अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३

Submitted by . on 2 April, 2013 - 22:46

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३ भाग १

मागच्या वर्षी मे महिन्यात "AAMS वार्तापत्र" अशी मासीची(मराठी असोसियेशन सिड्नी इंक.) एक मेल आली त्यातून कळल अस काही संमेलन असत. त्यानंतर मायबोली वर एक धागा वाचला २०१२ मधे "अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३" , मनात म्हणल आपण आपल वाचनाच काम करू. मग लोगो ठरल्याच आणि चंबू ने डिज़ाइन केल्याच वाचल, फावल्या वेळात मग संमेलनाच्या वेबसाइट वर चक्कर मारणे चालू होतेच. त्यातून आमच्या लिवरपूल मधे संमेलन होणार हे कळले कशाच काय माहीत पण कस छान छान वाटल.aams_logo.png
मग प्रशांत दामले, मुक्ता बर्वे , स्वप्निल बांदोडकर येणार हे अपडेट्स कळले. पण मी या सगळ्यापासून दूरच होते काहीशी अलिप्त...

मग जानेवारी मधे कधी तरी नवर्‍याने २-३ कार्यक्रमात भाग घेतला आणि प्रत्यक्ष रणभुमी वरुन माहिती कानावर येऊ लागली. अमुक तमुक या कमिटीत आहेत. सिड्नी च्या एरिया वाइज़ कार्यक्रम विभागले जाणार आहेत. या ग्रूप ने हा कार्यक्रम बसवलाय नि त्या ग्रूप ला स्वप्निल च्या गाण्यावर थीरकण्याची संधी मिळाली आहे. शिवाय आमचे सिड्नीकर नाटक बसवणार आहेत ते ही प्रशांत दामले बरोबर!!!

हे सगळ ऐकून मनात प्रत्येकवेळी कौतुक कौतुक वाटायचे या सगळयांचे, आपापले कामाचे , घरचे व्याप, मुलांच्या शाळा , अवांतर आक्टिविटीस सांभाळून आणि प्रत्येकाच्या वेळा सांभाळून कस जमत असेल हे सगळ जुळवून आणायला हा एक प्रश्न कायम पडायचा आणि आपल्याला एवढ्या सगळया लढाया एका वेळी लढायला लागत नाहीत याच हायस वाटायच...
आणि त्याच वेळी या विचाराची थोडी लाज सुद्धा वाटायची, असा विचार सगळयांनी केला तर हे संमेलन होईल का? हे संमेलन हे फक्त एक गेट टू गॅदर नाही तर माझी "माय मराठी" पुढ नेण्याची एक धडपड आहे हे काळात होत पण वळत नव्हत.

एका शुक्रवारी संध्याकाळी लेक बाबाला प्रॅक्टीस ला जाउच देईना म्हणून नवरा म्हणाला चल सगळेच जाउ, तुला पण ऐकता येईल आमच अभिमान गीत. आणि मी आधी लिहल्याप्रमाणे तो एक अनुभव होता, अशा एक दोन प्रॅक्टिसस ला आपसूक गेले आणि थोडी भीती वाटली या सगळ्यात ओढल जाण्याची, या संमेलनाच्या विचारातच ईतकी ताकद होती की माझ्या मर्यादांच्या पालिकडल अस काही करायच नाही हा विचार पचोळ्या सारखा उडून जाण्याची शक्यता निर्माण झाली ;मग काही तरी कारण काढून जायचच टाळल. त्यात घर शिफ्ट करायच ठरल मग काय कामाला कमी नव्हतीच. या सगळ्यात अगदी गळयापर्यंत बूडलेली असताना एक नवीन संधी चालून आली आणि मी ती स्वीकारली. मनात म्हणल चला आता मी माझ्या त्या भीतीला काही वावच नाहीय कारण आता माझ्या कडे वेळच नाही ईतर कशासाठी...

दोन नोकर्यांच्या मधल्या सुट्टीत घरातल पॅकिंग, क्लीनिंग यांचा फडशा पाडत असताना, एका संध्याकाळी नवर्‍याला प्रॅक्टीसहून यायला उशीर होणार तर तू बरोबर चल म्हणजे ड्राइव चा कंटाळा येणार नाही या विनंतीला उत्साहात हो म्हणाले. त्यात प्रॅक्टीस आमच्या आवडत्या काका-काकूच्या घरी, म्हणल मी आणि लेक अगदी अवघडणार नाही. लेकीला गाडीतला एसी चा वारा लागला आणि बसल्या जागी तिने निद्रा देवीच्या उपासनेला सुरवात केली, त्यामुळे ईच्छित स्थळि पोचल्यावर मी काकून च्या कामात लुडबुड करणे, ककांशी गप्पा मारणे, काही गाण्यांचे शब्द सापडत नव्हते ते इंटरनेट वर आस्मादिकांचा मुक्त संचार असल्यमुळे ताबडतोब शोधून भाव खाणे या सगळ्या गोष्टी यथासंग करून घेतल्या. संध्याकाळ छान गेली आता घरी जाउ आणि मस्त झोपून टाकु अशा सुखद विचारात असताना एका मैत्रिणिने मला गळ घातली फिनालेत सहभागी होण्याची....

