काव्य हृदयातून यावे लागते!

Submitted by गझलप्रेमी on 29 March, 2013 - 15:05

गझल
काव्य हृदयातून यावे लागते!
पण, तसे आधी जगावे लागते!!

स्वस्तही मिळतात वस्तू चांगल्या.....
मात्र त्याकरता फिरावे लागते!

शब्द दिमतीला हवे ते यायला;
तेवढे चिंतन करावे लागते!

पोचतो ध्येयाप्रती लवकर कुणी!
कैक लोकांना झुरावे लागते!!

सद्गुरू मिळतात.....पुण्याई हवी!
जन्मभरही वणवणावे लागते!!

कोण तू, हिमनग? नको तोरा तुझा....
हिमकड्याला कोसळावे लागते!

फाटते आभाळही केव्हा तरी....
या धरेला सावरावे लागते!

शायरी चरितार्थ केल्याने किती....
त्यास गोष्टींना मुकावे लागते!

शेरही चढतो कधी दारूपरी!
मात्र साकी त्यास व्हावे लागते!!

राहिली आहे किती गंगाजळी?
संपल्यावर श्वास, जावे लागते!

सूर्यही असशील तू गझलेतला!
पेटतो, त्याला विझावे लागते!!

...............गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे पर्यायी शेर

जीवनाचा मॉल कोठे स्वस्तसा
शोध घेताना मरावे लागते

आज केली, कर हमाली, शब्दशः
तेवढे चिंतन करावे लागते

पोचतो ध्येयाप्रती लवकर कुणी
भाग्य वंतांना फिरावे लागते

वाट फुटता बोट दावी सद्गुरू
पुण्य त्यासाठी भरावे लागते

तैरणा-या, हिमनगा तोरा नको
दशपटीने तुज बुडावे लागते

फाटते आभाळ जेव्हां त्या क्षणी....
पाप सारे आठवावे लागते

शायरी चरितार्थ ज्याचा त्या घरी...
चूल वातीला विझावे लागते

शेरही चढतो कधी दारूपरी
झिंग त्याची त्यास व्हावे लागते

राहिली आहे किती गंगाजळी?
शेवटी गंगेत न्हावे लागते

हडळीण बाई
असाच टीपी आहे.

पर्याय आवडलेले मायबोलीकर

छान आहे . आता वाचुन थोडी थोडी समजायला लागली आहे. फक्त दुसरी ओळ (स्वस्त मिळतात वस्तु .. ) ओढुन ताणुन आणल्यासारखी वाटली, अनावाश्यक होती ती. ( स्पष्टपणे सांगीतल्याबद्दल राग नसावा).

सद्गुरु, गंगाजळी छान वाटले हे शब्द.

स्वस्तही मिळतात वस्तू चांगल्या.....
मात्र त्याकरता फिरावे लागते!

हा शेर मस्त.

पोचतो ध्येयाप्रती लवकर कुणी
भाग्य वंतांना फिरावे लागते
बरा आहे पर्याय!

कमनशीबी पोचतो ध्येयाप्रती!
भाग्यवंतांना फिरावे लागते!!............असाही पर्याय देता यावा!

तैरणा-या, हिमनगा तोरा नको......सुंदर ओळ, अभिनंदन!
दशपटीने तुज बुडावे लागते.............ठीक, पण असाही पर्याय देता यावा.....

तैरणा-या, हिमनगा तोरा नको!
बघ किती तुजला बुडावे लागते!!

शायरी चरितार्थ ज्याचा त्या घरी...
चूल, वातीला विझावे लागते......अप्रतिम शेर अभिनंदन!

कमनशीबी पोचतो ध्येयाप्रती!
भाग्यवंतांना फिरावे लागते!!

पर्यायाला दिलेला पर्याय सुंदर आहे. पण त्यातून ध्वनित होणारा अर्थ विचित्र आहे. लवकर यश मिळाल्यास टक्केटोणपे खाऊन जे शहाणपण मिळते ते मिळत नाही. म्हणून टक्केटोणपे खात जो यश मिळवतो तो भाग्यवंत असा आशय काही त्यातून पोहोचत नाही. यश मिळते तो कमनशिबी असंच वाचणा-याला वाटते.

तुमच्या पर्यायाचा आग्रह आता ध्यानात आला. हा शेर असाही होऊ शकला असता याचं प्रात्यक्षिकच आहे. पण पर्याय मूळ शेरापेक्षा चांगला असायला हवा. तसच ज्याची गझल आहे त्याची परवानगी घेतलेली असावी तरच या खेळाला अर्थ आहे.

पर्याय आवडलेले मायबोलीकर - २

हडळ खुश हुई.
ए वरच्या ! तुला काय झालं रे दात काढायला ? हडळीला असले चाळे आवडत नाहीत.

