पिपासा

Submitted by अमेय२८०८०७ on 5 March, 2013 - 11:57

ऊन माळावर लागे भुई जाय विभागून
ओल्या आठवणी गेल्या पाय वाफेचे मागून

भास क्षणाचाच तरी लुब्ध अंगणे दिपून
मृगजळात बसली नवी क्षितिजे लपून

पानगळ ये भरात मुळे शोधतात पाणी
आज वाटते करुण साऱ्या जगाची कहाणी

साफ दिसूनही सर्व खंत उरातून राही
जुने धरित्रीचे दुःख कुणा आकळत नाही

खाली वाकले डोलारे काळे तापले कळस
कोण जाणे कुणासाठी रानी पेटला पळस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा अतीशय चित्रदर्शी झाली आहे कविता मला खूप अवडली
अनेक ओळी तर फारच छान उतरल्या आहेत

फक्त विभागून ऐवजी दुभंगून व त्याही ऐवजी भेगाळून असे असते तर अधिक आवडले असते (वै म ! .........सूचना / विनंती /आग्रह वगैरे काही नाही कृ गै न)

चित्रदर्शी, वैभवशी सहमत.
वास्तवदर्शीसुद्धा.
उन्ह,माझा आवडता विषय..

भास क्षणाचाच तरी लुब्ध अंगणे दिपून
मृगजळात बसली नवी क्षितिजे लपून

हं.सुंदर.

सुंदर कविता.....

फक्त विभागून ऐवजी दुभंगून व त्याही ऐवजी भेगाळून असे असते तर अधिक आवडले असते >>>> वैवकु ला अनुमोदन

कोण जाणे कुणासाठी रानी पेटला पळस . . . .

व्व्व्वा ! संपूर्ण कविता आवडली. हृदयस्पर्शी कविता .

विभागून ऐवजी भेगाळून साठी वैवकु यांच्याशी सहमत .