऑपरेशन करून घेतले मी तेव्हा हि काहीच बोलले नाहीत, पण माझ्या आईने मात्र मला बोलून दाखवले कि निदान एक तरी मुलगा होवू द्यायचा होता .....कपाळ ...तिला समजून सांगितले तेव्हा गप्प झाली. परंतु माझ्या दोन्ही मुली खूप गोड आहेत आणि घरी दारी (माझ्या आईच्या सुद्धा) अगदी लाडक्या आहेत. त्यांना कोणीच रागवत नाहीत उलट मीच कधीतरी रागावते ओरडते. तर कड घेणारे मला धारेवर धरतात.:)

मी म्हटलंय लेखात ..>> त्यावेळी ' मुलगा झाला ' म्हणून शेफारून जाण्याची भावना तिच्या मनात कधीच नसते . असेल ते स्वीकारण्यासाठी तिचं मातृत्व नेहमीच उत्सुक असतं . तरीही मुलाच्या जन्मानंतरच्या त्या सुटकेच्या श्वासाचा अर्थ मात्र कधी कधी तिचा तिलाच लावता येत नाही .<<

लेकाचं काय किंवा लेकीचं काय.. मातृत्व ही भावना मोठी...! पण आपल्या भवतालच्या समाजात अजूनही असा विचार करणारे लोक आहेत.. हे वास्तव !