आमच्या मावशी !

Submitted by यक्ष on 8 April, 2013 - 05:16

आमच्या मावशी....!

वयोमानानुसार रुपेरी केस; मुळच्या गौरवर्णीय; ठेंगणं पण घंदाज रूप; साध्या पातळात - सतत कार्यमग्न असलेली उत्साही मूर्ती!

आम्ही लहान असतांना आमच्या 'पोळ्यावाल्या मावशी'...!!

वडिलांची बदलीची नोकरी. त्यानिमित्ते वडील दुसऱ्या गावी. आईची शिक्षिकेची नोकरी. असल्या धबडग्यात आम्हा चौघा भावंडांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून आईने केलेली व्यवस्था.

सुरुवातीला 'घरात नवीन ' म्हणून "तिच्याकडे मधून मधून लक्ष ठेवत जा" अशी आईची आम्हाला सावधतेची सूचना - ते आई घरी नसतांना - "तुम्ही मुलांकडे लक्ष्य ठेवत जा " अशी आई ची मावशीला विनंती हा प्रवास माझ्या डोळ्यासमोर अजून ताजा आहे!

इथे कॅलिफोर्नियामध्ये 'लेक ताहो' येथील एका इंडिअन हॉटेलमध्ये बसून एक खूप छान गर्मगरम फुगलेला फुलका समोर आल्यावर माझ्या आठवणींचा पट झर्रकन तरळून गेला!

***

घरची मुळची गर्भश्रीमंती. घरी खूप नोकरचाकर. मोठ्ठा दुमजली वाडा. जाणारे येणारे भरपूर व 'मालकांचे' (ईकडच्यांचे !) खास वर्‍हाडी आतिथ्य त्यामुळे घरात लोकंचा राबता - असे त्यांच्या पुर्वेतिहसबद्दल बद्दल नंतर नंतर कळले.

परिस्थितीचे पासे पलटले अन 'मालक' अर्ध्यावरती डाव सोडून गेले!

*****

मग सुरु झाले दुर्देवाचे दशावतार!

चुलत्यांनी घाट घालून आणि गोड बोलून राहत्या वाड्याचा बव्हंशी भाग गिळंकृत केला. व्यवसायात भागीदारांनी कर्जाचा भाग 'ह्यांच्यासाठी' सोडून आपला वाटा गेऊन वेगळे झाले.

एकुलता एक मुलगा - सुरुवातीला लहान म्हणून त्याला कळत नव्हते असे वाटे. परंतु नंतर हळू हळू लक्षात आले की खरच त्याला काहीच 'कळत' नाही !

फक्त घरातील 'पुरुष' म्हणून नावाचा आधार!

त्याने व्यवसाय पूर्ण गाळात घातला. कर्जाचे व्याज चक्रवाढ. चुलत्यांनी हात वर केलेले.

*****

ह्या बाई मोठी हिमतीच्या !

खचून न जाता खंबीरपणे पदर खोचला अन हातात जे कौशल्य होते - मालकांनी ज्याचे खास कौतुक केले होते त्या 'पोळ्याच्या' विश्वात स्वतःचा आधार शोधायला घराबाहेर पडल्या.

श्रीमंतीच्या आठवणी घट्ट मनांतल्या कोपर्यात बंद करून टाकल्या. तक्रारींचे सूर गिळून टाकले.

*****
आमचे धरून आणखी शेजारची चार घरं धरली.
आणि सगळी घरं (आम्ही आमचे भाड्याचे घर १३ वर्षानंतर सोडेस्तोवर) त्यांनी खरोखरच 'धरून' ठेवली.

आमचे शेजार 'घर अंगण'. तिथेच आम्हीही लहानाचे मोठे झालो. आमच्या घरचे ; शेजाऱ्यांचे सगळे सणसमारंभ , घरगुती कार्यक्रम, वितंडवाद, मतभेद ह्या मावशींच्या साक्षीनेच साजरे झाले / सुटत गेले. ह्यांची 'सांभाळून घ्या' ची भूमीका महत्वाची. त्या नकळत घरातल्याच झाल्या.

