तू . . . . ! (एक तुझी कविता)

Submitted by राजीव मासरूळकर on 15 March, 2013 - 11:57

तू . . . . . !

तू असतेस अशी
की कुणी नसावंच जणु घरात
मात्र तू असतेस नक्कीच . . . . .!
सकाळी सकाळी
मी हाती घेतलेल्या
वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर
असतो तुझा न्हालेला
कोरा टवटवीत चेहरा . . . . ,
तुझ्या रात्रभोर केसांचा मुग्ध गंध !
प्रत्येक पानावर असतात रेखलेल्या
तुझ्या विविधांगी अदा
कुठे यशाच्या कथा . . . .
कुठे अपयशाच्या गाथा . . . . .
कुठे अपहरण तर कुठे वस्त्रहरण . . . . . . . . !

तशी तर तू बोलत नाहीस कधीच
मात्र तू बोलतेस नक्कीच . . . . . .
बोलतात नादमय
तुझे प्रेमळ कंगण
बोलतात तुझ्या हातातल्या
शिणलेल्या कपबश्या
बोलतात तुझी कंटाळलेली भांडीकुंडी
बोलतं तुझं धुणं-सारवणं
बोलतो तुझा अबोल अलवार गहिवर
बोलतो तुझा सरावलेला स्वेदचिंब पदर . . . . . !
तुझं अस्तित्व जाणवतं
तुझ्या पायांतल्या पैंजणांमधल्या
घुंगरांच्या छमछमाटातून . . . . . . .
त्यांचाही गळा जणु तूच दाबलेला . . . . . . . !

आणि
जेंव्हा मी ठोठावतो
तुझ्या बंद घराचं भक्कम दार
तेँव्हा तू म्हणतेस ,
"कोण पाहिजे तुम्हाला . . .?
घरात कुणीच नाही . . . . . . ."
घरात स्वतः तू असतानासुद्धा. . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु. पो. मासरूळ
ता. जि. बुलडाणा
rajivmasrulkar@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अमेयजी.
एकंदरीत ही कविता तुम्हाला आवडलेली दिसत नाहीये. लांबलचक झाली आहे का जरा ? आणि गद्यप्रायही ?
आपलं मत जाणून घ्यायला आवडेल.

छान आवडली .<<<<<<<<<तुझ्या पायांतल्या चैनींमधल्या घुंगरांच्या छमछमाटातून . .>>>> .चैनी हा पैजनाला समान अर्थी शब्द आहे का? प्रथमच ऐकला म्हणून ..

राजीव, कविता सुंदर उतरली आहे. रात्रभोर शब्द ओलांडून पुढे जाणे अवघड झाले म्हणून त्याबद्दल लिहिले आधी.
Happy

अहाहा...... मस्त मस्त !!!
रात्रभोर....... अतिशय रोमँटिक वाटला शब्द ....... Happy

आणि
जेंव्हा मी ठोठावतो
तुझ्या बंद घराचं भक्कम दार
तेँव्हा तू म्हणतेस ,
"कोण पाहिजे तुम्हाला . . .?
घरात कुणीच नाही . . . . . . ."
घरात स्वतः तू असतानासुद्धा. . . . . . . !

खुपच अर्थपूर्ण मस्त!!!

विक्रांतजी,
इंग्रजी Chain हा शब्द आमच्याकडे ग्रामीण भागातही इतका मिसळून गेला आहे मराठीत कि कुणी त्याला इंग्रजी शब्दच म्हणू नये जणू. नवरीसाठी चांदीची चैन केली, मी सोन्याची चैन घेतली असं सर्रास बोललं जातं, पायातल्या चेनसाठी पैंजण हा शब्द मात्र शहरातही (चुकूनसुद्धा) वापरलेला आढळत नाही. (मला तरी आढळला नाही छोट्या शहरांत) त्यामुळेच कदाचित इथे तो माझ्याकडूनही तितक्याच बेमालूमपणे वापरला गेला आहे.
या शब्दाबद्दल मायबोलीकर महिला काय म्हणतात ते बघुया.
बदल करावा कि नाही ते त्यानंतरच ठरवता येईल असं वाटतं.
दिलखुलास प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद .

अमेयजी ,
सॉरी . आपण एकाच शब्दाबद्दल लिहिलंत म्हणून वाटून गेलं मनाला तसं.
पुनश्च आभार !!!
ही कविता लिहिताना रात्रभोर हा शब्द जेंव्हा मला अचानक सूचला होता तेँव्हा माझीही अशीच अवस्था झाली होती.

मुक्तेश्वर कुलकर्णी ,
जयवीताई , जयनीतजी ,
आपलेसुद्धा मनापासून आभार ! ! !