मी विजेता

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 March, 2013 - 23:59

महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या सख्यांना खूप खूप शुभेच्छा !!!!
माझी ही कविता आपल्या सगळ्यांसाठी !!

मी विजेता

नाचती ही प्रश्नचिन्हे
फेर धरुनी का अशी
ऊरी धडधड, श्वास अवघड
आर्त हुरहुर का अशी

जीवनाच्या हर सवाला
सहज उत्तर मी दिले
लाभले जे हसत खेळत
आजवरी स्वीकारीले

आज मग का मी निरुत्तर
आज का मी पांगळी
का सुचेना मार्ग काही
आज का मी वेगळी

जोर माझ्या मनगटी
माघार ना मी घेतली
खेळ रडीचा जाहला
तेव्हाच नियती जिंकली

हार कधीही मानली ना
आसवे गाळून मी
सावरोनी घाव ऊरीचे
बाजी हर जिंकेन मी

संघर्ष माझा मित्र आता
आज नियती अंकिता
मात तुजला देऊनीया
मी विजेता... मी विजेता

रडविले मज हर घडी परी
नाही विझणे हे अता
ताठ आहे... ताठ राहीन
मी विजेता... मी विजेता

जयश्री अंबासकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संघर्ष माझा मित्र आता
आज नियती अंकिता
मात तुजला देऊनीया
मी विजेता... मी विजेता

रडविले मज हर घडी परी
नाही विझणे हे अता
ताठ आहे... ताठ राहीन
मी विजेता... मी विजेता>>> वा वा... आवडली