'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?

स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !

आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.

१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.

सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.

आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत Happy
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा, खरंच छान , अगदी ह्युमनली पोस्ट उगीच आदर्शपणाचा बुडबुडा नाही, बरेच काही चुकतही होतं, त्यावर काम करण्याची तयारी आहे हा अप्रोच आवडला.
<<+ १
बुवा,
फार पॉझिटीव आणि प्रामाणिक पोस्ट!
इतरांच्या पोस्ट्स अजुन वाचून झाल्या नाहीत , वाचून प्रतिक्रिया देइन .

वा छान धागा आणि सगळे छान लिहत आहेत.
माझे वडील, माझे सासरे आणि माझे मिस्टर ह्यांना मी त्यांच्या परीने आपआपल्या कुटूंबाला वेळ देताना पाहीले आहे. माझे वडील आई सकाळी शाळेत गेली की आजीला कधी बरे नसले की जेवण करायचे. आम्हा भावंडांनाही हवे नको ते पहायचे.
माझे सासरेही जेवण, मार्केटींग, मुलांना भरवण्यापासून सगळ करायचे.

माझ्या मिस्टरांना पसारा वगैरे आवरायचा कंटाळा येतो पण मार्केटींग, मला आणि मुलींना हवा तेंव्हा त्यांच्या बिझी शेड्ञुल मधुन वेळ देण, मला कधी बर नसेल तर घरातील चहा वगैरे करण, मुलींना हव नको ते पाहण हे करतातच. शिवाय माझ्या व मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यासाठी सहकार्य ही करत असतात.

सं.सं.

एकदम पाय पकडून माफी मागतो.
कळवळून म्हणतो, चुकले, पण रहावत नाही म्हणून लिहितो.

दि. १० मार्च, २०१३.

>>
ह्या विषयावर लिहिण्यात आत्मस्तुतीचा धोका आहे किंवा 'ह्यात काय लिहायचं वेगळं' असा विचार करुन स्वतःला थांबवू नका अशी तुम्हाला विनंती आहे. पुरुषांचे काम फक्त अर्थार्जन करणे आणि घरकाम, मुलं ही फक्त स्त्रीची जबाबदारी अशी मानसिकता आपल्या समाजात अजूनही खूप जास्त आहे. ती बदलायची असेल तर 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' असं सांगणारे पुरुष पुढे आले पाहिजेत. 'घर दोघांचं' ही जाणीव मग जास्त चांगल्या प्रकारे रुजेल. ह्या उपक्रमाचा हेतू तोच आहे ! स्मित
<<

महोदया,
हे आपण कोणत्या समाजा बद्दल म्हणत आहात?

इंटरनेट सॅव्ही मुलामुलींच्या आईबापांच्या/आजी आजोबांच्या वयात/पिढीत पुरुष (घरात) काय (घर-कामे) करीत होते ते वरच्या संपादित प्रतिसादांत येऊन गेले..

ज्यांना इंटरनेटचा गंध नाही अशा खेड्या पाड्यांत, घरी २ बिघे जमीन असेल, तर किंवा भूमीहीन शेतकरी वा नुसताच झोपडपट्टितला शहरी संसार असेल तर बाइ/बाप्या मिळून कष्टतील तरच संसार चालतो. शेण काढणे अन चारा घालणे पुरुष करेल तर बाई धार काढत असते. इ. इ. इ.

अर्थार्जनात बाईचा सहभाग मोठा तर आहेच, समाजाच्या मोठ्या भागात मोठा आहे, तसाच पुरुषाचाही हातभार आहेच.(व हे चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून आहे.Since a long time.) नक्की कोणत्या समाजात काय अपेक्षित आहे आपल्याला?

परवाच्या लोकसत्तेत 'तोंडाला पाने पुसणे' बद्दल एक लेख वाचला होता. नक्की कुणाच्या तोंडाला पाने पुसली गेलीत याबद्दल चिंतन होते. जेव्हा तुम्ही स्त्री फक्त चूल मूल पहाते, व पुरुष पैसे कमवून आणतो असे जनरलायझेशन करीत असाल, तर कठीण आहे. माबोच्या इतिहासात अनेकदा जनरलायझेशन केल्याबद्दल 'शक्ती' व 'पुरुष' यांच्यात महायुद्धे झालीत असे ज्ञानकण म्या गरीबाने जमविले आहेत..

सो,
प्लिज डिफाइन 'आपला समाज'..
मग कदाचित बाफ योग्य दिशेने भरकटेल.

पांशा ऑन
*रच्याकने : फक्कस्त स्वयंपाकघरातील कामाबद्दल बोलत असाल तर, आमच्या 'वहिन्या' कधी कधी- भावोजी, काही मदत हवी का? असे मधेच स्वयंपाकघरात डोकावून विचारतात, इतकेच सांगतो Wink
ऑफ

इसवी सन २०१३ मधला - इब्लिस.

अहो बाकी समाज जाऊ द्या. प्रत्येक पुरूष माबोकराने तो त्याच्य घरासाठी, बायकोसाठी , मुलांसाठी अर्थार्जन सोडून किंवा अर्थार्जनासहित काय करतो एवढेलिहिले तरी याउपक्रमाचा हेतू सार्थ होईल असे (मला तरी) वा टते.