या नंतरचे दिवस वेगळेच होते एक वेड होत ते, आधी फक्त वेक एंडस ना असणार्‍या प्रॅक्टिसस संमेलन जवळ येऊ लागल तशा वीक डेज़ मधे पण संध्याकाळी होऊ लागल्या. या सगळ्या दरम्यान जाणवलेल्या प्रत्येक गोष्टीवर वेगळा लेख होऊ शकेल ७-८ महिन्याच्या मुलाला घेऊन कोरेग्राफी कॅरणारी आई, फक्त स्वाताच्या मुलांसाठी नवे तर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत प्रॅक्टिसस साठी येणार्‍या सगळ्यांच्या खण्यापिण्याची व्यवस्था करणार तरुण कुटुंब. घरातला मोठा हॉल कधी ही कुणालाही प्रॅक्टिसस साठी वापरायला देणारे आमचे काका- काकू. व्यावसायिक जगात अत्यंत यशस्वी असणारे पण संमेलनासाठी पडेल ते काम वेळच्यावेळी करणारे अजुन एक काका. या सगळ्यात सतत जाणवायची ती धडपड, प्रत्येकाची धडपड कार्येक्रम सर्वांग सूंदर करण्याची मी माझ्या कडून जे जे करता येत ते ते करणार असा भाव.

होता होता ड्रेस रेहियर्सअल /ग्रँड रेहियर्सअल दणक्यात सुरू झाल्या. त्यानंतर कुणीतरी एक सल्ला दिला सगळ्याना आत्म्परीक्षण करून ५ चुका शोधा आणि त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्या. पर्फेक्षन साठी चालेल्या प्रत्येकाच्या धडपडीत या सल्ल्याने फारच मोलाची भर टाकली.

संमेलन दोन दिवसांच असणार होत आणि शुक्रवार संध्याकाळी जत्रा असणार होती.

-क्रमशः

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३ भाग २

धावत चालू झालेला सोमवार पळत पळत गुरुवार कधी घेऊन आला कळलच नाही. गुरुवारी दुपारी कळल मेल्बर्नची मंडळी रात्री प्रॅक्टीस साठी घरी येणार आहेत. झाल आम्ही धापा टाकत घरी पोचलो घर जरा पाहुण्यानां येण्याजोग केल आणि वाट पाहु लागलो.
एरलाइन्स ने घालायचे ते सगळे घोळ व्यवस्थित घातल्यामुळे मेल्बर्नकर यायलाच १० वाजले.

सिड्नीत लेका कडे आलेले एक काका मृदुंगावर साथ करणार होते. बोलता बोलता नवर्‍याचे मूळ गाव आणि त्यांचे सध्याचे राहायचे ठिकाण एकाच हे कळले आणि नवीन घरात राहायला आल्यावर आपल्याच घरातल कोणी तरी वडीलधार आशीर्वाद द्यायला आलेत याच समाधान मिळाल. संमेलनाने ने काय दिल तर हे समाधान दिल ते ही संमेलन चालू होण्याच्या आधीच Happy

आमचा जीव माटमुट करू लागला रात्री १० च्या पुढे तबला, पेटी, मृदुंग जुळवून प्रॅक्टीस सुरू झाली खरी पण कधी कुठला शेजारी झोपमोड झाल्यामुळे हे बंद करा सांगायला येतोय की काय याची धास्ती होतीच.
पण गुणी शेजारयानी काही तक्रार केली नाही उलट पक्षी दुसर्या दिवशी सकाळी लेकीला Hi-Hello करायला छोटा शेजारी येऊन गेला. Happy

शुक्रावरची सकाळ म्हणजे निव्वळ लगबग. कुणाशी ही बोलाप्रॅक्टीस हून आलोय किंवा प्रॅक्टीस ला चाललोय. त्यात भारतातून आलेल्या कलाकारांच्या बरोबर प्रॅक्टीस करण्याची संधी असल्यामुळे ती ही उत्सुकता शिगेला पोचलेली. ज्यांच्या घरी हे कलाकार राहीले होते किंवा येणार होते त्यांची स्वागताची गडबड त्यात आमच्या उत्साही साख्याना पाककौशल्य दाखवायची एवढी नामी संधी मिळाल्यावर ती कोण सोडेल. या सार्‍याची गडबड चालूच असताना कोणीतरी सांगत होत कालच हॉल पाहून आलो लिवरपूल चा काय सूंदर सजवलाय हॉल आणि सगळ कस शिस्त-शीर फोटो, वेगवेगळे कवितांचे बॅनर्स, मराठी बद्दल काही फॅक्ट्स फरच कष्ट घेतलेत लोकांनी. आमची औत्सुकता अगदी शिगेला पोचली होती पण या हॉल मधे जायच्या आधी अजुन एक मोठ आकर्षण होत ना जत्रा!!!

