जशास तसं उत्तर

Submitted by विस्मया on 12 March, 2013 - 08:47

जशास तसं उत्तर द्यावं कि नाही याबद्दल मनात खूप गोंधळ आहे. म. गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे अवमानकारक वागणूक देणा-यास , शत्रूत्व धरणा-यासही प्रेमाने जिंकून घ्यावे असं म्हटलं आहे. काही वेळा आपण एखाद्याशी फटकळपणे वागलेलो असतो, पण त्याने तो राग मनात न ठेवता आपल्याला हवी तेव्हां मदत केल्याने पश्चात्ताप होतो. पण सर्वांच्या बाबतीत असा अनुभव येत नाही (पश्चात्ताप झालाय किंवा होईल असे वाटत नाही). अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे ?

आपले अनुभव इथं शेअर करू शकता.

या विषयाच्या अनुषंगाने माहितीपूर्ण अवांतर प्रतिसाद आले तरी चालतील.
टिंगल टवाळी/ उपहास नको ही माफक अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वतःला अशी उत्तरे देणे जमत नाही आणि आवडतही नाही.
समोरची व्यक्ती दुखावली गेली, याचा सल कायम राहतो. भले मला तिने आधी दुखवले असले तरी.
मी विसरत नाही तो प्रसंग पण त्या प्रसंगाने परत परत दुखावलो गेलो असे होत नाही.

पण जर असे केल्याने, आपल्या मनातला सल संपणार असेल, तर अवश्य तसे करावे असे वाटते.

दोन उदाहरणे देतो.

मी आर्टिकलशिप करताना, माझ्याकडून चार्ज घेण्यासाठी एक खात्यापित्या घरची गुजराथी मुलगी आली होती.
मला त्या ऑफिसमधे प्रचंड मानसिक ताण असायचा. आता तो संपला म्हणून मी आनंदात होतो आणि हसत खेळत तिला चार्ज हँड ओव्हर करत होतो. ते नेमके बॉसने बघितले. मला काही बोलण्याएवजी, तो तिला म्हणाला, " तूम कामका टेन्शन लेनेवाली नही दिखती. " ( हा कदाचित मला टोमणा पण असू शकेल. ) यावर तिचे उत्तर मस्तच होते. " सेहत क्या ऐसेही बनती है क्या ? "

माझी भाची लहानपणी जरा अपर्‍या नाकाची होती. तिची आजी ( बहीणीची सासू ) तिला चिडवत असे.
तिने एक दिवस खाडकन उत्तर दिले. " सॉस ( श्वास ) तर घेऊ शकते ना. बास झालं. नाकाचं काम तेवढंच असतं. " ४ वर्षांचीच होती त्यावेळी. पण परत आजीने कधी तिला चिडवले नाही.

जरी समोरच्या माणसाची चूक आहे असे गृहीत धरले तरी, जशास तस उत्तर देउ नये अस माझ मत आहे. . याची अनेक कारण आहेत
१. जेंव्हा आपण एखाद्याला जशास तस उत्तर द्यायच म्हणतो त्यावेळेस एकतर आपण रागावलेले असतो. त्यामुळे भावनेच्या आहारी जाउन आपली चूक होउ शकते.
२. आपली गैरसमजूत सुद्धा झालेली असू शकते.
३. मुख्य कारण म्हणजे जेंव्हा आपण जशास तस म्हणतो तेंव्हा आपण दुसर्‍या व्यक्तिच्या वागणुकीवर आपली वागणूक अवलंबून ठेवत असतो, म्हणजे एक प्रकारे आपल्या विचारांच्या दिशेचा ताबा दुसर्‍या व्यक्तिकडे आपण देत असतो, किंवा त्या व्यक्तिच्या पातळीवर आपण उतरत असतो, म्हणजे आपण आपले रहात नाही.
त्यापेक्षा, Act, never react!! हे माझे तत्व आहे. आपण स्वतः कसे वागायचे हे आपणच ठरवावे, दुसर्‍याला ठरवू देउ नये.

मी एखाद्याला पहील्या दोन-तीन वेळेस माफ करतो.... म्हणजे चक्क त्याकडे दुर्लक्ष करतो!
पण समोरचा परत परत त्याच चुका करत राहिला तर त्याला त्याच्या पातळीवर उतरुन उत्तर द्यावे लागते.... त्याचा पण प्रत्येक वेळेस उपयोग होतोच असे नाही.
कधी कधी अनुल्लेख उपयोगी पडतो तर कधी कधी करारा जवाब.... समोरची व्यक्ती, एकूण परिस्थिती आणि शक्य परीणामांचा विचार करुन योग्य तो मार्ग निवडावा हे उत्तम!

>>समोरची व्यक्ती, एकूण परिस्थिती आणि शक्य परीणामांचा विचार करुन योग्य तो मार्ग निवडावा हे उत्तम!
पण तरी देखील प्रत्येक वेळी जे काही द्याल ते तुमच्याकडेच परत येत असेल ना ? Sad

विस्मया,

आपला प्रश्न खूप ढोबळ (जनरल) आहे. मात्र तो तात्काळ वर्तनाशी संबंधित असावा असं वाटतंय. म्हणजे कोणी तुम्हाला खोटंनाटं बोलून लुबाडलं तर तुम्ही त्याला/तिला वा इतर कोणाला बदला म्हणून नंतर पद्धतशीरपणे लुबाडू नये.

