बिनकामाचे जुने पुराने

Submitted by निशिकांत on 2 April, 2013 - 00:11

काळाच्या ओघात जाहले
अस्त हजारो राजघराणे
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

कोठीवरती वर्दळ आहे
आज, परंतू कोणासाठी?
नव्या पिढीतिल तारुण्याला
मजनू येती लुटण्यासाठी
हमिदाबाई वृध्द भळभळे
आठव्णींच्या चित्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

नवीन रेषा, परीघ नवखा
नवी भूमिती जीवन झाले
जुनीच पत्नी नवी प्रेयसी
असे खूपदा त्रिकोण झाले
हीच कहाणी व्यापत आहे
इतिहासाचे कैक रकाने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

आज मितीच्या धुंद नव्यांनो
मनी एवढी जाण असू द्या
सुपातल्यांनो जात्यामध्ये
उद्या जायचे ध्यान असू द्या
दु:ख उद्याचे नकात विसरू
मस्त आजच्या सत्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

सतार वाजे दिडदा दिडदा
कुणी छेडले जुन्या सुरांना ?
झंकाराने जुन्या सुरांच्या
नाद लाभला नव्या स्वरांना
जरी वाटतो नवीन लहजा
जुनेच गाती सर्व तराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

जुने नवे हे दोन किनारे
भेद कशाला? एकच सरिता
जुना जुना तो प्राण सोडला
जन्म नव्याने घेण्याकरिता
बंद जाहला तरी गुदमरे
श्वास चितेवर किती धुराने?
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

निशिकां देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users