हे असेच चालायचे

Submitted by राजेंद्र देवी on 28 March, 2013 - 22:59

हे असेच चालायचे ...

लहानपणी एक पाय नाचिव रे गोविंदा किंवा चाल चाल बाळा तुझ्या पायात वाळा पासून चालणे सुरू झाले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते. म्हणजे तसे लहानपणापासून आपण किती चाललो हे आपणास लक्षात येत नाही. गावी १०वी पर्यंत पायात चप्पल हा प्रकार नव्हता. सगळीकडे अनवाणीच फिरायचे. ११वी ला अहमदनगराला शिकण्यास गेलो अन पायात पहिल्यांदा स्लीपर आली. नगरला असताना जवळच असणारे केडगाव येथे एकदा यात्रेसाठी चालत गेलो होतो. नंतर कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पुन्हा गावी परत आलो. कॉलेज शिक्षण पूर्णं करून नोकरीसाठी पुणे गाठले व येथेच स्थायिक झालो. असो हा थोडक्यात पूर्व इतिहास. पुण्यात सायकल स्कूटर अन नोकरीच्या जागी कंपनीच्या बसने प्रवास अन बैठे काम म्हणजे थोडक्यात चालणे हा प्रकार फारच कमी. फक्त गणपती पाहण्यासाठी जे काही पायी हिंडलो असेल तेवढेच. माझ्या कंपनीतील सहकारी सतत कुठे ना कुठेतरी पायी दौरा करीत असत व त्याचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून मलाही वाटे की आपणही थोडे चालावे म्हणून सरावासाठी रोज १-२ की.मी. सुरुवात केली. वयाची पन्नाशी उलटून गेल्याने हा सराव हळूहळू वाढवितं होतो. शेवटी एकदा सहकाऱ्यांना सांगितले की मला पण तुमच्या बरोबर पायी यावयाचे आहे. पहिली भ्रमंती ठरविली कात्रज बोगदा. म्हणजे कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. तेथून बसने घरी. ६.३० ते १०.३० या वेळेत हे चालने पूर्णं केले. पौर्णिमेची रात्र असल्याने मजा आली. बोगद्यामध्ये जरी दिवे असले तरी बॅटरी वापरणे अपरिहार्य होते कारण लोखंडी ऍगल पायात आडवे येत होते अन गाड्यांचा धूर पण भरपूर होता

कात्रजच्या या यशस्वी चालीनंतर काही दिवसांनी ठरविले की ऑफिस सुटले की अकुर्डी ते देहू हे अंतर चालत जावयाचे. हे अंतर फक्त १२ की. मी. होते. तुकारामाच्या समाघीचे दर्शन घेऊन व येताना बसने घरी परतलो. चालताना भंडारा डोंगर पाहिला व पुढील वेळी येथे यावयाचे ठरवले पण तो योग आला नाही. अशा प्रकारे पायी चालण्याचा छंदच जडला. असेच एकदा सहजच ठरविले की का आपण ऑफिसमधून घरी बसने जाण्यापेक्षा चालतच जाऊ नये ? झाले. अकुर्डी ते दगडूशेठ गणपती असे २० की. मी. अंतर ५.३० ते रात्री ९.३० वेळेत पूर्णं केले. जुलै महिन्यात (भर पावसात) सहकाऱ्यांनी ठरविले म्हणून सिंहगडावर जायचे ठरले. पहाटे ५ वा. स्वारगेट ला रेनकोट वै. घालून हजर. पाऊस चालूच होता. मित्रांची वाट पाहत होतो पण कोणी आलेले दिसले नाही. वाटले पुढील थांब्यावर येतील पण कोणी आले नाही. आता काय करावयाचे. वाट माहिती नाही. योगायोगाने बसमध्ये एक कंपनीतील ओळखीचा चेहरा दिसला. तो खूपच अनुभवी होता अन मी नवशिका. असो. त्याच्याबरोबर सिंहगड भर पावसात चढावयास सुरुवात केली पण त्याचा वेग जास्ती होता व त्याला माझ्यावेगाने चालणे अवघड वाटत होते. शेवटी त्याला पुढे जाण्यास सांगून मी माझी चढाई चालूच ठेवली. पाऊस भरपूर होता. वरून पावसाच्या धारा अन रेनकोट मध्य घामाच्या धारा. पायवाटेवरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे त्या पाण्यातूनच वाट तुडवीत होतो. रस्ता नीट कळत नव्हता. पावसामुळे थोडेच लोक आले होते व ते पण केव्हाच वर चढून गेले होते. कसाबसा धापा टाकत पाऊण सिंहगड सर केला तेव्हा माझ्याबरोबर असणारा कंपनीतील सहकारी वर जाऊन परत फिरला होता. त्याने धीर दिला अन म्हणाला आता थोडेच राहिले आहे, बरोबर येऊ का? त्याला नकार दिला अन सांगितले की मी ह्या पावसात आता तुझ्याबरोबर परत उतरणार नाही. तू जा. मी जीपने खाली येईन. आणि मी देवाचे नाव घेत तसाच गड सर केला. हा अनुभव फारच वेगळा अन रोमांचकारी होता. जीपने उतरून बसने घरी परतलो अन मित्रांना फोन केला की ते का आले नाही. त्यांना तर मी सिंहगडावर जाऊन आलो यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटले की मी काही या पावसात येत नाही व त्यांनी पण पावसामुळे येणे रद्द केले.