इब्लिस, सं सं मिळून उत्तर देतीलच, पण माझे वैयक्तिक मत - स्त्रीला या २१व्या शतकात सुपरवुमनगिरी करावी लागते तशी सहसा पुरुषाला करावी लागत नाही. सहसा हा शब्द महत्त्वाचा आहे. Happy
इथे, बायकाच हे काम चांगलं करतात, त्यांनाच मल्टिटास्किंग जमते, संगोपन ही आईची (किंवा महिला पार्टीची) जबाबदारी आहे, अशा कोणत्याही पूर्वग्रहाला न बळी पडता आपल्या जोडीदारिणीला, संसार आपला दोघांचा आहे हे समजून साथ देणार्‍या पुरुषांनी लिहावे असे अपेक्षित आहे असे वाटते.
तुमचेच उदाहरण द्यायचे तर, शेण काढणे आणि दाणा वैरण करण्याबरोबर वेळप्रसंगी धार काढायची तयारी आहे; किंवा ती बाजारला जाते तेव्हा दमून येते त्यामुळे बाजारच्या दिवशी मीच धार काढतो असे काही लिहिणे अपेक्षित असावे.

असेल बुवा.
माझे चुकले असावे. माफी आधीच मागितली आहे. मी पाहिलेला समाज वेगळा असावा. हवे तर पोस्ट उडवितो.

>>कोणत्याही पूर्वग्रहाला न बळी पडता आपल्या जोडीदारिणीला, संसार आपला दोघांचा आहे हे समजून साथ देणार्‍या पुरुषांनी लिहावे असे अपेक्षित आहे असे वाटते.<<

म्हणजे जे अ‍ॅप्रॉक्स. ३०-४० कोटि संसार भारतात सुरू आहेत त्यापैकी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट संसार सोडा, किमान ५१%, म्हणजे लेट्स से १७.६ कोटी संसार उगाच ब्वा बाई ओढून नेतेय म्हणून धकताहेत. असे म्हणायचेय का?

माबोवर सक्रीय असलेल्या (लेट्स से) सुमारे ४० सदस्यांपैकी १० म्यारिड आहेत. इथे ५ पुरुष स्वतःबद्दल अन ५ स्त्रियांनी बाबांबद्दल लिहिलेच आहे. सरप्रायजिंगली, सगळ्या मम्मी लोक्स आपल्या नवर्‍याला बाबांपेक्षा कमी चांगला म्हणताहेत असे दिसले. त्यांच्या मुलग्या काय म्हणतील ते आजपासून १५-२० वर्षांनंतरच्या प्रोजेक्शनमधे ऐकायला आवडेल.

उडवू नका हो.
पण तुम्ही खरेच निवांत पुरूष मंडळी आणि सतत धावत असलेल्या स्त्रिया असे चित्र बघितले नाही असे म्हणता? किंवा करियरपेक्षा कुटुंबाला झुकते माप देणारे पुरूष स्त्रियांइतकेच आहेत म्हणता?

१७.६ कोटी संसार उगाच ब्वा बाई ओढून नेतेय म्हणून धकताहेत. असे म्हणायचेय का? >>> इब्लिस, असे काही कोणीही कुठल्याही पोस्टीत म्हणल्याचे मला आढळले नाहीये.
'मायबोलीवर असणारे पुरुष सदस्य आपल्या घरात बायकोचा भार कमी करायला काय वाटा उचलतात' असा साधा सोपा प्रश्न विचारला आहे. आणि बर्‍याच पुरुषांनी वर आपापल्या घरातील सहभागाविषयी अतिशय सरळ, प्रामाणिकपणे, झाल्या असल्यास काही चुकांची कबुली देत व सुधारणेची इच्छा दर्शवत लिहीले देखील आहे.
तेव्हा इथे बायका संसार ओढताहेत की पुरुष वगैरे अश्या प्रकारची तुलना करायची अजिबात अपेक्षा नाही.
(हे सर्व माझे वैयक्तिक पोस्ट आहे.)

वैद्यबुवा, मनस्मि, केदार जाधव, मुकेश्वर कुलकर्णी - पोस्ट्स अतिशय आवडल्या.

पाहिले आहे. पण मी जनरलायझेशनबद्दल बोललो मघाशी.
बहुतेक घरांत सौ. 'ह्यांना' सांगत असतात, 'त्या अमकीचे हे बघा, कसे सकाळी उठून फिरायला जातात, भाजी आणतात, अमुक तमुक इ. इ. इ.'
हा सार्वत्रिक अनुभव नाहिये का?

दोघांनी मिळून संसार उभा करायचा निर्णय घ्यायचा असतो.

हा निर्णय घेताना मुलगा किंवा मुलीची तितकी परिपक्वता आज असते का? की ही समजूत जसे जसे जोडपे जुने होते तशी मुरलेल्या लोणच्या सारखी खोल झिरपत जाते? करियरला झुकते माप देईन, कुटुंब नको असे जर स्त्रीने म्हटले तर ती, कीम्वा, मला फक्त करियर हवी. कुटुंब नकोच. असे मुलाने म्हटले, तर तो किंवा ती, आजच्या समाजात लग्न करतात, की ओपन रिलेशन मधे जातात??

मी म्हटले समाज कोणता ते डिफाईन करा. आपण १२० कोटी लोकसंख्येबद्दल व कित्येक लाख एन आर आय बद्दल बोलत आहोत. हे ब्ल्यांकेट जमत नाही. झेपत नाही.

१७.६ कोटी संसार उगाच ब्वा बाई ओढून नेतेय म्हणून धकताहेत. असे म्हणायचेय का? >>> इब्लिस, असे काही कोणीही कुठल्याही पोस्टीत म्हणल्याचे मला आढळले नाहीये.
<<
ओके.
वैम आहे, तसेच मीही माझेच वैम लिहीत आहे.
..

'मायबोलीवर असणारे पुरुष सदस्य आपल्या घरात बायकोचा भार कमी करायला काय वाटा उचलतात' असा साधा सोपा प्रश्न विचारला आहे
<<<

कुठे विचारला आहे?? नक्की कोणता भार? तो प्रत्येक घरात असतो का? मी पहिल्या प्रतिसादात बोल्ड केलेले वाक्य कृपया पहा.

