तो कवी

Submitted by तनवीर सिद्दीकी on 12 March, 2013 - 07:56

त्याला कवी व्हायचे होते, त्याने कागद सारे घेतले
माझी वादळे 'लिहितो' म्हणाला , मी थोडे वारे घेतले

दु:खे अनावर झाली मार्गी, शिदोरी उघडावी लागली
त्याच्या कागदाचा मूड नव्हता, मी परत भारे घेतले

काही दु:खे त्रास होती, दुष्काळी वादळे खास होती
त्याला समुद्रच हवा होता, त्याने शब्द खारे घेतले

काही शल्य अंधारात आली तर काहींनी अंधार दिले
कसे अंधारप्रेम मांडले ते, का त्याने तारे घेतले?

काही दु:खे जळफळत होती, काही पूर्ण जळली होती
वेदनेने कमी भाजले, त्याने स्वत:च निखारे घेतले

त्याला कवी व्हायचे होते, त्याने वाचली माझी कविता
मीच ढ एकटा रडलो , इतरांचे त्याने 'व्वा रे’ घेतले

तनवीर सिद्दिकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users