यानंतर साघारणतः पुढच्या महिन्यात कंपनी(अकुर्डी) ते आळंदी असे चालत जायचे ठरले अन १८ की. मी. प्रवास ४ तासात पूर्णं केला. आळंदीला दर्शन घेऊन बसने घरी परतलो. घरची मंडळी म्हणू लागली की एवढे चालू नका पण चालायची खुमखुमी काही कमी होत नव्हती. एकदा रविवारी कोथरुडला नातेवाइकांकडे जायचे होते. तेव्हा सहज गंमत म्हणून बसने न जाता मी ते ८ की. मी. अंतर चालत गेलो. परगावी सुद्धा हातात सामान वै. नसेल तर स्टॅड ते घर चालतच जायचो. सकाळी चालण्याची मजा काही औरच आहे. अजिबात थकवा जाणवत नाही. थोड्याचं दिवसाने टूम निघाली. राजगड करायचा आहे. अर्थात पौर्णिमेची रात्र निवडली होती. गुंजवणे मार्गे जायचे ठरले. कंपनी सुटल्यावर स्वारगेट वरून निघालो अन रात्री ८ वा̱. गुंजवणे ला पोहचलो. रात्रीच गड चढावयास सुरवात करून १२ वा. वर गडावरती पोहचलो. तेथील मंदिरात जेवण करून झोपलो. सकाळी बालेकिल्ला केला , संजीवनी माची केली अन दुपारी २ वा. गड उतरण्यास सुरुवात केली. गुंजवणे ते कात्रज जीप व नंतर बसने घरी. (या लेखात गडाचे वर्णन वै. लिहितं नाही कारण ते सर्वत्र उपलब्ध आहे. ) असो. काही दिवसांनी पुन्हा कंपनीच्या बसने तळेगावला उतरून तेथून चालत शिरगाव (प्रती शिर्डी) ला १६ की. मी. चालत मुंबई पुणे मार्गे अकुर्डीला आलो अन बसने घरी.