>>१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? <<

प्रापंचिक जबाबदारी म्हणजे नक्की काय? मुलांना आंघोळी अन कपडे घालणे, की अधिक काही??

बर्‍याच पुरुषांनी वर आपापल्या घरातील सहभागाविषयी अतिशय सरळ, प्रामाणिकपणे, झाल्या असल्यास काही चुकांची कबुली देत व सुधारणेची इच्छा दर्शवत लिहीले देखील आहे.
<<
अशी पोस्ट लवकरच लिहीन. सध्या फार झोप येते आहे.

चुकांची कबुली देत व सुधारणेची इच्छा दर्शवत.
<<

presumption of guilt.

"घर दोघांचं असतं"

आम्ही दोघांनी मिळून काय केलं, अन आमचं घर कसं उभं राहिलं? हे वाचायला जास्त आवडलं असतं. केवळ महिला दिन आहे म्हणून पुरुष दीन आहेत व त्यांच्या चुकांची कबुली चुपचाप दिली तर बरे, हा टोन धाग्यात दिसला. तोच पसरवतो, अन तीच आवरते असे नसते. असो.

बिल झालं माझं. शुभ रात्री.

कुठे विचारला आहे?? >> एकुणात विचारला आहे.
नक्की कोणता भार? >> कोणता भार हे प्रत्येकाने आपापल्या घरात तपासायचे, घराप्रमाणे बदलेल.
तो प्रत्येक घरात असतो का? >> प्रत्येक घराचे कोणीच सांगू शकत नाही, ज्याने त्याने तपासून पहावे लागेल.
ज्या घरांमध्ये आहे, व ज्यांना जाणवला आहे व ज्यांनी त्यात वाटा उचलला आहे, ते लिहीत आहेत / लिहीतील. Happy

चुकांची कबुली देत व सुधारणेची इच्छा दर्शवत. >> यात आपण माझ्या पोस्टमधले त्या आधीचे 'झाल्या असल्यास' हे शब्द जाणीवपूर्वक गाळलेले दिसतात. Happy

यात आपण माझ्या पोस्टमधले त्या आधीचे 'झाल्या असल्यास' हे शब्द जाणीवपूर्वक गाळलेले दिसतात.
<<
झाल्या केल्या वै नाहित असे मी प्रतिज्ञापत्र देतो.
आता,
चुका झाल्याच नसतील, तर तुमच्या मूळ पोस्टचा रिलेव्हन्स गायब होतो. अन, चुका फक्त एकाच बाजूने नेहेमीच होतात हे पुन्हा प्रिझम्प्शन नाहिये का?

वर येऊन गेलेल्या बाबांच्या गुणगान पोष्टींत आई कंपनी किती वेळा नोकर्‍या करणार्‍या आहेत? बाबांनी नोकरी सांभाळून इतकं केलं असं कौतुक च फक्त आहे नं?
***
ताई, प्रत्येकाने स्वतःला विचारायचे, घराप्रमाणे बदलेल, ज्याने त्याने तपासायचे, हेच मी म्हणतो आहे. जनरलायझेशन नको. धाग्याची मॉडिफाईड चारोळी सुरुवात वाचा हो. लै चिडचिड झालिये वाचून माझी.

केवळ महिला दिन आहे म्हणून पुरुष दीन आहेत व त्यांच्या चुकांची कबुली चुपचाप दिली तर बरे, हा टोन धाग्यात दिसला. तोच पसरवतो, अन तीच आवरते असे नसते. असो. >>> धाग्याच्या मूळ हेतूवरच शंका घेतली जाऊ लागली आहे म्हणून हे उत्तर देते आहे. तुम्ही चारोळी सोडून इतर प्रस्तावना वाचलीत का ? तिथे विचारलेले प्रश्न वाचले का ? जे खर्‍या अर्थाने परस्पर सामंजस्याने सहजीवन जगतात त्यांनी त्याबद्दल लिहावे असे आवाहन केले आहे. इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून. जे करत नाहीत त्यांनी लिहायचेच नाहीये. सकारात्मक अनुभव लिहिणारे दीन कसे ?

तुम्ही बोल्ड केलेल्या पहिल्या वाक्याबद्दल लिहायला आवडलं असतं पण ती चर्चा इथे सुरु केली तर धागा ( अजून ) भरकटेल हे नक्की. चारोळीनंतर आलेला 'बहुतकरुन' किंवा मृदुलाने वापरलेला 'सहसा' हा शब्द महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा सांगू इच्छिते. तुमच्या घरात तसं चित्र नसेल तर चांगलंच आहे. त्याबद्दल लिहावं, लिहिण्यासारखं नसेल तर इतरांच्या सुजाण असण्याचं कौतुक करावं एवढीच अपेक्षा आहे

आम्ही दोघांनी मिळून काय केलं, अन आमचं घर कसं उभं राहिलं? हे वाचायला जास्त आवडलं असतं. >>> ह्याबद्दलही नक्की बोलू कधीतरी. त्या प्रस्तावनेत हेतू बोल्ड वाक्यात लिहिला आहे तो तुम्ही वाचलेला दिसत नाही.
आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

महिला दिनाचं औचित्य साधून सुरु केलेला धागा म्हणून त्याने तिच्याविषयी लिहावे असे साधे गणित आहे. ह्या धाग्याचा फोकस वेगळा आहे, तो आहे तोच राहू द्यावा ही विनंती.

बुवा, खूप छान पोस्ट.

