जाणवेल इतका जवळ रहा...

Submitted by सत्यजित on 15 March, 2013 - 02:59

असा कसा गेलास सोडून
सुजले डोळे लाल रडून
आता तुझे बोल नाही
जिवनाला मोल नाही

राहिल्या गप्पा अर्ध्या-वर्ध्या
पट उधळता कसल्या स्पर्धा

एक डाव मांडू पुन्हा
चल एकदा भांडू पुन्हा ....

निरोप पाठवून सुद्धा आता
तुला मिळणार नाही
कसा आहेस इतकं सुद्धा
आता कळणार नाही

राग येतो असा कसा
न सांगता सोडून गेलास
गृहित धरलं वचन तेवढं
न बोलता मोडून गेलास

शपथ घातली असती तर
थांबला असतास का रे?
खरच का रे माणुस जाता
होतात त्यांचे तारे?

खरच का रे दूर तार्‍यांत
बसला आहेस दडून?
तुझे देखिल डोळे लाल
झाले असतिल रडून

सगळे म्हणतात तशी मला
सवय होईल का रे?
प्राणा शिवाय शरीर नुसत
हलत राहील ना रे

मी आवरुन येई पर्यंत
आता तिथेच थांब बरं
चालतं बोलतं असणं
म्हणजे जगणं नसतं खरं

आता इथून पुढे मात्र
सोडून जाऊ नकोस
मागितलेलं वचन येवढं
तोडून जाऊ नकोस

मी आपलं बोलत राहीन
तू तेवढं ऐकत रहा
अदृष्यात असलास तरी
जाणवेल इतका जवळ रहा...

-सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे आभार,

तरी बरं आया च्या सांगण्यावरुन दोन कडवी उडवलीत.. तरीही लांबलीच भळाभळा वाहिलेली कविता लांबायचीच.. Sad