रंग लेवून आलं आभाळ !

Submitted by राजीव मासरूळकर on 10 March, 2013 - 14:27

रंग लेवून आलं आभाळ
रंगी लावून गेलं आभाळ !

लाली आली अशी
की पलाश फुले
शुक्रतारा हसे
आसमंती निळे
सोनं पिऊन आलं आभाळ !

झालं पाणी निळं
हिरवी हिरवी शेतं
रंग चराचरी
भिनले ओतप्रोत
चांदी चढवून आलं आभाळ !

शुभ्र काळे ढगं
वारा आणी वरी
थोर शिल्पकार
ढगांचा रंगारी
फाग खेळून आलं आभाळ !

पक्षी परतले
गायी झाल्या पिशा
गोड पावा घुमे
झाल्या राधा दिशा
कृष्ण होऊन गेलं आभाळ !

चकाके चांदण्या
रास खेळे दुधी
श्वेत बाहुंत घेई
चंद्र विश्वनदी
प्रेमरंगात न्हालं आभाळ !

- राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके सुंदर रंग आकाशात दिसतात,तुमच्या या कवितेत सापडतात फक्त आमच्या इथे महानगरीय जीवनातून वजा झालेले असतात हे जाणवून देणारी कविता.

सोने, चांदी, फाग ,कृष्ण, प्रेम सर्व रंग सुंदर आहेत .
एक शंका फाग खेळून येणे असा वाक्यात खरोखर उपयोग करतात का?

विक्रांतजी,
फाग खेळणे किंवा खेळून येणे हा वाक्प्रचार सध्या प्रचलित आहे असं म्हणणं तसं शंकास्पदच आहे. फाग म्हणजे रंगोत्सव किंवा होळी . रंगपंचमीच्या दिवशी एखादं मूल (किंवा व्यक्ती) वेगवेगळ्या रंगांत रंगून आल्यावर जसं दिसतं, तसंच आभाळही एखाद्या दिवशी रंगपंचमी खेळून आल्यासारखं भासतं. हे सूचित करण्याचा माझा प्रयत्न आहे त्यातून .

आपल्या या शंकेवरून मला बा भ बोरकर यांची 'गळण्याआधी' ही अद्वितीय कविता आठवली. त्या कवितेतील पहिल्या २ ओळी अशा आहेत,

गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने
आग लागल्यागत राळांचा फाग खेळती पाने !

ती संपूर्ण कविता खरोखर वाचनीय आहे .

प्रतिसादाबद्दल आणि त्यानिमित्ताने बोरकरांच्या कवितेच्या पुनःप्रत्ययासाठी मनापासून आभार !