एक पर्स्पेक्टिव म्हणून नोंद करून ठेवत आहे. घरातील सर्व कामे तसेच घर एकहाती चालवावे लागले म्हणजे बरोबरीच्या पार्टनरचा कामातील हात भार व जाणीव किती अमूल्य आहे हे समजते.

बरेचदा असे होते की माझी पद्धत तीच बरोबर पण तेच काम दुसर्‍या पद्धतीने, वेगळ्या वेळी, मुलांच्या कलाने, बाबाच्या सिस्टिम मध्येदेखील उत्तम होते. हे घरच्या मुख्य स्त्रीला कळते पण वळत नाही अशी परिस्थिती होते. फ्री हँड दिला व जनरल ऑब्जेक्टिव एकच असले म्हणजे मुलांना वेळेवर खाणे, शाळा, खेळ, झोप. त्यांची सेफ्टी, घराची स्वच्छता ह्यात एकवाक्यता असली म्हणजे घरातील बाप्यांना ते कसे करायचे ह्याचे स्वातंत्र्य हवे.

माझे बाबा पण घरी आईला स्वयंपाकात मदत करत. आई लग्नानंतर नोकरी करत शिकली. तसेच माझा भाऊ देखील यूनो च्या एका असाइनमेंट वर घाना मध्ये गेला होता तर एकट्यानेच सर्व घर मॅनेज केले होते.

बुवांची पोस्ट मस्त. एकदम प्रामाणिक.

इंटरनेट सॅव्ही मुलामुलींच्या आईबापांच्या/आजी आजोबांच्या वयात/पिढीत पुरुष (घरात) काय (घर-कामे) करीत होते ते वरच्या संपादित प्रतिसादांत येऊन गेले..<<<
हे जरी खरे असले तरी स्वतःच्या हाताने प्यायचे पाणी सुद्धा न घेणारे, "आता उद्या म्हणाल पुरूषांनी स्वैपाक करायला काय हरकत आहे?" असे कुत्सित शेरे मारणारे नरपुंगव मी माझ्या आजूबाजूला बघितले आहेत माझ्याच पिढीत.
माझे बाबा, शूम्पीचे बाबा हे तसे अपवादच होते त्यापिढीत एवढ लहानपणापासून बघितल्याचं नक्की माहितीये. तसंच वरती लिहिलेले चित्र आजही माझ्या पिढीतही अस्तित्वात आहेच. आधीच्या पिढीपेक्षा कमी असेल पण आहे हे नक्की.

आमच्या लग्नाला आतां तीन तपं उलटलीत. सामाजिक परिस्थितीत व आमच्या मानसिकतेतही बदल झाले आहेत. तरी पण कांही मूलभूत घटक कायम आहेत-
१ ] अजूनही आम्हीं अधून मधून एकमेकांवर डाफरतो, माझ्यापेक्षां तिचं डाफरणं अधिक वेळ नसलं तरीही त्याची तीव्रता मात्र अधिक असते; पण त्याचा कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम होत नाही व हा दोघांचाही अधिकार आम्ही सुरवातीपासूनच मान्य केलाय;
२] माझ्या बायकोवर तिच्या कुटूंबाच्या मोठ्या जबाबदार्‍या होत्या; मीं त्या किती प्रमाणात उचलूं शकेन हें तिला सांगणं मला शक्य नव्हतं. पण लग्नानंतरही तिने त्या जबाबदार्‍या पार पाडण्यात तिच्या आड मी कधीही येणार नाही, हें माझं मनापासून व न मागतां दिलेलं वचन मीं प्रामाणिकपणे पाळलं व शक्य तेवढी त्यांत तिला मदतही केली;
३] भाज्या, मासे आणणं हा माझा लहानपणापासूनचा आवडीचा विषय होता [ 'पॉकेट मनी' ही संकल्पना रुजली नव्हती त्यामुळे 'मॉर्नींग शो'साठी आईकडे पैसे मागायला हे काम सोईचं असायचं !]. लग्न झाल्यावर हें काम मीं सहजगत्या स्विकारल व आजतागायत करतोच आहे; त्यात मुद्दाम जबाबदारी अंगिकारण्याचा अजिबात भाग नाही;
४] आळसामुळे घरातील आवराआवर करण्यासारखीं कामं मी शक्यतो टाळतोच पण त्यात पुरुषी अहंकार वगैरेचा संबंध नाही. जेवण करणं व आनुषंगिक स्वयंपाकघरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा माझ्या आवडीचा विषय, विशेषतः निवृत्तिनंतर तर अधिकच. त्यामुळे बायकोला मदत होते , ही सहजगत्या झालेली पण मला बरी वाटणारी गोष्ट.
आमच्या कांही आवडी सारख्या आहेत कांही भिन्न. आम्ही एकमेकांच्या आवडी बदलण्याच्या भानगडीत मात्र फारसं पडत नाही. पण तिच्या संगिताच्या प्रचंड आवडीमुळे मलाही थोडासा सांसर्ग झाला असावा व माझ्यामुळे तिच्या वाचनाच्या आवडीला कांहीशी धार आली असावी. पण हेंही सहजगत्या घडलेलं.

