अनवाणी

Submitted by -शाम on 18 March, 2013 - 01:15

नाही विचारले त्याने पाय कितीक जळले
माझे अनवाणी दु:ख नाही सूर्याला कळले

स्वप्न भीत भीत येते
नव्या दिसाच्या संगती
होता दुपार उन्हाशी
हात मिळवीते माती

लागे चटका जिव्हारी डोळे परतून ओले
माझे अनवाणी दु:ख नाही सूर्याला कळले

येई सांगावा ऋतूंचा
दिठी थरारतो जीव
गंध दिवाण्या जगाला
नाही कुणाचीच कीव

फूल होताना मनाचे रान करपून गेले
माझे अनवाणी दु:ख नाही सूर्याला कळले

............................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीनवेळा वाचली. पण विस्कळीतच वाटत राहिली. बहुधा सध्या मी ही कविता वाचण्या व समजण्यायोग्य मनस्थितीत नसण्याची शक्यता आहे.

कवितेचा आशय आणि मांडणी छानच आहे..... आवडली.

पण,
'कळाले', 'जळाले' यामुळे काहीसा रसभंग झाला.
कवितेतील इतर शब्दांचा बाज विशिष्ट प्रदेशातील बोली भाषेचा नसून प्रमाण मराठी भाषेचा आहे.
प्रमाण मराठीत 'कळले' 'जळले' असं म्हटलं जातं ना ?

धन्यवाद, नचिकेत, बेफि, उकाका, डॉक्टर..

बेफि, हे सिच्यूएशन बेस्ड आहे.. महाजन प्रॉडक्शन (पुणे)च्या एका शॉर्ट फिल्मसाठी लिहलंय,
गाणे बॅगराऊंला असून दोन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये आहे.

*काका, खेबूडकरांचे एक अष्टाक्षरी गीत पहा,

मायामंदीर हालले लागे कळस फुटाया
आज घायाळ पक्षीणी जायी पिलांना भेटाया... इथे भेटायला/ फुटायला असे यायला हवे होते
मीटर सांभाळणेही खेबुडकरांना अशक्य नव्हते मात्र 'भेटाया'चा जो साउंड गाण्याला उंची देतो ती बात भेटायला मध्ये नाही. असो, मुद्दा रसभंगाचा आहे तर बदल गरजेचाच!!

खूप खूप धन्यवाद!

शाम,
रसभंगाची दखल घेऊन बदल केलात, खूप बरं वाटलं.

तुम्ही दिलेल्या उदाहरणातील
’भेटाया’, ’कराया’ ही रूपे बरीच रूढ आहेत.

’कळाले’ या शब्दाबाबत मी प्रतिसाद लिहीत असताना
मला एका कविश्रेष्ठांची ओळ आठवली होती.....
"एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले"
या ओळीतला ’कळाले’ शब्दही खटकण्यासारखाच वाटतो.
असो ...... ते माझ्या आवडत्या कवींपैकी एक आहेत
तसेच त्यांच्याबाबत बोलण्याची माझी पात्रता नाही.

"हे सिच्यूएशन बेस्ड आहे.. महाजन प्रॉडक्शन (पुणे)च्या एका शॉर्ट फिल्मसाठी लिहलंय,
गाणे बॅगराऊंला असून दोन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये आहे." >>>> अभिनंदन शाम.

बेफि, हे सिच्यूएशन बेस्ड आहे.. महाजन प्रॉडक्शन (पुणे)च्या एका शॉर्ट फिल्मसाठी लिहलंय,
गाणे बॅगराऊंला असून दोन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये आहे.

अभिनंदन.

गाणे बॅगराऊंला असून दोन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये आहे.>>>
असे आहे तर मग आपले म्हणणे पटण्यासारखे आहे असे म्हणता येईल(कारण साहजिकच आहे मला कुठे त्यातले काही कळायला :))
असो
खूप खूप अभिनंदन शामजी

वाह, सुरेखच .... (हे कसं काय मिसलं होतं मी ??? )

बेफि, हे सिच्यूएशन बेस्ड आहे.. महाजन प्रॉडक्शन (पुणे)च्या एका शॉर्ट फिल्मसाठी लिहलंय,
गाणे बॅगराऊंला असून दोन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये आहे. >>>> हार्दिक अभिनंदन शामराव ... Happy

' लागे चटका जिव्हारी डोळे परतून ओले
माझे अनवाणी दु:ख नाही सूर्याला कळले.'...
मनाची आत्यंतिक घालमेल हे शब्द किती सहज व्यक्त करतायत..
जीव हळवा करून टाकणारी रचना.