संध्याकाळी चार च्या सुमारास जत्रा चालू झाली नाव नोंदणी/तिकिटे कलेक्ट करणे, काही मनोरंजनाचे कार्यक्रम आणि वेगवेगळे स्टॉल्स यानी बॉनीरिग स्पोर्ट्स क्लब ला एकदम मराठमोळा फील आणला होता.
या जात्रेंन जणू प्रत्येकाला एक संधी दिली होती संमेलना साठी तयार होण्याची. बायकांच्या ठेवणीतल्या साड्या , दागिने बाहेर आले होते आणि हे फक्त बायकांच्याच बाबतीत खर होत अस नव्हे तर समस्त पुरूष वर्गानेही ही सलवार जब्बा / कुरते / धोतर याना प्राधान्य दिल होत.
मराठीच प्रेम हे फक्त पुस्तकातून किंवा लिखाण यामाधूनच नव्हे तर कपड्यातून पण दिसून येत हा एक साक्षात्कार मला झाला आणि पुढच्या भारत वारीत करायच्या खरेदीची लिस्ट तयार करण्यात आली (मनात) Happy
हॉल मधे फिरून झाल्यावर आम्ही मोहरा वळविला तो स्टॉल्स कडे

काय नव्हत तिथे? आपण लहान असताना वाजवायचो तशा पिपण्या, छोट्यांसाठी राइड्स, बायकांसाठी टिकल्या, पाउडर आणि स्नो Happy असा बोर्ड असणारा स्टॉल आणि समस्त जनतेला आपलस केलेले उसाचा रस, कांदा भजी स्टॉल्स
आणि या सगळ्यावर कडी करणारा एका वेगळ्याच जगात नेणारा तो "अमृततुल्य" चा स्टॉल आ हा हा हा
मराठी म्हणजे फक्त साहित्य, पेहराव एवढेच नसून अमृततुल्य हा ही मराठी चा अविभाज्य भाग आहे हे माझ्या समस्त मराठी बंधू- भागीनींनि मला दाखवून दिले.

या सगळ्यात एथे वाढलेल्या तरुण पिढीचा असलेला सक्रिय सहभाग हा माझ्यासारख्या अनेकाना दिलासा देणारा होता. ही मूल-मुली संमेलनाला आई वडील म्हणतात म्हणून उपस्थित नव्हते तर अनेक जण अगदी मराठमोळ्या वेषात आले होते. चालू असलेल्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. कुणी स्टॉल्स चालवत होत, कुणी बॅक-स्टेज ला मदत करत होत तर कुणी संगीता साठी साथ करत होत. त्यांच्याकडून त्यांची अशी कारण जाणून घ्यायला खरतर मला फार आवडल असत पण ते जमल नाही.

या सगळ्या नंतर "वग" सादर होणार होता सिड्नीतल्या कलाकरांकडून. भारतात मराठी वाहिन्यानि काही गोष्टींची वाट लावली आहे त्यातला एक प्रकार म्हणजे "वग". त्यामुळे मन जरा साशंक होते. पण ही कलाकृती दर्जेदार गवरानपणा जपत, मनोरंजनाचा केलेला एक उत्तम प्रयोग होती. हाताळलेले स्थानिक प्रश्न, स्थानिक मराठी लोकांचे संदर्भ, संमेलन कमिटी ला काढलेले चिमटे, आणि कलाकारांची तयारी, नेपथ्य या सगळ्या पातळ्यांवर "वग" १०० टक्के यशस्वी झाला अस म्हणायला हरकत नाही.

वग संपताच लोकानि जेवणासाठी रांगा लावायला सुरूवात केली पण तिथे ऑसी शिस्त सोडून आपला भारतीय बाणा समस्त जनतेने अंगिकारला. पण स्वयंसेवकानी लवकरच तो सगळा प्रकार कंट्रोल मधे आणला त्यांच्या साठी जणू पुढच्या दोन दिवसात करायच्या कामाची ती एक रंगीत तालीमच होती.