हें बायकोला दाखवून तिच्या संमतिनेच पोस्ट करतोय.[ बिशाद काय आहे म्हणा माझी तसं न करण्याची !! Wink ]

सुरुवातीची चारोळी वाचून मला ही लई चिडचिड झाली -
'घर दोघांचं असतं
त्यात सर्वांनी वावरायचं
कुणीही पसरवलं
तरी तिनेच आवरायचं'

अशी परिस्थिती १७.६ कोटी संसारात आणि काही लाख एन.आर. आय घरात असताना संयुक्ता व्यवस्थापनाने फक्त त्याने पसरवले असे चारोळीत घातले. मला वाटते कुणीही पसरवले तरी त्याने कसे आवरले हा उद्देश धाग्याचा असावा. इथे घरातील गृहिणीचा फार संबंध जोडू नये. एक बाय-प्रोडकट म्हणून गृहिणीला जास्त वेळ मिळाला आणि तिने काही छंद जोपासले, नोकरी केली इ इ. आपले घर म्हणून पुरुषांना काय जबाबदारी वाटते हे महत्त्वाचे (उदा: कामवाली बाई आली नाही तर/नसेल तर माझी स्वताची खरकटी प्लेट मला कोणाची जबाबदारी वाटते.). हे महिला दिनाला धरून कदाचित होणार नाही, पण मला वाटते त्या चर्चेतून जो काही कणभर बदल घडेल तो खूप काळ टिकणारा आणि जाणवणारा असेल.
तसेच गृहस्थधर्म स्वीकारला म्हणजे घर आवरणे, बायकोला छंद जोपासण्यासाठी वेळ देणे इ इ पेक्षा इथे फक्त घरातील गृहिणीला मग ती त्या पुरुषाची आई असेल, लिव्ह-इन पार्टनर असेल, नाहीतर वृद्ध बाबांची काळजी घेणारी मुलगी/सून असेल असा थोडा व्यापक धागा हवा होता. महिला= बायको हे नकळत अधोरेखित करणारा हा धागा आहे. पण एका नवीन सुरुवातीसाठी नवरा-बायको हे गृहीतक ठीक आहे. हा धागा वेगळा आहे आणि त्यासाठी निश्चितच संयुकता व्यवस्थापनाचे अभिनंदन केले पाहिजे.

>>थोडं फ्लॅटरींग आहे असं वाटतंय पण आदर्शवादी नक्कीच ..
सशल,
Happy खरे तर माझ्या पुरते माझे पोस्ट realistic and practical आहे, आम्ही तसे जगत आहोत, प्रयत्न करत आहोत. आदर्शवादी आहे का नाही ते मला माहित नाही.. कारण what works for us may not work for all.. but sure we can always draw from others experience- that was the whole point of the post!
[गंमत अशी आहे की अगदी गोखल्यांची चारोळी वाचून देखिल वेग वेगळे अर्थ लावले जात आहेत.. ईतके की आता त्याचेच 'रसग्रहण' केले जाईल का काय अशी भिती वाटते आहे Happy पण याचाच अर्थ प्रत्येकाची जशी पूर्वपिठीका, पार्श्वभूमी व जडण घडण असेल तसेच त्याला दिसेल.. हे असे ऊपक्रम व चर्चा आपापल्या चष्म्यांवरची धूळ साफ करायला मदत करतात हे मात्र निश्चीत! ]

मला सर्वात आधी वाटायचे की, ज्यांच्या बायका नोकरी करतात , ते पुरुष घरकामात त्यांच्या बायकांना मदत करतात.
मग आजूबाजूला पाहिले (शाळा, कॉलेजात असताना वगैरे) बर्‍याच दाक्षिण्यात लोकांत (प्रांतीय वाद नाही/नकोय) मैत्रीणीच्या बाबांना/भावांना/काकांना नेहमी लादी पुसणे,नाश्टा बनवणे वगैरे घरकामं करताना पाहिलीय. पण मराठी/गुजराती वगैरे आपली मानसिकता जपून असतात.
पण आज ह्या मतावर आले की हा वृतीचा भाग आहे प्रत्येकाचा , त्याच्या समजुतीचा भाग.

कारणआजही अगदी आजूबाजूला (आजच्या काळातलेच)वावरणार्‍या "बहुतेक" पुरुषांमध्ये , कसलीच जाणीव वा खंत नसते. किंबहुना तो त्यांचा प्रांतच नसतो की अरे, आपल्याला हे काम करायला पाहिजे.
कारण वर्षानुवर्षे, त्यांनी असेच पाहिले असते की, हे आईचेच काम आहे. ना आईने सांगितले की बाबांने समजावले वा (बाबाने)कृतीतून दाखवले त्या मुलाला. मग मोठे झाल्याव्र त्यावर आळशीपणाचा कहर सुद्धा चढतो आणि घरातली कामं करायची असते हि जाणीव होण्याचा प्रश्ण उरत नाही.
काही जण करतात, ते सुद्धा उपकार म्हणून. ये तो हमारे घर मे मां हि करती थी, तुम्हारा नसीब है मै तुम्हे मदद करता हुं.
नाहितर आईने पाहिले असते तर तिला वाईट वाटले असते, तिच्या एकुलत्या एका मुलाची बायको त्याला घर कामाला लावते.
हे अस्ले डायलॉग....
असो, एक निरिक्षण लिहिलेय.

जे अशी भागिदारी मनापासून करतात, त्यांचे अभिनंदन!!

नमस्कार.

आत्ता धागा पूर्ण वाचू शकलो. संकल्पना छान आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आपापल्या संसारापुरते लिहावे ही अपेक्षाही पुरेशी स्पष्ट करण्यात आलेली आहे. इब्लिस यांच्या शंकाही काही प्रमाणात योग्य वाटत आहेत की जनरलायझेशन केल्यासारखा टोन का असावा आणि संसं यांचे त्यावरील स्पष्टीकरणही योग्य वाटत आहे की स्वतःचे अनुभव येथे लिहावेत, या धाग्यान्वये त्या दिशेने आपल्या मनात काही विचार सुरू झाले का हे लिहावे. एकुण, मला तरी, फार उपयुक्त धागा वाटत नसला तरी महिला दिनाच्या निमित्ताने सुयोग्य मात्र वाटत आहे. दर वर्षी वेगळे तरी काय करणार या निमित्ताने? मुळात स्त्रीबद्दल एक किमान आदर व समानतेची भावना असावी या दृष्टीने लोकांचा प्रवास कितपत होत आहे हे जाणून घेणे हे या धाग्यान्वये होईलच असे वाटते.

