घर वृंदावन गोकुळ

Submitted by रसप on 9 April, 2013 - 02:07

घर वृंदावन गोकुळ
घर पवित्रतम देउळ
घर मायेचा पाझर
घर अथांग सागरतळ

दुनियेचा भूलभुलैया
दररोजच शोधा रस्ता
काट्यांची पाउलसोबत
वळणावळणावर खस्ता
घर मिळता मिळता होते
गहिवरली संध्याकाळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

आकाश कुंड अग्नीचे
झळ सोसेना डोळ्यांना
मृगजळ चाळवते तृष्णा
भेगा-चटके पायांना
घर निवांत शीतल छाया
भवताली रणरण माळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

क्षितिजाहुन क्षितिजापाशी
मी शोध घेतला ज्याचा
तो कधी मिळाला नाही
मग ठाव लागला त्याचा
घर माझे आलय त्याचे
हृदयातुन वाजे टाळ
.... घर वृंदावन गोकुळ
.... घर पवित्रतम देउळ

....रसप....
९ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/04/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धृवपदात १३ मात्रा आहेत. बाकी कवितेत १४. काही केल्या मला 'सागरतळ' टाळता/ गाळता/ बदलता येईना. म्हणून ते तसंच ठेवलं. कारण, लयीत आहेच. गोकूळ - देऊळ केलं असतं तर मात्र वृत्तभंग झाला असता ना ?

१३ मात्रा............ कारण मराठीत ओळीचं शेवटचं अक्षर गुरूच मानायचं असतं, हो ना ?

छान कविता..... सहज शब्दात घराचं महत्व स्पष्ट झालंय.

"मराठीत ओळीचं शेवटचं अक्षर गुरूच मानायचं असतं, हो ना ?" >>> हो. बरोबर आहे.
सर्वसाधारणपणे मराठीतील वृत्तबद्ध रचना वाचताना शेवटच्या अक्षराच्या उच्चारणाला २ मात्रांइतका अवधी दिला जातो. त्यामुळे ओळीतील शेवटचे अक्षर गुरु मानले जाते. ही तडजोड नव्हे.
---------------------------------------------------------------------------------------------------
याबाबत काही चर्चा, मतभेद इ. झाले होते.
कृपया खालील लिंक पहावी.
http://www.maayboli.com/node/32787