गंधार

Submitted by आर.ए.के. on 11 March, 2013 - 02:41

येतीलही जातीलही,
ते अश्रु तुझ्या दु:खातले!
बनतीलही फुटतीलही,
ते बुडबुडे हास्यातले!

पेटतीलही विझतीलही,
ते पथदिवे मार्गातले!
सुटतीलही तुटतीलही,
ते बंध घुंगरु पायातले!

जिंकतीलही हारतीलही,
ते व्दंव्द तुझ्या मनातले!
नि:शब्द होतीलही, सांगतीलही,
ते गुज तुझ्या ह्र्दयातले!

भेटतीलही सुटतीलही,
ते मित्र तुझ्या जीवनातले!
थांबतीलही जातीलही,
ते सखे सोबती वाटेतले!

थकवेल ना तुला कधी ही,
तो ओंकार सूर्यकिरणातला!
अडवेल ना तूला कधीही,
तो हूंकार ओल्या मातीतला!
विझणार ना कधीही,
तो चंद्र हिवाळी थंडीतला!
संपणार ना कधीही,
झंकार माझ्या मैत्रीतला!
देईल उत्साह कारंजे तुला,
अंधार आजच्या रात्रीतला,
देईल नवी उमेद तुला,
गंधार दवओल्या पहाटेतला!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

लय ,वेलांट्यानी बेलबुट्टी केलेली कविता आवडली .<<<<देईल नवी उमेद तुला,गंधार दवओल्या पहाटेतला! >>>>गंधार उमेद कसा देतो,ते कळले नाही.बाकी सुंदर .