संसारात माझ्या अनेक चुका झाल्या आणि अनेक गोष्टी मी तथाकथित 'पुरुषपण' बाजूला ठेवून केल्या. दोन्ही बाजू सांगतो, याचे कारण मी माझा बराच वेळ मायबोलीच्या व्यासपीठावर घालवतो आणि येथील सदस्य हे अगदी वाद झालेले असले तरी माझ्यापुरते माझ्या आयुष्यातील कोणीतरी महत्वाचे व हक्काचे वाटतात. त्यामुळे, आधीही अनेकदा मनमोकळेपणाने लिहीले आहे तसे आजही लिहीतो. खरे तर स्वतंत्र लेखाचे पोटेन्शिअल असलेला विषय आहे, पण आटोपता घेऊन लिहितो.

१. सासू सून कुरबुरी - १९९३ साली लव्ह मॅरेज झाले आणि सहा महिन्यातच प्रेमविवाह हा एक इतर अनेक ठरवून करण्यात आलेल्या विवाहांपेक्षा फार काही वेगळा नसतो हे लक्षात आले. नेमके भांडण कधीच झालेले नसले तरीही माझी आई व पत्नी यांच्यात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू झाले ते पार मार्च २०१० मध्ये आईला कर्करोग झाल्याचे कळेपर्यंत चालूच राहिले. यात 'आपण वेगळे होऊयात का' ही पत्नीची कधी तीव्र तर कधी संयमीत इच्छा मी नेमकी दाबली नाही, पण माझ्या वक्तृत्वाच्या जोरावर तिच्या मनातून काढून मात्र टाकली. मी एकुलता एक असल्याने माझ्या आई वडिलांना आपला आधार हवाच हे विविध तर्‍हेने व विचार गळी उतरवण्याचे कौशल्य वापरत वापरत शेवटी पटवून दिले. यातून माझे आई वडील सुखी झाले. मीही सुखी झालो की ताटातूट झाली नाही. (एक अवांतर - माझ्या आई वडिलांना मी त्यांच्या लग्नानंतर १२ वर्षांनी झालेलो होतो, त्यामुळे मुळातच त्यांच्यात आणि माझ्यात जवळपास दिड पिढीचे अंतर झाले, जे इतरांपेक्षा जास्त होते. त्यामुळे त्यांचे विचार अधिक जुने व पारंपारीक होते). मात्र या सगळ्यात पत्नीला 'आपला संसार' ही भावना निर्माण झाल्यासारखे वाटूच शकले नाही. 'काहीतरी आपण दोघांनी मिळून केले' अशी भावना न रुजण्यास मी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. याचे कारण माझ्या आई वडिलांनी संसारात अतिशय सक्रीय सहभाग घेणे चालूच ठेवले. विशेषतः याचा परिणाम असा होतो की नातेवाईक मंडळी 'आज भूषण यशःश्रीकडे जायचे आहे' असे न म्हणता 'सुमित्रा काकू व आप्पाकाकांकडे जायचे आहे' असे म्हणतात. 'लोक काय म्हणतात त्याने फरक पडत नाही' हे गुळगुळीत विधान पत्नीला पटवून देणे फार तर वर्षभर परवडू शकते. नंतर माणसाला आयडेंटीटी हवी असते. ते गैर वाटत नाही मला तरी. अजूनही माझे ८१ वर्षाचे वडील घरात जातीने लक्ष देतात, इतके, की घर म्हणजे जणू एखादी संस्था चालवावी तसे ते शिस्तीत सगळे घडवून आणण्याच्या मागे असतात, आग्रही असतात. मी वेगळे व्हायला होकार दिला असता तर मने गढूळ झाली असती, ताटातुटीचे दु:ख झाले असते, आईच्या डोळ्यातले पाणी पाहवले नसते, पण हे सगळे एकदाच झाले असते. नंतर तीच गोडी पुन्हा मिळालीही असती. मुख्य म्हणजे आई बाबा त्यांच्या आई बाबांपासून वेगळेच झालेले होते की? त्यामुळे अजूनही 'फक्त तुझे आणि माझे घर' ही भावना मी पत्नीला देऊ शकलेलो नाही.

२. अपत्यप्राप्ती - अपत्यप्राप्ती व्हावी या प्रयत्नांत मी तिच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. स्वतः कधीही टेस्ट्सना लाजलोही नाही अथवा 'मी काय म्हणून चेकिंग करावे' अशी भूमिकाही घेतली नाही. याशिवाय, मुलासाठीचे प्रयत्न करत असताना अथवा सोडून देताना, दोन्ही वेळा मी तिला अतिशय नीट समजावून सांगितले की यापलीकडेही एक खूप चांगले जीवन असते. आत्मस्तुतीचा धोका पत्करून सांगतो की आज ती स्वतःच आजूबाजूचे सर्व प्रकार पाहून म्हणते की आपल्याला काही नाही हेच बरे आहे. तसेही, मुलाने म्हातारपणी आपल्याला सांभाळावे या इच्छेला आता तितकासा रिलेव्हन्सही राहिलेला नाही कारण सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेतही. तिच्या मनातील कमीपणाची, अपूर्णपणाची जाणीव नष्ट करण्याचे श्रेय मी मला वक्तृत्वशैली व संवादकौशल्य देणार्‍या तसेच दुसर्‍याचे मन खोलवर जाणणारे एखादे सहावे इंद्रिय देणार्‍या भगवंताला नम्रपणे देऊ इच्छितो.