जेवता जेवता अनेक विषय चवीला होते यावर्षीची वाढलेली गर्दी, कार्यक्रमाचा भव्यदिव्य पणा आणि पुढच्या दोन दिवसात करायची धमाल.

जत्रा संपत आली अस वाटत असतानाच कोणीतरी सांगत आल आटपा लवकरच फायर वर्क चालू होणार आहे, आणि आम्हा सिड्नी करांचे फायर वर्कचे प्रेम दिसून आले. पुढील १०-१५ मिनिटे सुरू असणारे फायर वर्क नेत्रदीपकच होते आणि आपल संमेलन असच नेत्रदीपक होणार याची खात्री बाळगून आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला.

-क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा..वा.
भावलंच... <<आत्म्परीक्षण करून ५ चुका शोधा आणि त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्य<<>>
सगळ्याच टीमवाल्या कार्यक्रमांमधून हे वापरायला हरकतच नाही. आपलं आपल्याला कळत असतच.
किरण... मस्तं जमलाय हा भाग. पुढले भाग येऊदेत.

ऊसाचा रस >>>>>>>>>>>> अरेरे अजून चव आहे रेगांळतेय ओठांवर...

खुप छान लिहित आहात तुम्ही Happy

पुढच्या भागाची वाट बघतेय Happy

किरण... झक्कास चाललय. येऊंदेत पुढले भाग.
स्टॉल्स्वर देण्यासाठी कुपनं छापली होती... 'पावली'ची. डालर द्या अन पावली घ्या.
आडवी टोपी घालून एक शेंगदाणेवाला गळ्यात टोपली आडकवून मस्तं फिरत होता. कागदाची ती सुरनळी करून भाजलेले शेंगदाणे विकत होता.
मी नवर्‍याकडे हट्टं करून पावल्यांची कुप्नं घेऊन, त्या स्नो-पावडर्-टिकल्यावाल्या पालात (??), टिकल्यांची पाकिटं घेतली. 'आता घेतलीच आहेस तर लाव तरी ह्यातली एक...' असलं फक्तं नवरेच म्हणू शकतात.
ऊसाच्या रसवंतीगृहात चायनीज पोरं होती. आमचा मराठी कल्ला बघून हबकलीच असणार बहुतेक. मी वाट बघून बघून बघून... शेवटी नारळपाणी घेतलं (जे खूप आग्रह करूनही कुणीच घेत नव्हतं....)... रांगेतल्या सगळ्यांना सांगितलच मी की... केवळ तुमच्या प्रेमाखातर माझा उसाच्या रसावरचा हक्कं(??) सोडतेय...

तिथे अत्यंत सुंदर नाच झाले. एक सुर्रेख लावणी, गोंधळ, एक फ्लॅशमॉब... अश्शी धम्माल.
आणि दिंडी-पालखी?... मेलबर्नकरांनी ज्ञानदेवांची पालखी काढली.
मऊ मवाळ उतरत्या उन्हांत 'ज्ञानोबा माऊली' करीत पावलं टाकणारी मराठी माणसं... माझ्यासाठी एक अत्यंत सुखाचा अनुभव.
दुसर्‍या दिवशी सकाळी आठच्या आधी पोचयचं होतं हॉलवर (घरापासून सव्वा तास) म्हणून निघालोच... पाय निघत नव्हता तरीही.

वा वा, मस्त लिहिलं आहे किरण. मस्त वाटलं, डोळ्यासमोर उभं राहिलं, थोडे फोटो पण येऊ द्यात. आणि शलाकाची माहिती पण सुंदर..अजून लिहा...

दुसरा भाग पण मस्तच गं Happy

ऊसाचा रस पिऊन य्य वर्ष झालित Sad पूण्यात असताना उन्हाळ्यात आठवड्यात ३-४ वेळा तरी रस प्यायचेच Happy

अर्रे सह्ही लिहिलंय - फोटो कुठे ??

पुढचा भाग लवकर टाका...

शलाका - तू ही लिहित रहा -इथे लिहि, वेगळे लिहि पण जरुर जरुर जरुर लिहिणेच.. सक्त ताकीद Wink Happy

धन्यवाद!!! आपण सगळे वाचताय हे वाचून बर वाटल.
काही घरगुती अडचणीमुळे पुढचा भाग टाकायला वेळ लागतोय पण टाकते लवकरच...

@दाद, चंबू, शेवगा तुम्ही पण सगळे अपडेट देत राहा कारण आम्ही संमेलन आमच्या सोईनी अटेंड केल आहे. सो बर्‍याच गोष्टी राहून गेल्या आहेत लिहायच्या, अनुभवायच्या. आणि फोटो नाहीच आहेत माझ्याकडे काही सो अजुन कुणाकडे असतील तर नक्की टाका