‘सृजन ‘

Submitted by अमेय२८०८०७ on 7 March, 2013 - 11:53

तुटके तुटके घास ढगांचे
नभात गहिवर साकळलेले
हलके हलके श्वास कळ्यांचे
देठापासून व्याकूळलेले

शोधी शोधी वाट दुधाची
पाडस निरसे भुकेजलेले
सोडी सोडी गाठ मधाची
ऊर जननीचे पान्हवलेले

गोरे गोरे गाल रतीचे
मदन धुंदीने लालटलेले
कोरे कोरे भाळ सतीचे
अंतिम मळवट विदारलेले

मोठा मोठा निखळे तारा
भय प्राणांचे गाठवलेले
लाटा लाटा ओती किनारा
जहर शिवाचे साठवलेले

प्रलयी प्रलयी वाढे पाणी
जाता जाता रसा तळाशी
दुलई दुलई पिंपळ पानी
शैशव अलगद हसे स्वतःशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुंदर कल्पना आणि सुरेखशी आगळीवेगळी शब्दयोजना - काय काय तुझ्या पोतडीत आहे मित्रा - पत्ताच लागत नाही......