३. व्यक्तिमत्व विकास - २००८ पर्यंत माझ्या नोकरीत प्रचंड प्रवास होता. तिच्या नोकरीत अजिबातच प्रवास नव्हता. तोवर घरात तिच्याकडे लॅपटॉप वगैरेही नव्हते. टीव्ही सतत आईच्या ताब्यात असायचा. नातेवाईक आले तर 'रिप्रेझेंटेशन' आई हक्काने स्वतःकडे घ्यायची ज्यातून माझ्या पत्नीचे स्वतंत्र व्यक्तीमत्व कसे आहे हे नातेवाईकांपर्यंत पोचायचेच नाही. माहेर आणि सर्व मित्रमैत्रिणी प्रामुख्याने कोल्हापूरला होते तिचे. त्यामुळे मी आठ आठ दिवस घरात नसलो की यशःश्री नुसती आमच्या खोलीत काहीतर करत पडून राहायची. मी आलो की मला त्यावरून बोलायची. मला प्रॉब्लेम समजत असे. आम्ही रोज रात्री जेवण झाले की लाँग ड्राईव्हला जायचो. एक दिवस मी असेच तिला फिरायला घेऊन गेलो आणि तब्बल अडीच तास मी तिच्याशी बोलत होतो. तिला सांगितले की तुझ्या दुर्दैवाने तुला स्वतंत्र संसार देऊ करणारा नवरा मिळालेला नसला तरीही आयुष्यात करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या मी प्रवासात असताना तू इथे करू शकतेस. तू रेग्युलर पार्लरला जात जा, एवढे पैसे कमवतेस तर उत्तमोत्तम ड्रेस, दागिने आणि अ‍ॅक्सेसरीज घे. जीम जॉईन कर. तुझा कोल्हापूरचा ग्रूप तुला अनेकदा वार्षिक संमेलनाला बोलावतो तर सरळ चार दिवसांची रजा काढून माहेरी जाऊन येत जा. मी तिला खर्चाच्या बाबतीत आजवर एकदाही काहीही बोललेलो नाही. तिला त्या रात्री नीट समजावून सांगितले की तू स्वतःसाठी जितके काही छान छान करशील तितकी चीअर्ड अप राहशील. तुझा हासरा चेहरा बघणे हे माझ्याही घरी लवकर येण्याच्या इच्छेमागचे एक मुख्य कारण ठरेल. सरळ सोशल हो. मिसळ लोकांमध्ये! बॅडमिंटनमध्ये डिस्ट्रिक्ट लेव्हलला तिसरी आली होतीस, पुन्हा बॅडमिंटन सुरू कर. मला वाटते की बायकांनाही नवर्‍याकडून असे काही ऐकावेसे वाटत असावे. ती एकाग्रचित्ताने माझे म्हणणे ऐकत होती आणि तिच्या चेहर्‍यावर नवलही दिसत होते की मी तिचा एवड्घा विचार मनातल्या मनात करत असेन. आज तिच्याकडेच मला द्यायला वेळ न आही अशी उलट व गंमतीशीर परिस्थिती आलेली आहे. अनेक प्रकारचे ग्रूप्स, शॉपींग, जीम, पार्लर, स्वयंपाकातील वैविध्य, आऊटिंग हे तिच्या जीवनाचे तितकेच महत्वाचे भाग बनलेले आहेत. ते तिला शोभतातही कारण ती कल्पतरू डेव्हलपर्स या मुंबईच्या कंपनीच्या पुणे ऑफीसची ए जी एम - लँड अ‍ॅक्विझिशन आहे. सिनियर पोस्टला आहे आणि मी कमवत होतो तेव्हा माझ्यापेक्षा कितीतरी अधिक कमवत होती. आता मी घरी असतो पण ती काम करतेच. ती वरिष्ठ पदाला पोचण्यात माझे श्रेय काहीही नाही , पण तिचे व्यक्तीमत्व अनेक पटींनी खुलवण्यात मात्र मी स्वार्थीपणे बर्‍यापैकी श्रेय घेऊ इच्छितो.

४. आर्थिक नियोजन - ती बी कॉम डीबीएम व नुकतीच एम बी ए झाली. आर्थिक नियोजनात तिला रस असल्यामुळे मी 'सेव्हिंग्ज' करणे हे काम पूर्णपणे तिच्यावर सोडून दिले. माझा पगार घराचे हप्ते, घरखर्च व इतर सर्व खर्च यात व्यतीत करायचा व तिच्या पगारातून तिने हवे तसे सेव्हिंग करायचे हे आम्ही ठरवले. तिच्या नियोजनात मी अजिबात हस्तक्षेप केला नाही. फक्त माहिती मिळवत राहिलो की ती कसे नियोजन करत आहे. या पातळीवर तिला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ केले.