सगळ्या सासवा " आता तुम्हीच सांगा मावशी सूनबाईला हे शोभतं का ?" - ते - " तुम्हीच सांगा न मावशी आता ह्या अशा का वागतात ?" अशा सासुरवाशीणींच्या तक्रारींना त्या समजावून सांगतांना त्यात एक आपुलकी असायची; मायेची सांगण असायची.

ज्यांचं स्वतःचं घर सांभाळतांना उरस्फोड करावी लागायची त्या मावशींना दुसर्यांच्या घरांचीपण अतीव काळजी होती. त्यात त्यांचा अधिकार पण सर्वमान्य होता. त्यांनी आम्हा मुलांना रागावले तर आमच्या आया मध्ये पडत नसत!

पुढे पुढे तर असे झाले की आमच्या आवडीनिवडी त्यांना पाठ झाल्या. पोळ्यानसोबत सर्व स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा स्वयंपाकही अत्यंत रुचकर. 'आयांची' काळजी व कटकट मिटली. एवढे सगळे त्या उत्साहाने करत. स्वतःचे दुख: आमच्या गोकुळात विसरून जात.

स्वयपाकासोबत कधी कधी आमची घरं पण सांभाळावी लागत. पण तेही अगदी जबाबदारीने पार पाडत.
आई आठवडाभर घरी नसल्यास आमची चमू त्यांच्या घरी सकाळ सायंकाळच्या जेवणासाठी त्यांच्याकडे जात असू. त्या प्रत्येकाच्या आवडीचे काही न काही करीत म्हणून सर्व खुश.

मुख्य म्हणजे माझा मोठा भाऊ आवडी निवडी च्या बाबतीत भयंकर कटकटीचा, दुसरा जमदग्नीच -पण आमची आईही जमदग्नीच्या आईची आई! त्यांचे तुंबळ युद्ध बघत मी शांतपणे जेवायचो. मला सर्वच आवडते म्हणून मी सर्वांस आवडायचो.आईसमोर त्याचे काही चालायचे नाही; पण मावशीकडे महाशय त्याच्या आवडीचे मिळायचे म्हणून 'नो कटकट'.त्याच्यासाठी नेहमी वेगळा पदार्थ तयार असायचा.

एखाद्याचे नशीब आयुष्यभर परीक्षा का पाहत असते हे मला पडलेले कोडे आहे!

बरं ती व्यक्तीही हरिश्चंद्राहून सहनशील असवी?

मावशीचेही तसेच!

देवानी त्यांना पुढेही खूप कोडी घातली.

मोठ्या मुश्कीलिनी सून शोधली आणि मनाविरुद्ध का होईना पण मुलाकडे बघून स्वीकारली.

सून नंतर थोडीशी 'अर्धवट' असल्याचे कळले.

सुनेने सासूचे म्हातारपण करण्याऐवजी सासुच सुनेचे 'बालपण' सांभाळायला लागली. सुनेने दोनदा काय भानगडी केल्या ते कळले नाही पण पोलिसांची ब्याद घरापर्यंत आणली. मावशीने त्यांचे पाय धरून सुनेस सोडवले.

नंतर ती पळून गेली.

मुलगा ठोम्ब्या सारखा 'आता मी काय करू' असा प्रश्नांकित चेहरा घेऊन तयार. अशाही परिस्थितीत मावशिंचे चेहऱ्यावरचे खंबीर स्मितहास्य कायम. दुसऱ्या कोणासमोरही दु:ख पसरवून सहानुभूतीची अपेक्षा नाही की 'आता माझे पुढे काय होणार?' अशी हताशा नाही.

'चालायचंच - परिस्थितीचे भोग - दुसरं काय!' असे म्हणून पुढचे प्रश्न टाळायच्या व 'आज कुठली भाजी?' म्हणून चटकन वर्तमानात आणायच्या.

*****
पुढे आम्ही पुण्यास आलो.

'तुम्ही जाऊ नका नं' अशी विनवणी करत अन डोळ्यातनं अश्रूंचा पूर आलेल्या शेजार्यांच्या नजरा अजून स्मृतीत ताज्या आहेत. १३ वर्षांचा सहवास तुटला.

गावी गेल्यास मावशींची भेट जरूर घ्यायचो.

