दुकान

Submitted by रसप on 25 March, 2013 - 02:41

एक कप.... कान नसलेला
एक ग्लास.... टवका उडलेला
झाकण हरवलेली एक बाटली
सोंड तुटलेली एक किटली
एक जाडजूड पुस्तक.... फाटलेलं
सुट्ट्या कागदांचं एक बाड,
पुन्हा पुन्हा भिजून, पुन्हा पुन्हा सुकलेलं
हात निखळलेली एक आरामखुर्ची,
डुगडुगणारी
नवार सैलावलेली एक खाट,
कुरकुरणारी
एक भलं मोठ्ठं घड्याळ..
फक्त तास काटा चालू असलेलं
शाई वाळलेलं एक फौंटन पेन,
निब मोडलेलं
काही फोटो काचा तडकलेले
दोन-तीन आरसे डाग पडलेले
एक हार्मोनियम, फ्रेट्स वाकलेली
एका तबल्याची वादी सुटलेली

दारावरची पाटी,
एका स्क्रूला लटकणारी
एकुलती एक कडी,
कोयंडा शोधणारी

गंजकं, तुटकं
मळकं, फुटकं
इतस्तत: विखुरलेलं बरंच सामान होतं
ते केविलवाणं घर, घर नव्हतं भंगारचं दुकान होतं

पांघरुणात हलणारा छातीचा भाता.........
वाट पाहात होता की
एखादं वादळ येईल, मरतुकड्या दाराला तोडेल
आणि एखाद्या पांथस्थाला इथपर्यंत पोहोचवेल

दार ना तुटलं
ना उघडावं लागलं...
पण वादळ आलं, पांथस्थही आला
छातीचा भाता बंद झाला

आता सामान आणि दुकान
दोन्ही विकायला काढलंय
हार्मोनियम आपणच वाजते,
म्हणून जाळायचं ठरलंय.......

....रसप....
२४ मार्च २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/03/blog-post_25.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा रे जितू अतीशय वेगळ्या पद्धतीची आहे ही तुझ्या इतर कवितांपासून

असा फॉर्म अजून कुणाच्यातरी कवितेत वाचलाय नेमके आठवत नाहीये
आजकाल असा फॉर्म फार चालतो कवितेत कविता अगदी थेट भिडत्ये !!
बहुधा फेस्बुकावर आपल्या "मकस" वर शुक्ल की कोणीतरी कवयित्री आहेत त्यंची अशी कविता वाचली होती मी

तुझी ही कविता जाम आवडली

धन्यवाद !!

----------------------------

बरेच ठिकाणी 'तुटले... तुटले' च झाले होते. ती पुनरुक्ती वगळली आणि संपादित केली.

बाप रे! हृदयस्पर्शी आहे कविता... सुंदर म्हणवत नाही,
पण जे म्हणायचं आहे ते नीट पोहोचतय.