एक पारवा घुमतो

Submitted by उद्दाम हसेन on 7 April, 2013 - 04:05

एक पारवा घुमतो, माझ्या मनाच्या आडात
लखलखत्या विजांचे, लोळ निळ्या आभाळात || धृ ||

जेव्हां आल्या टोळधाडी, माझ्य़ा हिरव्या रानात
पीक बघता बघता
गेले उडून वा-यात
घट्ट रूजलेय मूळ, काळ्या मातीत मातीत | १ |

एक पारवा घुमतो, माझ्या मनाच्या आडात
लखलखत्या विजांचे, लोळ निळ्या आभाळात

त्याला थोपवावे कसे, ज्याची भरारी अनंत
किती भरावी उड्डाणे
त्याच्या इवल्या पंखांत
कसा सांभाळू मी दात्या, तुझी, ठेव अंगणात | २ |

एक पारवा घुमतो, माझ्या मनाच्या आडात
लखलखत्या विजांचे, लोळ निळ्या आभाळात

पिसं त्यागूनि हिरवी, गाते पाखरू निवांत
सांज निळाईची शीळ
येता आठवे एकांत
सोनचाफ्याच्या रंगात, रंगे सारा आसमंत | ३ |

एक पारवा घुमतो, माझ्या मनाच्या आडात
लखलखत्या विजांचे, लोळ निळ्या आभाळात

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक पारवा घुमतो
माझ्या मनाच्या आडात
लखलखत्या विजांचे
लोळ निळ्या आभाळात

एक पारवा घुमतो
माझ्या मनाच्या आडात..

जेव्हां आल्या टोळधाडी
माझ्य़ा हिरव्या रानात
पीक बघता बघता
गेले उडून वा-यात
घट्ट रूजलेय मूळ
इथे मातीत मातीत

एक पारवा घुमतो
माझ्या मनाच्या आडात..

त्याला थोपवावे कसे
ज्याची भरारी अनंत
किती उड्डाणे भरावी
माझ्या इवल्या पंखांत
कसा सांभाळू मी दात्या
तुझी, ठेव अंगणात

एक पारवा घुमतो
माझ्या मनाच्या आडात..

पिसं त्यागून हिरवी
गाते पाखरू निवांत
सांज निळाईची शीळ
येता आठवे एकांत
सोनचाफ्याच्या रंगात
रंगे सारा आसमंत

एक पारवा घुमतो
माझ्या मनाच्या आडात..

मस्त कविता किरण.... ठळक केलेले बदल केल्यास एक निर्दोष अष्टाक्षरी होवून मस्त लय येईल.

शुभेच्छा.

धन्यवाद डॉक

बदल स्वागतार्ह आणि प्रभावी आहेत. तुम्ही सुचवलेलुआ बदलांसहीत सुंदर चाल तयार होत असल्याने ते मूळ काव्यात समाविष्ट केले आहेत. परवानगीची गरज नाही असे गृहीत धरले आहे. पुन्हा आभार.

>>त्याला थोपवावे कसे, ज्याची भरारी अनंत
किती भरावी उड्डाणे
त्याच्या इवल्या पंखांत
कसा सांभाळू मी दात्या, तुझी, ठेव अंगणात >>
सुंदर.ही भरारी थोपवू नकाच.लेखन शुभेच्छा.

आपणा सर्वांनी लोभ ठेवल्याबद्दल काय म्हणू ?
सर्वांचे मनापासून आभार Happy

मस्त कविता,
>>त्याला थोपवावे कसे, ज्याची भरारी अनंत
किती भरावी उड्डाणे
त्याच्या इवल्या पंखांत
कसा सांभाळू मी दात्या, तुझी, ठेव अंगणात >>
सुंदर.ही भरारी थोपवू नकाच.लेखन शुभेच्छा.>>>> शतप्रतिशत अनुमोदन....