गुत्ते पे गुत्ता - ३

Submitted by बाबूराव on 17 March, 2013 - 13:38

अन्त्ययात्रंचं फायनल झालं. अडचणि मोप व्हत्या. रंगाकाकाचं डोस्कं काम द्याया लागलं. त्येनं मेंब्राला पुन्यांदा कंजारभाटाकडं धाडलं. मेंबर म्हनजि ग्रामपंचायतित राखिव जागंवर घितल्यालं मेम्बर. त्यानं कधि चकार शब्द त्वांडातुन काडला नव्हता. त्या बोलिवर त्याला मेम्बर म्हनुन घितल्यालं व्हतं. आता त्या माळावर तेवडं येकच मानुस जरा पावरवालं म्हनायचं. तसं गावात त्येला कोनबि इचारत नव्हतं. त्याची बायकु बी त्याला इचारत नव्हति. कसलं मेम्बर अन काय, पाच नयं पैकं बि कोन देत न्हाई अन मेम्बर म्हनं असं सारकंच ऐकवल्यानं त्याचि भाइर आलेलि छाति दोनच म्हैन्यात पारच आत गेल्ति. मेंब्राकडुन बातमी कळल्यावर कंजारभाट लागलिच माळाकडं निगालं. समदीच निगालि. कायबि झालं तरी बाबुरावचिचा म्हनजि लै जुनं गि-हाईक व्हतं. अन आताच्या वख्ताला दुश्मनाच्या बी मदतिला गाव धावतंय तर कंजारभाट धावला नसता तरच येगळं घडलं असतं.

कभिन्न कातळासारखा कंजारभाटबि लै गम्भीर झाल्ता. आता त्येच्या मनात धन्दा नव्हता का कसलाच लबाडपना नव्हता. रोजच चिचाची सवय झालि व्हती. जरा उदासच वाटाय लागलं व्हतं. त्या इचारातच त्येनं रुपयं पाच हज्जार काडुन दिलं. अन्त्ययात्रा जोरात करा म्हनला. कमी पडलं तर हायेच मी असंबी म्हनला. तवा कंजारभाटाच्या नावानं तिथंच जयजयकार झाला. किश्यानं त्याचा सत्कार करायचा ठराव मान्डला तवा कन्जारभाटच त्यांना खवाळला.

किश्याच्या मनात आशा व्हती. कन्जारभाट प्रसन्न झाला तर उधारिबी माफ करल अन चिचाचं मोफत खातं आपल्या खात्याकड वळवल असं त्याला वाटलं. पन डाव काय फळला नाय तवा गुमान त्यो खाली बसला. आप्पानं त्येच्या मनातलं वळखुन त्याला येक रट्टा दिला अन किश्या कळवळला. आप्पा रोजच्याला हितकं पेग मारुन बी त्याची बॉडी टिकून व्हती. म्हन्जी आधि त्यानं किती जोरबैठका मारल्या असत्याल याचा हिशोब करत किश्या शान्त बसला.

आता मेम्बरनं कुठुनशान दोन बाम्बु आनले अन माळावर लाकडं गोळा कराय गेला. रामभाव मांगाकडनं दोर आनाय त्येनं पेंटरला पाठवलं. पेन्टरला जायाचं नव्हतं तवा त्येनं गावात कोनबी नाय तवा मांगवाड्यात बी कोन नसंल असं म्हनाय सुरुवात केली. तवा आप्पानं त्याला बी येक रट्टा दिला तसा पेण्टर जाया उठला. गावात कायबि झालं तरि सिजनला रामभाऊ दोर वळत असनार हे अप्पाला म्हाईत व्हतं. कुभारवाड्यातनं मडकी आनाय त्येला पैकं बी दिलं. तवा कन्जारभाटानं सोत्ताहुन त्येला सायकल काडुन दिली.

