मृत्यू

Submitted by ashishcrane on 26 March, 2013 - 06:55

मृत्यू...
किती हि वाटलं तरी ज्याची भेट टाळता येत नाही असा.
'आहे' ला 'होतं' करणारा,वर्तमानाला भूतकाळ बनवणारा.
बोललेलं एखादं वाक्य 'शेवटचं' ठरवणारा.
वाक्यामागे स्वल्पविराम लावावा कि अल्पविराम लावावा ह्या संभ्रमात असतानाच अचानक येऊन पूर्णविराम लावणारा.

अंत म्हणजे आयुष्य आणि अनंत यांमधली एक सूक्ष्म रेषा.
एका भेटीतच या अंताच्या अलिकडचे पलीकडले होऊन जातात.
हिशोब थांबवणारा, जगणं लांबवणारा...
घराला किती हि मजबूत दारं लावली तरी त्यांना न जुमानणारा.

मृत्यू काहीतरी देऊन जातो कि काही घेऊन जातो?
वर्षानुवर्षे अडगळीत असेच पडून राहिलेल्या खटल्यांचा क्षणात निकाल लावणारा..
मृत्यूला पर्याय नसतात आणि नियम हि नसतात.
क्षणात आयुष्याला परकं करणाऱ्या मृत्यूला कधीच परकं करता येत नाही.
तो आपला आयुष्यभर पाठलाग करतो...अगदी मनापासून...आपल्या सावलीसारखा
मृत्यू अफाट असतो...आभाळाएवढा...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users