काही दिवसानंतर पुन्हा टूम निघाली की आळंदीला जायचे पण या वेळेस ते दगडूशेठ ते आळंदी असे २४ की. मी. चालावयाचे. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ते पूर्णं केले. अधे मध्ये २-३ वेळा रवीवारी सिंहगड चढणे उतरणे चालूच होते. आता चालण्यास वेग आला होता व सरावलो होतो. साधारणतः ५० मिनिटात वर जाता येत होते. वर पोहताच १ ग्लास सरबत अन लगेच परत खाली उतरणे. पण राजगडच्या ट्रेकने गड पुन्हा पुन्हा बोलवू लागले होते. सर्वांनी ठरविले की यावेळी हरिश्चंद्र गड करूया. मग काय ऑफिस सुटले की राजगुरुनगरला उतरून खिरेश्वर ला बसने गेलो. रात्री (पौर्णिमा) ९ वाजता सुरुवात केली अन टोलार खिंडीत १२ वा. पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा गड चढावयास सुरुवात केली. रात्री २वा. गडावर पोहचलो. गुहेत जागा नसल्याने तेथील झोपडीत आश्रय घेतला. फेब्रुवारी महिना होता तरीपण गडावर खुप थंडी होती. सकाळी स्नान करून तारामती पॉइंट पाहून दुपारी विश्रांती घेतली. ४ वाजता प्रसिद्धं कोंकण कडा पाहण्यास गेलो. अप्रतिम व अवर्णीनीय. तेथून गुहेत जागा मिळवली. रात्री खिचडी खाऊनं झोपलो. सकाळी उठून पाचनाई मार्गे गड उतरलो व पुण्यास परतलो.

अधूनमधून कंपनी (अकुर्डी) ते घरी (रविवार पेठ) अशी चालत जाण्याची हुक्की येई. हे २० की. मी. अंतर अंदाजे ४ तासात पूर्णं होई. असेच एका रवीवारी चतुर्थी येत होती. हा योग साधून आम्ही सारस बाग गणपती ते थेउर २५ की. मी. सोलापूर रस्त्याने गेलो. पहाटे ५ ला सुरुवात केली व १० वा. थेउरला पोहचलो. १ तास रांगेत उभे राहिलो व दर्शन घेतले अन बसने घरी परत. आमचे सर्व चालणे साधारणात १ महिन्याच्या अंतराने असे. वातावरण , वेळ, प्रसंग पाहून ठरवीत असू.

मध्ये बरेच दिवस हालचाल नव्हती अन चुळबूळ सुरू झाली कारण माझे एक सहकारी श्री. मराठे हे चालण्यात एकदम तरबेज. त्यांनी ३-४ वेळा पुणे ते अक्कलकोट, पुणे ते पंढरपूर, पुणे ते पंढरपूर व तेथून अक्कलकोट असे पायी प्रवास रोज ५० ते ६० की. मी. वेगाने पूर्णं केले होते. २५० ते३००की. मी. चालणे व बसने परत. अर्थात माझी तेवढी तयारी नसे. पण मला वाटे की आपण एका दिवसात किती चालू शकू? हे पाहावे म्हणून त्यांना एकदिवसीय पायी प्रवासाचे मनोगत सांगितले अन ठरले की चालत नारायणपुरला जायचे. रात्री ८ वा. (पौर्णिमा) शंकर महाराज मठापासून सुरुवात केली. कात्रज बोगद्याजवळ नास्ता केला. पुढे कैलास ची भेळ रात्री १२ वा. खाऊनं पहाटे ४ वाजता नसरापुर फाटा गाठला. पाय खूपच दुखू लागले होते अन फोड पण आले होते. परत फिरावे असे वाटू लागले पण मन हार मानावयास तयार नव्हते. शेवटी तसेच चालत चालत पहाटे ६ वाजता बालाजीला (नारायणपुर) पोहचलो. तेथे अंघोळ करून दर्शन घेतले व जीप/ बसने घरी परत आलो. हा ४२ की. मी. चा टप्पा गाठू शकलो. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा पल्ला.

पण हायरे दैवा ... पुढे पुढे माझे गुडघे दुखू लागले. औषधाने थोडे बरे वाटे पण त्रास वाढू लागला. डॉ. नि चालण्यास बंदी केली आणि माझा २-३ वर्षाचा चालीत्सोव बंद पडला. मनाची खुप तयारी असली तरी आता शरीर साथ देईनासे झाले. आता गरजेपुरते थोडे चालतो. असो हे सर्व जसे आठवेल तसे लिहून काढले आहे. आपण काय करू शकतो हे आपणास केल्याशिवाय कळत नाही. आपली ताकद आपण अजमावून पाहत नाही. पन्नाशीनंतर मी हे सर्व करू शकलो यावर माझाच विश्वास बसत नाही. अजूनही खुप चालावे वाटते. दुर्ग खुणावतात पण ... हे असेच चालायचे

राजेंद्र देवी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिलेत, ओघ आहे लिखाणाला आणि... महान आहात आपण...

