नसतोच कोणताही अधिकार माणसाला!

Submitted by गझलप्रेमी on 25 March, 2013 - 14:42

गझल
नसतोच कोणताही अधिकार माणसाला!
असतेच काय किंमत नादार माणसाला?

जा तू हिमालयावर, किंवा वनामधे जा....
चुकणार काय वेडया संसार माणसाला?

हव्यास, मोह, हेवा....सामान्य माणसांना;
नसते कमी कशाची दिलदार माणसाला!

ते बालपण असो वा वार्धक्य माणसाचे;
दोन्ही वयात लागे आधार माणसाला!

घर हे, नव्हे गुहा ही, तू राहतोस जेथे;
जगण्यास लागतो रे शेजार माणसाला!

ताठा असो कितीही, उद्धट असो कितीही;
करतात नम्र अंती उपकार माणसाला!

देतोच हात ईश्वर, बघ आळवून त्याला....
पण लागती कराया उपचार माणसाला!

संतुष्ट माझिया मी या नोकरीत आहे!
सुचतात कैक धंदे बेकार माणसाला!

हरणार मी न सहजी, जगण्यातली लढाई!
भीती अरे कशाची? झुंजार माणसाला!

आहे निसर्ग त्याच्या जाऊ नको विरोधी....
देतो शहाणपण मग संहार माणसाला!

खाण्यास अन्न, कपडे, अन् राहण्यास घरटे!
जगण्यास काय लागे रे, फार माणसाला!!

येतो सहीसलामत पाहून मरण जेव्हा;
स्मरतात त्याचवेळी आभार माणसाला!

कोणी सडाच, लेकुरवाळा कुणी असू द्या;
लागे करावयाला बाजार माणसाला!

चिंता म्हणून कसली उरणार ना छळाया!
काही नसो, असावा बस, यार माणसाला!!

........................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बरेचसे ओढून ताणून आणलेले वाटले बाकी आवडली

(गार, ठार, व्यापार, आजार, घार, चार, खिंडार, तार.. अशा काही कवाफी (नजरचुकीने) राहून गेल्या असाव्यात)

कबूल तिलकधारी, अगदी कान धरून!
पण लेकुरवाळा शब्द बसतच नव्हता हो!
बघा आपणास जमते का ते !

कोणी सडाच लेकुर वाळा कुणी असू द्या
लागे करावयाला बाजार माणसाला

पहिली ओळ आधीच समजत नाहीये. त्यामुळे अशी वाचलीत तरी चालेल तिलकधारी.

यतीभंग!>>>>

मी प्रतिसाद दिला नव्हता कारण देवसराना हे माहीत असणारच म्हणूनच मी काही वदणे टाळले
लेकुरवाळा हा शब्द कितीही प्रासादिक असला तरी तो अशाप्रकारे यतिभांग होत असतानाही केवळ त्याच्या मोहापायी तो या वृत्तात बसवून शेर पाडावा असा विचार किमान देवसरतरी करतील असे मला वाटले नव्हते

लेकुरवाळा हा शब्द कितीही प्रासादिक असला तरी तो अशाप्रकारे यतिभांग होत असतानाही केवळ त्याच्या मोहापायी तो या वृत्तात बसवून शेर पाडावा असा विचार किमान देवसरतरी करतील असे मला वाटले नव्हते<<<<<<<<

कोणत्याही शब्दाच्या मोहात आम्ही पडत नाही, जर तो आशयाला न्याय देणार नसेल तर!
तेव्हा मोह हा शब्दाचा नसून तो एक ध्यास होता प्रत्ययाशी/आशयाशी निष्ठा आबाधित ठेवण्याचा!
त्यासाठी यतिभंगाचा दोष पत्करून सदर शब्द आम्ही योजला!

वृत्ताची ओढाताण, शब्दांची विनाकारण तोडफोड, वापरात नसलेले अनाहूत शब्द वापरण्याचा सोस, -हस्व दीर्घाच्या विनाकारण घेतलेल्या सुटी, कमालीची वृत्तशरणता, काफियाशरणता, रदीफाची होणारी फरपट इत्यादी अनेक अक्षम्य गोष्टींपुढे लेखनगर्भनिष्ठेसाठी केलेला यतिभंग ही अदखलपात्र बाब आहे!
किती जण किती वृत्तात किती यति सांभाळतात हा एक संशोधनाचा विषय आहे, इथे!
एकच मोजपट्टी सर्वांच्या सर्व गझलांना लावणे हे श्रेयस्कर सर्वांच्या दृष्टीने!
मोजपट्टी शायरनिहाय बदलणे हे शायरांच्या दृष्टीने घातकआहे!

पहिली ओळ आधीच समजत नाहीये<<<<<<<<<,
असे कोणते दुर्बोध शब्द पहिल्या ओळीत आले आहेत ज्यामुळे पहिली ओळ आधीच समजत नाहीये?

