एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

Submitted by लिलि के. on 30 March, 2013 - 07:26

आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?

आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.

अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या सुनेबरोबर स्पर्धा आणि राजकारण करतात. त्याना फक्त आपल्या सो कॉल्ड घराण्याला सून हवी असते, तिचे स्वताचे अस्तित्व आणि तिचे स्वताचे विचार नको असतात. तिची स्वताची ओळख पण तिने पुसावी असेच त्यांना वाटते. मला जे करायला मिळाले नाही, ते सुनेलाही मिळू नये अशी बर्‍याच जणींची इच्छा असते.

नवीन सुनेला "सुपर वुमन" चा आदर्श दिला जातो. तिने नोकरी करावी, घर सांभाळावे, पाहुणे नातेवाईक सांभाळावे, देवधर्म सांभाळावे, सगळ्यांची सेवा करावी, सगळ्याना साग्रसंगीत खाऊ पीऊ घालावे आणि सगळे करून सदा हसत आनंदी असावे अशी अपेक्षा असते. बर जर मुलगा कधी सुनेला फिरायला नेत असेल तर तो म्हणे सुनेला खूप लाडावून ठेवतो, आणि जावई मुलीला फिरायला नेत असेल सारखा, तर आमचे जावई खूप हौशी असे कौतुक. मुलगा सुनेला कधी मदत करत असेल कामात तर तो बायकोचा गुलाम, आणि जावयाने मुलीला मदत केली तर जावई खूप काळजी घेणारा. असले वातावरण असेल तर मुली कशा तयार होतील एकत्र कुटुंबात राहिला?

एकत्र कुटुंबात राहायचे असेल तर फक्त नवीन लग्न करून आलेल्या सुनेनेच तडजोड करून चालणार नाही. बाकीच्यांनीही केलीच पाहिजे. आणि वयाने अनुभवाने मोठे म्हणून पहिले पाऊल सासूने आणि सासर्‍याने उचलले पाहिजे.
खूपशे सासू सासरे आपल्या नव्या सुनेशी अहंकाराने वागतात, मग तिच्या मनात त्यांच्याविषयी आईवडीलांसारखे प्रेम कुठून निर्माण होणार? पण हेच लोक सुनेने शेवटपर्यंत मुलीसारखीच आपली सेवा करावी अशी इच्छा करतात.

माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नातला एक प्रसंग सांगते. गेल्यावर्षी त्याचे लग्न झाले, मुलगी गोव्याकडची होती व तिचे कुटुंब साधेच होते. माझ्या मावशीचे कुटुंब ही जरा जुन्या विचारांचे आहे. तर झाले काय , लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा सगळे हॉल वर गेलो तर मुलीकडच्यांचा अजून पत्ताच नव्हता व पुजेसाठी उशीर होत होता. लोक चुळबुळ, कुजबुज करत होते. शेवटी दोनतीन तास उशीराने मुलीकडचे आले, त्यावेळी मुलीने स्वताच्या लग्नासाठी येताना साडीऐवजी गुढग्यापर्यंत केपरी आणि घट्ट टिशर्ट घातला होता. ते बघून मावशीचे घरचे व नातेवाईक चिडले. मला ही ते खटकले , कारण तसे तिने मुद्दाम केल्यासारखे वाटत होते. साडी नाही निदान अशा वेळी पूर्ण कपडे तर घालावे. तर नातेवाईक मावशीकडे तक्रार करू लागले. मावशीला रडायलाच येत होते हे बघून आणि ऐकून. लोकांची अपेक्षा होती की मावशीनी जाऊन मुलीला व तिच्या आईला फैलावर घ्यावे. पण मावशी समजूतदारपणे वागली व म्हणाली ,"मी तिला असे काही बोलणार नाही, कारण अजून आमची तेवढी ओळख नाही, जवळीक नाही. त्यामुळे तिचा गैरसमजच होईल आणि मुली सासू सासरे सुरवातीला काय बोलले ते चांगलेच लक्षात ठेवतात शेवटपर्यंत. त्यापेक्षा मी माझी नाराजी प्रसाद (मावशीचा मुलगा) जवळ सांगते, तो समजावेल तिला तिच्या कलाने".
खरोखरच मला मावाशीच्या वागण्याचे खूप कौतुक वाटले, तिच्या जागी दुसर्‍या एखादीला सुनेला सुनवायची व सासूपणा दाखवायची ही आयतीच संधी वाटली असती.

(लेखन पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची? >>>>>>>>>>>> मुळातच एकत्र कुटुंब या प्रकारात "जवाबदारी कुणाची ?" हा प्रश्न चुकीचा ठरतो......

तिरडीला ४ जणांनी खांदा दिला (द्यावाच लागतो) तर तिरडी कोणी उचलली असे प्रश्न विचारतात का ?

