आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे....

Submitted by मुग्धमानसी on 5 April, 2013 - 07:17

आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे,
माझं वागणं बोलणं काहीच समजत नाही म्हणे...

येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्‍यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...

हजार शब्द सल्ल्यांचे अन् हजार समजुतीचे
ओतत राहतात ते, तरी मी भरत नाही म्हणे...

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...

नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...

तुझेच हसणे, असणे-नसणे, स्वतःत हरवून बसणे,
दुःख अताशा तुझ्या स्मृतींना बधत नाही म्हणे...

वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्‍यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...
>> व्वा!!

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
>> क्या बात!

वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
> कैतरी गडबड वाटली मला.. किंवा मला अर्थ लागला नाही..

तरिच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...
>> सुरेख!

शुले तपासाल का?

शुले म्हणजे शुद्धलेखन का? कुठे कुठे गडबडले आहे सांगाल का?

"वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा" -या ओळीतून 'आयुष्याला कुठलेही ध्येय न उरणे' असे सूचित करायचे होते मला.

हो ग शुले म्हणजे शुद्धलेखनच!
कविता नेहमी प्रमाणेच आहाहा!

Happy

वा ! मस्तच !
>>>वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरिच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे... <<< क्या बात है |

खूप छान आहे कविता...
"नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे... " क्या बात है!!!
ही ओळ खूप आवडली....

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे... - सही

नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे... - मस्त

वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे... सुपर

एकदम छान आहे कविता

मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन अप्रतिम कविता आलीय म्हणे..! >> +१ Happy

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...

नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...

हे जास्त आवडले!

धन्यवाद!

मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन अप्रतिम कविता आलीय म्हणे..! >>> ईश्य कैतरिच!!! Happy

अप्रतिम सुंदर आहे कविता!! Happy

<<वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...<< खुप आवडलं.