अनेक अक्षम्य गोष्टींपुढे लेखनगर्भनिष्ठेसाठी केलेला यतिभंग ही अदखलपात्र बाब आहे!<<<

दुसर्‍याने खून केला म्हणून मी निदान भोसकून तरी काढणार ही वृत्ती गझलेसाठी पोषक नाही.

तिलकधारीला तुलना भावत नाही.

असे कोणते दुर्बोध शब्द पहिल्या ओळीत आले आहेत ज्यामुळे पहिली ओळ आधीच समजत नाहीये?>>>>

शब्दांनी मिळूनच वाक्य बनते हे सर्वज्ञात आहे पण असे शब्द ज्यांच्या वापराने त्या वाक्याचा एक सलग अर्थ लागतो आहे.

कोणी सडाच - म्हणजे काय? सडाफटींग म्हणायचे आहे काय? की रांगोळीचा सडा की रक्ताचा सडा?

लेकुरवाळा असणे आणि बाजार करायला लागणे - काय संगती आहे ह्यात.

जेवढे मुद्दे उपस्थित केलेत तितकेच क्लीअर कराल अशी अपेक्षा. अवांतर लिहीण्याचा मोह कृपया टाळावात.

तिलकधारी,
गझलप्रेमींना तुलना करावी लागली कारण प्रतिसाद गझलसापेक्ष असण्यापेक्षा गझलकारसापेक्ष होताना त्यांना दिसले! शिवाय गझलेची मोजपट्टी व्यक्तिगणिक बदलताना दिसली, जे तमाम गझलकार मायबोलीकरांच्या दृष्टीने घातक आहे!
गझलप्रेमींना असा मोजपट्टीचा भेदभाव व गझलकारांचा केलेला सापत्नभाव पसंत नाही!

विजयराव!
शब्दांनी मिळूनच वाक्य बनते हे सर्वज्ञात आहे पण असे शब्द ज्यांच्या वापराने त्या वाक्याचा एक सलग अर्थ लागतो आहे.

कोणी सडाच - म्हणजे काय? सडाफटींग म्हणायचे आहे काय? की रांगोळीचा सडा की रक्ताचा सडा?

लेकुरवाळा असणे आणि बाजार करायला लागणे - काय संगती आहे ह्यात.<<<<<<<<<<<<<<<

शेर असा होता आमचा.............

कोणी सडाच, लेकुरवाळा कुणी असू द्या;
लागे करावयाला बाजार माणसाला!

सडा म्हणजे एकटा, मोकळा, मागे काही ब्याद नसलेला, फटिंग, रिकामा, ओझे नसलेला इत्यादी
सडाफटिंग म्हणजे बायका पोरे किंवा मागे काही व्याप नसलेला मनुष्य(विनोदाने हा शब्द वापरला जातो)

लेकुरवाळा म्हणजे म्हणजे मुलेबाळे असलेला

बाजार करणे म्हणजे हवे असलेले जिन्नस बाजारातून विकत आणणे!

आता संपूर्ण शेर वाचल्यावर सडाफटींग म्हणायचे आहे काय? की रांगोळीचा सडा की रक्ताचा सडा?असा प्रश्न पडणे फारच हास्यास्पद वाटत आहे!

पुढे लेकुरवाळा शब्द आल्यावर अलिकडील सडाचा अर्थ जर रांगोळीचा सडा की रक्ताचा सडा असा मनात येत असेल तर सगळेच अनाकलनीय आहे!

माणूस एकटा/सडा असो किंवा लेकुरवाळा/प्रापंचिक/मुलेबाळे असणारा असो त्याला (संसाराची) बाजारहाट ही करावीच लागते इतका सरळ अर्थ असलेल्या शेरावर इतके गहन प्रश्न पडलेले पाहून आश्चर्यचकीत झालोआहोत!
अवांतर लिहिण्यासाठी आमचेकडे वेळ नाही, तेव्हा थांबतो!

विजयराव आम्हास तर किती तरी शब्द अजून माहीत नाहीत!
एकेका शब्दासाठी वणवणवत असतो आम्ही, विजयराव!
आजन्म शब्दशोध चालूच रहाणार!

सडा हा सडाफटींग ह्या अर्थाने वापरतात हे माहीत नव्हते. मोल्सवर्थ चेक केला, त्यात Sole Single or Unmarried असा एक अर्थ सापडला.

'ते' चा 'हे' करा<<<<<<<<<<<<
चालू शकेल!
पण मतला कसा वाटला?
कारण मतल्यातली दुसरी ओळ लिहायला १०वर्षांचा कालखंड जावा लागला! म्हणून विचारले!

धन्यवाद तिलकधारीजी!
अवांतर
का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!
हात देणे, वा न देणे, ते तुझ्या हातात होते!!

या आमच्या मतल्यावर काही प्रकाशझोत टाकाल काय?

जा तू हिमालयावर, किंवा वनामधे जा....
चुकणार काय वेडया संसार माणसाला?

आहे निसर्ग त्याच्या जाऊ नको विरोधी....
देतो शहाणपण मग संहार माणसाला! >>>> हे दोन सर्वात आवडले.