नाते... नवे-जुने

Submitted by अ. अ. जोशी on 3 April, 2013 - 02:46

समजत नव्हते, लिहीत होतो
कविता काही करीत होतो
स्वतःस वा.. वा! करण्यामध्ये
समाधान मी मानत होतो

तुला पाहिले पुन्हा एकदा
मनात काही भरून आले
बालपणीच्या आठवणींनी
मोकळेच मन विचलित झाले

सैरभैर मन धावत होते
इकडे तिकडे पहात होते
तुझा चेहरा समोर दिसता
कचकन जागी थांबत होते

तिथे अचानक सुचे कुठुनशी
ओळ एक जी तरणीताठी
शब्द जिचा आलेला आधी
अर्थ वाहिला पाठीपाठी

गंध जिचा वेडावुन जातो
प्रीत कळी ती उमलत होती
नव्हते फार घडत उलटेही
तरी मनाला शंका होती

मात्र तुझ्या त्या आठवणींनी
पिसाटलो मी, वेडा झालो
कारण नसतानाही गावी
तुला शोधण्यासाठी गेलो

पण देवाच्या मनात काही
आले होते काय वाकडे...
दोघेही भेटण्यास उत्सुक
मी तिकडे, तेंव्हा तू इकडे

बोलणी जशी झाली होती
मोठ्यांमोठ्यांमधली नंतर
कळले; नक्की झाले होते..
तुझ्या नि माझ्यामधले अंतर

मोठ्यांमधली चर्चा मोठी
कानी पडली चुकून जेंव्हा...
त्यांची मान कुठे न झुकावी
मनात माझ्या ठरले तेंव्हा

बोलविले होतेस मला तू
'होय' म्हणालो; आलो नव्हतो...
घालमेल जी मनात होती
तेंव्हा सांगू शकलो नव्हतो...

नवीन नात्यासाठी अपुल्या
जरी कितीही मी आसुसलो...
ज्यांनी सांभाळले मला, ते -
जुने जास्त मी मानत होतो....

- अ. अ. जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बोलविले होतेस मला तू
'होय' म्हणालो; आलो नव्हतो...
घालमेल जी मनात होती
तेंव्हा सांगू शकलो नव्हतो..." >>> .... छान