पण आम्ही बघू जे पाहिजे तेच !

Submitted by हर्पेन on 29 March, 2013 - 06:36

एकांगी विचार करणारी, एखाद्या व्यक्ती / गोष्टी / घटनेला दुसरी किंवा खरेतर इतर अनेक बाजू असू शकतात ह्या शक्यताच न मानणारी माणसे जगात, भारतात, महाराष्ट्रात, इथे तिथे सगळीकडेच दिसू लागल्याने सुचलेली एक रचना.

होय होय होय आहे मी भारतीय,
ज्यांची पैदावार, होते आहे बेसुमार....
असेना का एक मुलगीच अपत्य असलेली कुटुंबे माझा परिवार...
पण आम्ही बघू जे पाहिजे तेच !

होय होय होय आहे मी मराठी,
ज्यांनी वाजवली त्यांची पुंगी, जे नेसत होते लुंगी
असेना का समोरच्याशी मराठी येत नसेल तर हिंदी बोलण्याचे गुण माझ्या अंगी
पण आम्ही बघू जे पाहिजे तेच !

होय होय होय आहे मी पुणेरी,
जे म्हणे असतात कंजूस आणि दिलखुलास दाद द्यायला खडूस,
असेना का जागतिक कीर्तीच्या कलाकारांना इथलीच टाळी मिळवायची जिद्द आणि हौस
पण आम्ही बघू जे पाहिजे तेच !

होय होय होय आहे मी कोकणस्थ,
गोडसेचा वंशज, ज्याने केला गांधीजींचा अंत
मग असेना का त्याच कोकणस्थांमध्ये (गो. कृ.) गोखले आणि (विनोबा) भावे, तसेच अगदी एकारांत
पण आम्ही बघू जे पाहिजे तेच !

तळटीप - व्यक्तीश: मी जातीयवादी नाही, प्रांतीयवादी देखील नाही, खरेच सांगायचे तर मला खूप असा देशाभिमानही नाही. बरेंचदा आजूबाजूची माणसेंच मला काय काय लेबले लावत असतात. पण जे जसे आहे ते तसे स्वीकारण्याकडे माझा कल असतो. माणसाला फक्त माणूस म्हणून बघण्याचे व वागवण्याचे माझे प्रयत्न चालू(च) आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीच कळले नाही, प्रयत्न तोकडे पडले आहेत, लिहिलेले काहीतरीच आहे असे वाटले अथवा आवडले नाही तर अजिबात गोड मानून घेऊ नका, पण कृपया गप्पही राहू नका, तसे नमूद करा, लिहा, प्रतिसाद द्या, आणि आवडलेच तर तसेही नक्की कळवा. Happy