या गृहीतकाच्या संदर्भात माझं विक्रमसिंहांच्या इथल्या संदेशास १००% अनुमोदन आहे.

याबरोबरच तुम्हाला जश्यास तसं म्हणजे नक्की काय हेही ठरवायला हवं. सारखाच बोचरेपणा? की उत्तराची समर्पकता? की समान हित? की परहित वा स्वहित? की कटुतेचा नाश? की आजून काही?

माझ्या मते, कोणी आपला अपमान केला मनाला लावून घेऊ नये. हेच उत्तम. मात्र आपल्या या सद्गुणाचा कोणी गैरफायदा तर घेत नाहीना, यावर बारीक लक्ष हवं. अश्या वेळी boomrang यांचा इथला प्रतिसाद सुयोग्य वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

सहकार्याबद्दल सर्वांचे आभार.

गा पै.
तुम्ही कुठल्याही अर्थाने आपले अनुभव शेअर करू शकता. Happy

सर्वांनीच छान लिहीलेय. दिनेशदा आणि विक्रमसिंहजी खूपच छान ! पटलं...
पण सध्या तरी गामा पैलवान यांच्याशी सहमत आहे. प्रत्यक्ष जीवनात कुणालाही आजवर जशास तसे उत्तर दिलेले नाही. ऑनलाईन वावरात अनेक नमुने भेटतात. आपण जसे आहोत त्यापेक्षा जास्त काहीतरी दाखवण्याच्या नादात इतरांना तुच्छ लेखत येणारे प्रतिसाद मग डोक्यात जाऊ लागतात. एका विशिष्ट लेव्हलनंतर अशांना टॉलरेट करणे जड जाऊ शकते. अशा वेळी कदाचित जशास तसे प्रतिसाद गेले असावेत. इतरही काही लोकांना अशा लोकांना असे प्रतिसाद देतांना पाहीलंय. पण अशा लोकांच्या बाबतीत फरक पडणे, स्वतःच्या चुका ओळखता येणे वगैरे घडणे ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट असते हे लक्षात येतं. स्वतःच्याच चाळ्यांनी हे लोक स्वतःची किंमत करून घेत असताना आपण त्यांचा विचार करण्यात वेळ न घालवणे हेच योग्य धोरण राहील.

गामा,

मी तितकासा अध्यात्मिक नाही पण मला कुणासाठी काही करावेसे वाटले तर निव्वळ त्या कृतीच्या आनंदासाठी ते करतो. पण माझ्यासाठी कुणी काही केले तर ते परतफेड म्हणून केले ( मी आधी केले होते म्हणून ) असेही मानत नाही. ते कायमच लक्षात ठेवतो. हे झाले कृतीच्या बाबतीत.

बोलण्याच्या बाबतीत मात्र, कुणी लागट बोलल्यास आणि ते योग्य असल्यास क्षमा मागून मोकळे होतो आणि जर ते गैरलागू असेल, तर स्पष्ट शब्दात सांगतो. पण अगदी तितक्याच कठोरपणे किंवा तश्याच शब्दात सांगत नाही.

हे विधान कुणाला गर्वाचे वाटेल, पण मी आयूष्यात ( केवळ एकमेव अपवाद वगळता ) कधीच शिवी दिलेली नाही. " तू जर खरे बोलत असशील, तर तूला शिवी द्यायची वा आवाज चढवायची गरज नाही " असे मला
वडील नेहमीच सांगत असत. आवाज चढतो कधीकधी ( तो कधीकधीच चढत असल्याने, समोरचा मात्र प्रचंड घाबरतो. ) पण शिवी नाहीच येत तोंडात कधी.

कुणी हात उगारल्यास मात्र, योग्य तो प्रतिकार करतोच. पण असाही प्रसंग अपवादानेच घडलाय.

मला विक्रमसिंह यांचे म्हणणे, अगदी पटतेय.

मला पण कधी कधी वाटतं की जशास तसे उत्तर द्यावे. एवढ्यात काही घटना अशा घडल्या की जशास तसे वागण्याचा फार मोह होत होता पण मग ती साखळी चालूच राहिल असा विचार मनात येतो .
पण आपण समजूतीने घेतले तर लोक गृहित धरायला लागतात आणि स्वतःच्या वागण्यात मात्र काही बदल करत नाहित असाही अनुभव आहे.

पण मग ती साखळी चालूच राहिल असा विचार मनात येतो>>>
अगदी.. म्हणून 'देवा ह्या लोकांना माफ कर. त्यांना ते नेमकं काय करत अहेत माहीत नाही.' असे म्हनून सोडुन द्यावे.. सासु च्या बाबतीत खूप कामी येतं!

आपण शांत बसल्याने त्यांचा विजय झाला आहे असं समोर्च्याला वाटु द्यावं.. 'देव ह्यांना माफ कर' चा जप सुरु ठेवावा.