कोण तू, हिमनग? नको तोरा तुझा....
हिमकड्याला कोसळावे लागते! ... मूळ

तैरणा-या, हिमनगा तोरा नको
दशपटीने तुज बुडावे लागते .... पर्यायी

तैरणा-या, हिमनगा तोरा नको!
बघ किती तुजला बुडावे लागते!! ... पर्यायपर्यायी

हिमनगाचा १ भाग पाण्यावर तर ९ भाग पाण्याखाली असतो असं म्हणतात असं ऐकलय. त्यामुळे "दशपटीने तुज बुडावे लागते" हा पर्याय विज्ञानाच्या जवळपास जाणारा वाटतो.

हडळीला नाट्यमयता असलेले शेर आवडतात.

मना सज्जना भक्तीपंथेचि जावे.. करावे, भरावे असं सांगणारे शेर तिला आवडत नाहीत. पण तरी ती माफ करते.

पण बाजारत वस्तू घ्यायला पैसे द्यावे लागतात, वस्तू घ्यायला फिरावे लागते, बसने जाताना तिकीट काढावे लागते असले शेर दिसले कि ती झपाटते. चिंचेच्या झाडावर घेऊन जाते.

पर्यायाला दिलेला पर्याय सुंदर आहे. पण त्यातून ध्वनित होणारा अर्थ विचित्र आहे. लवकर यश मिळाल्यास टक्केटोणपे खाऊन जे शहाणपण मिळते ते मिळत नाही. म्हणून टक्केटोणपे खात जो यश मिळवतो तो भाग्यवंत असा आशय काही त्यातून पोहोचत नाही. यश मिळते तो कमनशिबी असंच वाचणा-याला वाटते.

प्रत्येक विधानाचा व्यत्यास खरा असतोच असे नाही!...........इति गझलप्रेमी

पर्याय मूळ शेरापेक्षा चांगला असायला हवा. तसच ज्याची गझल आहे त्याची परवानगी घेतलेली असावी तरच या खेळाला अर्थ आहे.

आदर्श खयाल!
गझलप्रेमींना गझल/शेर/पर्यायीशेर म्हणजे खेळ वाटत नाही!

हिमनगाचा १ भाग पाण्यावर तर ९ भाग पाण्याखाली असतो असं म्हणतात असं ऐकलय. त्यामुळे "दशपटीने तुज बुडावे लागते" हा पर्याय विज्ञानाच्या जवळपास जाणारा वाटतो.<<<<<<<<<<<<<<

१/९वा भाग पाण्याखाली म्हणजे दश( दहा) पटीने काय?

तिलकधारी आला आहे.

स्वस्तही मिळतात वस्तू चांगल्या.....
मात्र त्याकरता फिरावे लागते!<<<

दुपारच्या जेवणानंतर तंबाखू चोळत पारावर बसून गप्पा माराव्यात तसे शेर करू नयेत.

तिलकधारी निघत आहे.

तांबूल खा, भले तू भर तोबरा विड्याचा.....
अधरावरी अखेरी मिसराच यायचा या!

शब्दावरीच साध्या जाऊ नकोस रे तू.....
डोकाव आत थोडे, समजेल सर्व काही!...............इति गझलप्रेमी

>>१/९वा भाग पाण्याखाली म्हणजे दश( दहा) पटीने काय?<<

एक दशांश म्हणजे एखाद्या गोष्टीचे १० सारखे भाग करणे व त्यातील एक घेणे. नऊ दशांश म्हणजे एखाद्या गोष्टीचे १० सारखे भाग करणे व त्यातील ९ भाग घेणे. त्यामुळे एक दशांशच्या नऊपट म्हणजे नऊ दशांश व्हावेत असे वाटते. त्यामुळे ही दशपट "जवळपास" जाणारी वाटते असे म्हटलेले आहे.

>>दुपारच्या जेवणानंतर तंबाखू चोळत पारावर बसून गप्पा माराव्यात तसे शेर करू नयेत<<

मी तर म्हणतो की
१. वहिनी थोडी साखर देता का?
२. काकू माझ्या आईने उभ्या उभ्या बोलावलंय
३. बाप रे! उद्या पाणी येणार नाहीये
४. अगं ऐकलस का? सहावा आयोग लागू झाला बर का.

इ.इ.इ. अनेक गोष्टी गझलेत येऊ नये.

ते 'शब्द देतो की पर्यायी देणार नाही, बोल्डमधे लिहीणार नाही' वगैरे वगैरे मी स्वप्नात वाचलं होतं का? धीक्कार माझ्या जीवनावर की मला स्वप्नातही असलंच काहीतरी दिसतं..