द्वि शतके झाली तर नवल नको इतक्या जिव्हाळ्याचा हा विषय्.:फिदी:

सासु- सून, सासु -जावई, नवरा- बायको , सासरा -जावई, सासरा -सून अशी नाती अनेक गुंत्यांची असतात. दर दिवशी अपेक्षा वाढत जाणे आणी त्यातुन नवीनच वाद संवाद घडणे हे नित्य नेमाचे असते.

तुमची मावशी नक्कीच सासु या दृष्टीकोनातुन ( निदान माझ्या मते तरी ) आदर्श ठरेल. कारण तिने येणार्‍या सुनेचा थोडा तरी विचार केला. पण सध्या काय परिस्थिती आहे त्याविषयी जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.

बाय द वे जावा जावांबद्दल तुमचे काय मत आहे ?

आमच्या कडे एकत्र कुटुंब आहे आणी होते पण. म्हणजे आम्ही जावा एकत्र होतो, पण आता वेगळ्या झालोत, ते पण घर लहान पडते म्हणून. साबु आणी साबांबरोबर आम्ही आहोत. आम्हाला ती जबाबदारी वाटत नाही, कारण आपले भारतीय संस्कार.

जावेला मात्र ते कायम जबाबदारीच वाटले. व्यक्ती तितक्या प्रकृती.

पण १ तास ३६ मिनिटे या सदस्यात्वाच्या अवधीत तुम्ही एवढा संवेनदनशील ( हो संवेदनशीलच्.:फिदी:) विषय का निवडलात?

वंदना बर्वेताईंना विचारा.. त्या संशोधन करतात म्हणे अशा विषयात.
बाकी हा लेख मुक्तपीठात छापला होता का हो? वाचल्यासारखा वाटतोय..

पण १ तास ३६ मिनिटे या सदस्यात्वाच्या अवधीत तुम्ही एवढा संवेनदनशील ( हो संवेदनशीलच्.) विषय का निवडलात?

अहो, म्हणजे काय? मायबोलीवरील लेखक हे त्यांच्या विद्वत्तेविषयी, चर्चा करण्याच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसे काही शास्त्रीय पुस्तके, मासिके प्रमाण मानली जातात, तसे मायबोलीवरील लिखाण. हे मी मायबोलीवर वाचले असे म्हंटले की बोलणार्‍याची प्रतिष्ठा वाढते.

मायबोलीची ही ख्याति अबाधित रहावी म्हणून मी इथे आता काही लिहीत नाही, कारण आम्ही कधीच एकत्र कुटूंबपद्धतीत राहिलो नाही.

इथे आल्यावर मुले तर १८ व्या वर्षीच घर सोडून गेली ती आता पाहुण्यासारखी येतात. येऊ का म्हणून विचारतात! याचा अर्थ आमच्यात काही प्रेम नाही असे नाही, पण उगाच आई म्हणाली, बाबा म्हणाले, काका म्हणाले, आजोबा म्हणाले म्हणून असे करायचे असले काही नाही. त्यांना वाटले तर ते विचारतात नाहीतर जसे वागायचे, जे करायचे ते करतात. अजूनहि सर्वांचे उत्तम चालले आहे, नि मदतीला केंव्हाहि तयार असतात.

>>इथे आल्यावर मुले तर १८ व्या वर्षीच घर सोडून गेली ती आता पाहुण्यासारखी येतात. येऊ का म्हणून विचारतात! याचा अर्थ आमच्यात काही प्रेम नाही असे नाही, पण उगाच आई म्हणाली, बाबा म्हणाले, काका म्हणाले, आजोबा म्हणाले म्हणून असे करायचे असले काही नाही. त्यांना वाटले तर ते विचारतात नाहीतर जसे वागायचे, जे करायचे ते करतात. अजूनहि सर्वांचे उत्तम चालले आहे, नि मदतीला केंव्हाहि तयार असतात.>>

झक्की, ह्या बीबीवर अशा मनमिळाऊ पोस्ट्स अपेक्षित नाहीत Proud

धाग्याकरता आणि चावून चोथा झालेल्या विषयाकरताही शुभेच्छा.

झक्की तुम्ही अमेरीकेत आहात तिथले कायदे वायदे वेगळे. भारतात अजूनही काही ठिकाणी लोक एकत्र रहातात. अर्थात त्याचे फायदे तोटे नंतर सांगेन च.Proud

प्रत्येक घराचे प्रश्न वेगळे, स्वप्न वेगळी, नात्यानात्यातली ओढ वेगळी आणि तेढही वेगवेगळी.... एक मात्र खरे की जबाबदारी कुणाची? वगैरे विचारायची वेळ येत असेल तर ते फक्त नावालाच 'एकत्र' कुटुंब आहे!