शून्यस्पर्श

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 16 March, 2013 - 05:31

मिटलेल्या शरीरावर
फिरू द्यावा नांगर.
भळाभळा सांडावी झिंग
आणि चंद्र असावा सहयात्री.

असावीत त्याची पाळंमुळं
या लंबकांच्या देहात.
विस्तव रंध्रकल्लोळात,
ध्यानस्थ करुणा रत व्हावी.

किल्मिषांचे रूतावे रंग
भग्नावे शून्यशिल्प,
या चंद्र समाधीवरती
चंद्रपुष्प मी व्हावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा वाचली. लंबकासारख्या प्रतिमा तुमच्या लिखाणात वारंवार येतात. त्या धूसर वाटतात. इतर प्रतिमा मलाच विस्कळीत वाटताहेत का , कळत नाही.
शेवटचं कडवं ताकदीने आलंय. उच्च !

@विस्मया
या इथे लंबक मी 'कन्फ्युजन' या अर्थी घेतला आहे. 'कन्फ्युजन' ही एक प्रकारे माझी अभिव्यक्ती आहे. म्हणुन मुद्दाम मी इथे नाव ही तसंच घेतलंय. पण अनेकदा मी लंबक हा शब्द वेळ/आयुष्य म्हणुन ही वापरला आहे. (ह्रदयाच्या जागी लंबकाचं घड्याळ असलेला माणूस)
या कवितेचं सार थोडक्यात....रात्री एकटं असताना, चंद्राच्या दर्शनाने, त्याच्या स्पिरीच्युअ‍ॅलिटीची जाणीव झालेलं द्विधा मन ती 'स्पिरीच्युअ‍ॅलिटी' स्वतःत सामावून घेऊ पहातेय. आपल्या मानवी अस्तित्वाबरोबर येणार्‍या सर्व इच्छा-आकांक्षा, प्रेरणा आणि द्विधा करणार्‍या इतर सगळ्या मानवी भावना त्यागून चंद्रसाक्षीने शुन्यत्व प्राप्त व्हावं अशी इच्छा यात आहे. एकप्रकारे हा ध्यानस्थ चंद्राबरोबर द्विधा मनाने केलेला शृंगार आहे.

थोडासा अंदाज केला होता. पण मिटलेल्या शरीरावर फिरलेल्या नांगराने गोंधळ झाला. तिथे मनावर नांगर हवा होता असं वाटून गेलं..

स्पष्टीकरणानंतर अधिक चांगली कळाली आणि आवडली.