निलाकाश माझे सुने जाहलेले

Submitted by प्राजु on 25 March, 2013 - 10:03

किती परतवू मी जुनी आसवे ही
कशी मी करु सांग ना मोजणी
कशी दूर राहू असे वाटते की
उठूनी तुझ्यापास यावे झणी..

रहावे किती ठाम मीही मनाशी
तरी चलबिचल थांबते ना कशी
किती मी टिपावे तरी पापण्यांना
फ़िरूनी पुन्हा ओल येते अशी

कधी मीच खंबीर व्हावे स्वत:शी
ठरवले किती लाखवेळा जरी
उडे तीच खंबीरता रोज ऐसी
उडावी हवेच्यासवे शेवरी..

स्मरण नेमके कोणते मी करावे
असा होत असतोच गोंधळ खरा
किती लाख वचने किती लाख शपथा
किती लाख रात्रीतला मोगरा

निलाकाश माझे सुने जाहलेले
नुरे रंग त्याला अता कोणता
फ़िरे मेघ काळा उरातून माझ्या
व्यथा तोच माझी असे जाणता
-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा
काय लय..... काय एकेक शब्द,,,,,,काय तो आशय...मन खिळून गेले आहे

काय ग्रेट आहेस तू प्राजु !!

प्राजु, कविता चांगली आहेच पण फारशी आवडली नाही याचे कारण हाच भाव तुमच्या आधीच्या काही काव्यात येऊन गेल्यासारखा (मला तरी) वाटला व त्यामुळे असे वाटले की विषयाचा तोचतोचपणा येत आहे.

स्वतंत्ररीत्या पाहायला हवे हे पटते, पण एका कवीचे सगळेच लेखन सतत बघता येत असल्यामुळे असे कंपार्टमेन्ट्स करणे अवघड जाते.

तू खास लिहीतेस यार प्राजू....!

मनापासून आवडली रचना, तुझं लिखाण वाचून झाल्यावर मनावर रेंगाळणारा फील मला जास्त भावतो...
मस्त!!!

मनापासून आभार मंडळी.
बेफी. आपले म्हणने योग्य आहे. पण कविता सुचते तशीच लिहिली जाते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लिहिताना या आधी अशा मूडची कविता लिहिली गेली आहे हा विचार मनात आला नाही.
धन्यवाद. Happy

सुंदर.

खूप छान.

"कधी मीच खंबीर व्हावे स्वत:शी
ठरवले किती लाखवेळा जरी
उडे तीच खंबीरता रोज ऐसी
उडावी हवेच्यासवे शेवरी.." >>> हे सर्वात आवडलं.

छान..