नारीशक्ती : जागतिक महिला दिन विशेष

Submitted by अनिल आठलेकर on 7 March, 2013 - 14:45

कधीच नव्हती तुझी अपेक्षा कुणी करावी स्तुती
स्वजनांसाठी सदैव देशी स्वप्नांची आहुती..........
कधी न कळली तरी नराला तुझी किती महती
तुझीच होती कृपा म्हणुनी संसारी रमती...........

तुझ्याचसाठी असे पाळणा जणू टांगलेला
सदैव होता संसार कपाळी तुझ्या बांधलेला
अखंड झाली अशीच होळी तुझ्या भावनांची
नसे कुणाला खंत जराही तुझ्या वेदनांची......

तुला पुजिले देव्हारयातुनी अपार नेमाने
बंदिवानही तुलाच केले बळेच प्रेमाने
कधीच नव्हती तुला तरीही मुभा बोलण्याची
गृहित होती जशी कोष्टके तुझ्या मान्यतेची

कधी न होती तरी निराशा तुझ्या हास्य वदनी
माया ममता निर्झर जणू की पाझरती नयनी
किती वर्णू मी तुझी थोरवी तुझी दिव्य करणी
माता, भगिनी तुझीच रूपे तूच प्रिया-रमणी ....

इच्छांच्या सामिधेची आहुती संसारा वाहिली,
तुला वंदितो नारीशक्ती मी तूच शीळा पाहिली....
तुझे छत्र हे असो निरंतर असो तुझी साउली
तुझी लेकरे अजाण तरी तू मायेची माउली....

__अनिल आठलेकर...पुणे
०८ मार्च २०१३

(जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या समस्त मैत्रिणी, भगिनी आणि मातृतुल्य नारीशक्तीस समर्पित )

Group content visibility: 
Public - accessible to all site users