वृक्षारव

Submitted by अज्ञात on 12 April, 2013 - 00:03

पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा

ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका

कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका

.........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा

आणि
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका

ह्या ओळी खूप आवडल्या.

समजायला बरीच सोपी केलीत त्याबद्दल धन्यवाद

समारोप काफियानुसारी.....म्हणजे यमकानुसारी वाटला त्यामुळे जरा हिरमोड झाला (वैयक्तिक मत)

आपला परका -अपुला परका >>>> असे केलेत तर लयीसाठी अतीशय चपखल बसून अतीशय प्रवाही होईल

चूक भूल द्यावी घ्यावी

आणि हो .....कविता नेहमीप्रमाणेच प्रचंड आवडलेली आहेच हे वेगळे सांगणे न लगे ..होय ना? Happy

कवितेचं नावच खूप आवडलं.
कविताही छान आहे. म्हणजे शब्दरचना आवडली. पण कल्पना नवीन नाही वाटल्या. एक उत्कट झोका सोडून. पण एकूण मस्त.

समजायला बरीच सोपी केलीत त्याबद्दल धन्यवाद Happy
समारोप काफियानुसारी.....म्हणजे यमकानुसारी वाटला त्यामुळे जरा हिरमोड झाला (वैयक्तिक मत)
ह्म्म्म्म्.............. Happy

कवितेचं नावच खूप आवडलं. Happy

आमच्या आवारात एक जांभळाचं झाड आहे. वॉचमनने पानगळीचा पाचोळा गोळा करून तिथेच जाळला. त्यावरून खूप बोलणीपण खाल्ली. झाडाची एक बाजू पूर्णतः करपली होती. परवा लक्षात आलं की त्या जळालेल्या पानांमधून नवी कोवळी पालवी फुटली आहे आणि फुलांचा बहरही उमलेला आहे.

कल्पना नवी आहे की नाही माहित नाही पण ती प्रत्यक्ष घटनेवरून उतरलेली आहे हे महत्वाचे. झाडाचा असा सोशिकपणा त्याचं स्थितप्रज्ञत्व, मी वॉचमनला बोलल्याची मला लाज आणून गेलं आणि एक हलकासा डोस पाजून गेलं, माणूसही असा वागू शकतो ह्याची पुसटशी जाणीव देऊन गेलं. असो.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार Happy

अज्ञात
सुंदर कल्पना!
माझ्याही अंगणात एक करंजीचं झाड होतं. जणु पुराणपुरुष! संपूर्ण अंगणावर सावली देणारा! खूप जुनं झाड
. दोघांच्या दोन्ही हातांच्या मिठीतही मावणार नाही इतका मोठा बुंधा. पण अंगणातल्या फरशीवर आणि गराजच्या अ‍ॅसबेस्टोस शीटवर खूप तेकलट कचरा आणि तेल़कट डाग व्हायला लागले. म्हणून सासर्‍यांनी ते झाड माणसं लावून कापून घेतलं. (माझी मुलं शाळकरी होती तेव्हा. दोघांनीही ........... हे झाड का कापता म्हणून डोळे गाळले होते.) आता एक प्रचंड मोठा बुंधा कुंपणाकडेला शिल्लक राहिला. दोन माणसं बसू शकतील इतका मोठा.
दरम्यान सासरे गेले. हळूहळू या बुंध्याला खूपच पालवी फुटून पुन्हा मोठा वृक्ष होईलसं वाटायला लागलं.
पुन्हा तोडलं पण असं २/३ वेळा झाल्यावर मग मात्र उरलेल्या बुंध्यावर अखेरचं रॉकेल टाकून त्याला आग लावली.
रात्रभर ते जळत राहिलं. पण फायनली ती जागा आता रिकामी झाली .तिथं शोभेची वासाची फुलझाडं आहेत आता.

सुरेख !