गडाकिल्ल्यावर ठीक आहे पण डांबरी रस्त्यांवर काही चालणे व्ह्यायचे नाही आपल्याकडनं...

सादर प्रणाम..

अरे हा लेख सुटूनच गेला होता. तिकडून इथे आलो.

छान लिहिला आहे अनुभव.

हर्पेनने लिहिले आहे तसेच की पळताना जमते पण इतके चालणे जमेल की नाही काय माहिती. या थंडीत थोडे पळ - चाल केले पण मग त्याचा कंटाळा आला आणि परत पळायला सुरूवात केली Happy

हर्पेन यांच्या धाग्यावर वाचले होते.एवढे चालणे स्वप्नातही नाही व्हायचे.
रच्याकने माझ्या मैत्रिणीच्या नवर्‍याचे लिगॅमेंट्स फाटल्याने ऑपरेशन झाले.त्याचे कारण अति चालणे असे डॉक्टरांनी सांगितले.तो नेहेमी ५ किमी चालायचा.वय ५६.

तुम्हाला प्रथम सलाम. पन्नाशीनंतर केलेले तुमचे चालण्याचे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.
एकटे चालणे ही एक प्रकारची साधना असते. स्वतःच्या चालण्याच्या लयीत एक संगीत असते , मनातल्या मनात "आपुलाचि वाद आपणासी" सुरू असेल तर ते चिंतनही आनंददायी असते. साथीला निसर्ग , चांदणे असेल तर दुग्ध-शर्करा योग !
आता गुडघेदुखी असाध्य राहिलेली नाही. योग्य शस्त्रक्रीयेनंतर पूर्वीप्रमाणे सहज चालता येते असे ऐकले आहे. तुम्ही परत चालते व्हाल याची खात्री आहे.
पुन्हा चालण्यासाठी आणि लेखनासाठी शुभेच्छा !

@ राजेंद्र देवी, आपले गुढघे आता कसे आहेत? आणि चालण्याचा उपक्रम?

एकटे चालणे ही एक प्रकारची साधना असते. स्वतःच्या चालण्याच्या लयीत एक संगीत असते , मनातल्या मनात "आपुलाचि वाद आपणासी" सुरू असेल तर ते चिंतनही आनंददायी असते. >>> अगदी खरे!!! मलाही चालण्याची आवड आहे. मी रोज सलग दोन वर्षे विक्रोळी ते भांडुप हे पाच कि. मी. अंतर एक तास दहा मिनिटात चालत जात असे ते दिवस आठवले. चालताना एक प्रकारची तंद्री लागे. आणि त्या नशेच्या ओढीने दुसऱ्या दिवशी पुन्हा चालायला लागे.

सचिनजी आता बरे आहे जरुरी पुरते चालतो अन घरी व्यायाम योगासने करतो। पण अंतरी चालण्या ही ओढ खूप आहे । धन्यवाद

मी रोज सकाळी ५ कि.मी. ४० मिनिटांत चालायचो.

तुमचे उपक्रम भारी होते. आता तेवढे चालू शकत नसाल तरी एक गोष्ट सांगण्याचा मोह होतो.
तुम्ही पळू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर रांगा. हे तत्त्व मी अंगीकारले आहे.

तुम्ही पळू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर रांगा. >>>> पर यवढी वडातान करुन कुट जायचय? ...हे पण आठवले Lol

देवीजी, छान लेख!

भारीच!
उद्यापासून पुन्हा चालायला सुरवात करतो. लोकांना चालायला आवडतं हे वाचून आश्चर्य वाटते. मी सकाळी स्वतःला चक्क ओढून घराबाहेर काढतो आणि नाईलाज झाल्यासारखे तीन किलोमीटर चालतो. Wink

सर्व प्रतिसादकास धन्यवाद, उद्देश प्रेरित करण्याचा असून आपण तो अमलात आणला तर त्याचे सार्थक होइल.