आमचे घर सुटल्यानंतर मात्र त्या खचल्यासारख्या वाटल्या. त्यांनी बाकीची घरं हळू हळू सोडली. त्या थोड्या एकलकोंड्या झाल्या.

*****

नंतर ३-४ वर्षांच्या कालावधीनंतर भेटायला गेल्यावर चरकलोच. त्या अगदी तोळामासा झाल्या होत्या. अगदी अशक्त झाल्या होत्या.

तरी आम्हला बघताच त्यांचा चेहरा उजळला! झेपत नसताना आम्हांस काहीतरी खाण्यास करण्यासाठी उठल्या....धडपडल्या!!

आईने दिलेला आधाराचा हात बाजूस करून पुन्हा जोर करून उठल्याच !

त्याचं घर आता भकास वाटत होतं. एक अवकळा आली होती. त्या व त्यांचा मुलगा. दोघेही 'एकटेच'. मन कळवळलं. बर्याच गप्पा झाल्यानंतर पुण्यास परतणे भाग होते. त्यंच्या नकळत मुलाच्या हातात मदत ठेवली अन निघालो. मावशींच्या डोळ्यातील पाणी बघून जडपणे काढता पाय घेतला!

पुढे पुढे जाणे जवळ्पास थांबले.

****

'कालाय तस्मये नमः ' प्रमाणे काही दिवसांनतर मावशींच्या निधनाची बातमी मिळाली अन मन ओलावलं!

****
हातातला घास थोडासा खारावला. डोळ्यातले थेंब अन मनात आलेले आठवणींचे कढ मोठ्या कष्टाने परत फिरवले अन पुन्हा अमेरिकन वातावरणात स्वतःला गुंतवून घेतले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून लिहिलेले, मनाला भिडले,
आपल्या "डोळ्यातले थेंब अन आठवणींचे कढ" यांचा ओलावा आणि धग पोचली.... धन्यवाद!

मनापासून लिहिलेले, मनाला भिडले,
आपल्या "डोळ्यातले थेंब अन आठवणींचे कढ" यांचा ओलावा आणि धग पोचली.... धन्यवाद! >>>+१००..

खुप छान लिहिले आहे. खरंच जगात रक्ताचे नाते नसलेलेही आपले कधी होउन जातात ते कळत ही नाही. तुमची जशी मावशी... तशी आमची एक सातार्‍याला आजी होती. तिची खुप आठवण झाली. घरकाम करायला आली पण आमची आजी झाली. खुप प्रेमळ..... इतक्या वर्षांनी तुमच्या या मावशीबद्द्लच्या लिखाणाने तिची खुप आठवण झाली.

यक्ष,

तुमच्या मावशी अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. माझ्याही ओळखीच्या एक मावशी आहेत. त्यांचा आणि आमचा संबंध फक्त ३ आठवडे आला. माझ्या लग्नाच्या वेळेस स्वयंपाकाला ठेवल्या होत्या. रोज बोरीवलीहून वडाळ्याला यायच्या. सकाळी ७ वा. लवकर येऊन चहानाश्त्यापासून संध्याकाळचा स्वयंपाक पुरा होईपर्यंत ७ वाजेपर्यंत आमच्या घरी असायच्या.

त्यांचं घरचं सगळं चांगलं होतं. पण वेळ जात नाही म्हणून लग्नाच्या हंगामात तात्पुरती कामं करायच्या. स्वयंपाक अगदी चोख असायचा. शिवाय कुठेही उधळमाधळ नाही. शेवटी मला चांदीची वाटीही भेट दिली लग्नानिमित्त. म्हंटलं किती पैसे सुटणार तुम्हाला, तर म्हणाल्या की मला लोकांना जेऊ घालायला आवडतं.

अशी सेवाभावी माणसं आताशा दुर्मिळ होत चाललीत! Sad

आ.न.,
-गा.पै.

तुमच्या आमच्या आयुष्यातलं, आतलं... अगदी सहजभाव तरीही उत्कट... अन म्हणूनच अगदी भिडलेलं.
सुरेख लिहिलय, यक्ष.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
ईश्वर ह्या भावना मावशि पर्यंत पोहोचवो ही प्रार्थना!
-यक्ष