मेम्बरानं तवर तिरडी बनवाय सुरुवात केली व्हती. आत्ता रंगाकाकाच्या डोस्क्यात ट्युब पेटलि. त्यानं पॉईण्ट काडला. चिचा तर मुसलमान. तिरडिवरुन कशि काय मयत न्यायचि ? रंगाकाचं महत्व आता लै वाडलं व्हतं. त्ये सहन न होउन आप्पानं सवाल केला, मयत नेनार कोन हाय ? या सवालाला समद्यानि आपन असा जवाब दिला. मंग आपल्याला म्हाईत हाय तसंच व्हईल. गावात मुसलमानाचि दोनच घरं. त्यातलं मुल्लाचं घर म्हन्जि भणंग मानसाचं. बरं पंचक्रोशित त्याला बोलवनं येईल तिकडं त्याला जायाला लागायचं. अशा कामाला त्याचा उपेग नव्हता. त्यो फकस्त मुडदा पुरताना कसा पुरायचा अन काय काय म्हनायचं त्ये बगनार व्हता. दुसरं घर बाबुरावचं व्हतं अन त्योच मरुन पडला व्हता. पोराला सान्गावा धाडला व्हता. तवर मुडदा माळावर ठिवनं गावाला शोभा देनार नव्हतं. तसंबी गावात हिन्दु अन मुसलमान असलं त्या वख्ताला तरी कायबी नव्हतं. मुसलमान महाशिवरात्रीला महादेवाच्या देवळात लाईनमधि हुभं -हायचं. बोलन चालनं समदं येकसारकंच व्हतं. अन यात्रला बोकड कापायबी समदं जायचं तवा मुसलमान बी असायचं.

पेण्टर लै येळानं परत आला अन त्यानं दोर काडुन दिला तवा मेम्बरानं समाधानानं मान हलवली. पेण्टरनं मंग भाव खात रमची बाटलि काडलि तसं आप्पा पुन्यांदा खवाळलं. गाडगं मडकं कुठं हाय या प्रश्नाला पेण्टर कायबी बोलंना. तवा काय झालं आसल हे समद्याना कळलं. आता गाडगं मडकं -हाऊं दी, पैकं गेलं तवा या बाटलीचा रिसपेक्ट कराय पायजे असं मेम्बरचं म्हननं पडलं. ह्यो इचार समद्याना पसंद पडला.

अन मंग खाटंखालचं ग्लास निघालं. किश्यानं समद्याना सारखि रम दिली. रंगाकाकानं त्याचा ग्लास जमिनीवर ठिवला. बोटं बुडवून गन्गाजलासारखं शिम्पाडलं. आता समदे प्यायला सुरुवात करनात तोच रन्गाकाका वरडला "थाम्बा ".

समदी चडफडत थाम्बली. काकानं चार वळीचं भाशन दिलं. त्याचा अर्थ असा व्हता कि आपला बाप हितं मरुन पडलाय अन त्येला निवेद्य दिल्याबगर जर आपन दारु त्वांडाला लावलि तर चिचा आपल्याला सोडनार न्हाइ. मंग येकेक थेम्ब समद्यानि चिचाच्या त्वांडात सोडला. चिचाचा हात बसल्येल्या पोझिशनला मारत्याच्या खान्द्यावर व्हता. त्यो मेल्याचं समजल्यावरबी मारत्यानं हात काय काडला नव्हता. त्येला आता हात काडावा वाटु लागला. तर हात लैच कडक झाल्ता. बॉडीबी कडक व्हायला लाग्ली व्हती. तवा चिचाला झोपवायसाठि मारत्यानं त्येचा डोस्क्याकडचा भाग खाली ठिवला का, त्याचं पाय वर आलं अन हात आढ्याकडं बोट दावाय लागला.

तवा आप्पानं पाय खाली केलं. मागं वळुन बगतुय तर चिचा परत बसल्येला !!

मग समद्यानि रमवर ध्यान दिलं. वाट्याला आल्यालि रम हानल्यावर समद्यानाच हुशारि आलि. आज दिवाळि असल्यागत वाटत व्हतं. रोजचंच शिळंपाकं खाल्ल्यावर गोडाचं न्हाईतर तिखटाचं ताट यावं तसं आज वाटत व्हतं. ग्लास रिकामं झाल्यावर मुडदा सरळ करायच्या कामाला आप्पा, रंगा अन मारत्या लागलि तर तिरडी आवळायच्या कामाला मेम्बर अन पेण्टर लागलि. बाकिचि चिचाच्या आठवनि काडुन भावुक व्हायला लागलि व्हति. पोटात गेल्यालि रम त्याना लैच भावुक बनवत व्हती.

- बाबूराव

करम शहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन आवडलंच आहे म्हणुनच सुचना:
ग्लास, कभिन्न कातळासारखा असे शहरी शब्द एकदम खड्यासारखे वाटतात. त्याऐवजी गिलास, काळ्या दगडावानी वगैरे शोभतील.

बाबुराव कथा रंगत चाल्लीये. अजून येऊ द्या. नायतर गायब व्हाल. पण आदी जी प्रायारीटी हाय ती पण उरकुन घ्या.