मी किनारा, लाट ती, भिडते कधी

Submitted by रसप on 23 March, 2013 - 01:31

ओढ ना मजला तिची असते कधी
मी किनारा, लाट ती, भिडते कधी

चोरल्यावरही नजर भिडते कधी
गप्प मी, पण ती तरी हसते कधी

अंगणी प्राजक्त नाही मोगरा
तीच श्वासातून दरवळते कधी

तू तिच्या तुलनेत छोटा, ईश्वरा
ती मला प्रत्यक्षही दिसते कधी

प्रेम डोळ्यातून नकळत वाहिले
आजही ना पापणी सुकते कधी

आग विझल्यावर निखारे राहती
ती निघुन जाते तरी उरते कधी

दर्शनाची रांग चालावी हळू
ऊब ममतेची पुन्हा मिळते कधी ?

तो हरेकाच्या विटेवरती उभा
झावळ्यांची झोपडी टिकते कधी ?

खूप रडलो दु:ख ना घटले 'जितू'
हासल्यावर वेदना भुलते कधी

....रसप....
१९ मार्च २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/03/blog-post_23.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग विझल्यावर निखारे राहती
ती निघुन जाते तरी उरते कधी

चांगला शेर आहे.. ( या शेरातल्या विचारला 'कधी तरी' असा रदीफ जास्त शोभला असता असे माझे मत )

बाकी गझल तितकी आवडली नाही मित्रा..( माफी असावी )

काही शेरात तेच-तेच जुनेपण आढळले...तर काहींमध्ये कंटेंट चांगला असूनही विशेष सौंदर्य गुंफलेले आढळले नाही..

पुलेशु.

काहींमध्ये कंटेंट चांगला असूनही विशेष सौंदर्य गुंफलेले आढळले नाही.>> पाहताच पटू लागावे असे वाटले फाटक साहेबांचे हे वैयक्तिक मत पण मी अ़जून विचाराधीनच ठेवले आहे ते

तू तिच्या तुलनेत खोटा विठ्ठला >>> असे करून वाचले असे केल्याने मला व्यक्तिशः जास्त आवडले म्हणून....शेर मनाला भिडला कारण मला आत्ता "तिच्या"त माझी आई दिसते आहे

दर्शनाची रांग चालावी हळू
ऊब ममतेची पुन्हा मिळते कधी ?>>>>> खूप आवडला ..दुसरी ओळ खासच

तो हरेकाच्या विटेवरती उभा>>>> फार फार आवडली ही ओळ ...खालच्या ओळीवरून माझा एक शेर आठवला पण ते जाऊदे मला इथली खालची ओळ व वरची यातला नेमका संबंध समजला नाही क्षमस्व

अनेक मिसरे अतीशय मस्त आलेत

एकंदर गझल आवडली

गझल ठीकठाक वाटली (वैम)

प्रेम डोळ्यातून नकळत वाहिले
>> वाहते केल्यास दुसर्‍या ओळीशी अधिक चांगली जोडली जाईल.

रणजीत,
अंगणी प्राजक्त नाही मोगरा
तीच श्वासातून दरवळते कधी
अप्रतिम शेर

तू तिच्या तुलनेत छोटा, ईश्वरा
ती मला प्रत्यक्षही दिसते कधी
साधा, थेट पण प्रामाणिक, निरागस शेर

आग विझल्यावर निखारे राहती
ती निघुन जाते तरी उरते कधी
सुंदर शेर, कल्पनाविलास आवडला!

............गझलप्रेमी

कसलेतरी दबलेले दु:ख पाझरलेय अनेक द्विपदींमधून.
खूप रडलो दु:ख ना घटले 'जितू'
हासल्यावर वेदना भुलते कधी
या शब्दातल्यासारखे..