पानगळ

Submitted by pulasti on 29 March, 2013 - 10:29

सर्व आहे, का तरीही चाललेली धावपळ?
मोह, आळस, गूढ भीती...कारणांची सरमिसळ!

होत नाही सहन अन् येते शिसारीही कधी
वाटते त्यांना कसे मग हे 'मनोरंजन निखळ'?

बिघडले आहे मनाच्याही ऋतूंचे चक्र का?
वर्षभर चालूच आहे आत ओली पानगळ

मार्ग सगळ्यांचे कितीदा काटतातच सारखे
खातरी नाहीच - माझी वाट आहे का सरळ?

हातचे राखून आता खर्च व्हावा आपला
आणि देताना जरा तो हात होऊ दे सढळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहजतेने सापडणारी लय आणि साध्या शब्दातला छान आशय.... मस्त.
पहिला आणि तिसरा सर्वात आवडले.
---------------------------------------------------------------------------------------
अन अस लिहिलंय. अन् असं असावं का ? ...... टायपो ?

बिघडले आहे मनाच्याही ऋतूंचे चक्र का?
वर्षभर चालूच आहे आत ओली पानगळ

छान आहे शेर!
ओली पानगळ! वा! बहुत खूब!

वर्षभराची पानगळ..........वा...... मस्तच !!