५. घरकाम - मी स्वतः धुणे धुणे, भांडी, फरशी व केर अश्यापासून ते कोणत्याही कामास लाजत नाही. वर दिलेली चारोळी आम्हास लागू पडत नाही. नियमीत घर आवरतो. अनेक कामे करतो. तिला मदत करतो. याबाबतीत तिची अजिबात तक्रार नसते. वर मामींचा एक मुद्दा मला फारसा पटला नाही. ज्या दिवशी मैत्रिणी आल्यावर पत्नी पतीला म्हणू शकेल की 'जरा चार कप चहा कर रे' तो खरा सुदिन हे मामींचे विधान मला पटले नाही. हे समानतेचे चिन्ह असेलही. पण माझ्या घरी अगदी तिच्या माहेरचे जेवून उठले तरी त्यांची ताटे मी उचलतो व मला त्यात काहीही वाटत नाही. १९९८ पासून दोघांचेही पगार घसघशीत झाल्यानंतर मी निर्णय घेऊन घरात सरळ दोन बायका बहुतांशी कामांसाठी लावल्या व आई आणि पत्नी या दोघींनाही फारशी जबाबदारी पडणार नाही याची तेव्हापासून आजतागायत काळजी घेतली. ते करताना प्रामुख्याने आईचा विरोध होता की घरातल्या माणसाला काम हे पडतेच, कशाला बायका लावायच्या? त्यावर मी स्पष्टपणे भूमिका मांडली की प्[ऐसे कमवण्याचा मूळ हेतूच आपले जीवन अधिक सुविधायुक्त करणे असा असायला हवा व ते मी करणार. आज माझ्या पत्नीला, त्याचमुळे, घरात फारसे काम पडतच नाही. त्यात आता मी घरात असल्याने अनेक कामे मीच करत असतो. नोकरी सोडतानाही मी तिला म्हणालो होतो की जर मला लगेच दुसरी नोकरी मिळाली नाही तर मी घर बघणार, तू पैसे मिळवत राहा. (यात, तिने पैसे मिळवणे, मिळवत राहणे ही जबरदस्ती आहे असे वाटून घेतले जाऊ नये).

६. वेळ - वेळ मात्र मी अतिशय कमी देऊ शकलो. एक तर प्रवास, दुसरे म्हणजे माझे सोशल सर्कल आधीपासूनच खूप मोठे होते. तिची ही तक्रार मी फारशी कधी दूर करू शकलो नाही याची खंत आहे, पण आता ती तक्रारही रिलेव्हंट नाही कारण आता तीही तितकीच, किंबघुना अधिक सोशल झालेली आहे.

७. अल्कोहोल व स्मोकिंग - माझ्याबाबत तिच्या असलेल्या या दोन तक्रारी मी आजतागायत एकदाही निवारू शकलेलो नाही. हे समाधान मी तिला देऊ केलेले नाही, ही खंत मनात आहे, प्रयत्न चालू आहेत इतकेच म्हणू शकतो. ती अंडेही खात नाही आणि तिला कोणते व्यसनही नाही. मात्र एग करी, मिसळ, गाजर हलवा, मिक्स व्हेज आणि असे काही पदार्थ ही तिची खासियत आहे.

८. प्रत्यक्ष स्वयंपाक - हा मात्र मी करू शकत नाही. वेळ पडलीच तर मी तिला यात फक्त ती सांगेल ती मदत करू शकेन, स्वतःहून फारसे काही करू शकणार नाही.

९. संवाद - याही आघाडीवर मला सुधारणा घडवून आणायची आहे. अधिकाधिक संवाद करणे, एकमेकांचे महत्व एकमेकांसाठी किती आहे हे अप्रत्यक्षरीत्या जाणवून देत राहणे ही माझी जबाबदारी आहे. पण नुसतेच आय लव्ह यू, आय मिस यू म्हणणे मला अतिशय कृत्रिम वाटते, हा माझा प्रॉब्लेम असावा. मी असे कधी म्हणतच नाही. किंबहुना त्या स्वरुपाचेही काही म्हणत नाही.

१०. स्त्री म्हणून अभिमान - एक मात्र प्रामाणिकपणे नोंदवतो की तिला मी स्त्री म्हणून कधीही कमी मानले नाही. तिच्यातला मूळ आत्मविश्वास तसाच जागृत ठेवला.

११. वादविवाद - आमचे कधी वादविवाद झालेच तर ते दोन ते तीन तास अबोला धरणे या पलीकडे पोचलेच नाहीत. आरडाओरडी, इतर कोणाचा हस्तक्षेप त्यात अपेक्षित करणे, मारहाण असल्या पातळ्या तर अशक्यच आहेत.

१२. छंद - माझा गझल व कविता लेखनाचा छंद तिला मनापासून आवडत नाही. मी लॅपटॉपवर असणेही तिला आवडत नाही. पण ते मी सोडत नाही. तिला पाककला, शॉपींग, आर्थिक नियोजन, सहलीला जाणे असे छंद आहेत. जे मी तिला पूर्ण स्वातंत्र्यासहित करू देतो.

एकुणात, लोणच्याप्रमाणे संसार मुरत आहे आणि स्कॉचसारखा गहिराही होत आहे. बाकी मुले नसल्याने एक मोठा आनंद नसेलही, पण तो जगाच्यामते! आमच्यामते त्यात काही दु:खच राहिलेले नाही.

गंमत म्हणून एक प्रसंगः

२७ सप्टेंबर २००५ ला माझा अपघात झाला आणि मी सहा महिने निष्क्रीय होणार हे नक्की झाले. नेमकी ८ ऑक्टोबर २००५ला यशःश्रीला आयुष्यात पहिलीच परदेशगमनाची संधी कंपनीतर्फे मिळणार होती. आई व वडील तिच्याशी चर्चा करत असताना मी स्पष्टपणे सांगितले. तिला प्रथमच संधी मिळते आहे, आठच दिवस जायचे आह्जे, आपला एवढा मोठा परिवार आणि मित्रपरिवार आहे, तिला जाऊदेत. ती जाऊन आली. मला आज ते आठवले की बरे वाटते. आपण तिच्या प्रगतीत अडथळा ठरलो नाहीत याचे.

असो. माणूस स्वतःबद्दल सांगताना नेहमीच 'स्तुती मोड' मध्ये येतो Happy

तेव्हा फार झाल्याने आता थांबतो. संयुक्ता संयोजकांचे आभार व त्या मंडळाला शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

Pages