आभाळगाणे

Submitted by उमेश वैद्य on 5 March, 2013 - 02:19

आभाळगाणे

तुझ्या मोकळ्या केसात
आलं नभ उतरून
तू घेता सावरून
गेली वीज चमकून
बटा बटांशी मोकळा
झोत वा-याचा झुंजतो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥१॥

तुझ्या डोळयात मावेना
उभ्या जन्माचं आभाळ
कधी धुसरशी सांज
कधी सोनेरी सकाळ
आषाढ अश्रूंचा
थेंब थेंब कोसळतो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥२॥

ढग आणतो वाहून
तुझा दुरून सांगावा
कधी बोलतो खुषाली
कधी मुक्यानेच जावा
आठवणींच्या राईत
झूला ऊंच ऊंच जातो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥३॥

तुझ्या गोरट्या कपाळा
शाप पुनवेचा बाई
लाल कुंकवाचा चांद
कसा सावटात जाई
कधी लिंबोणीच्या आड
कधी लख्ख प्रकाशतो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥४॥

तुझ्या कोसळता सरी
पीस पीस शहारते
वेड्या आशेच्या आंब्याचे
पान पान तरारते
नसला वसंत
खुळा तरी मोहरतो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥५॥

तुझ्या येण्याची चाहूल
जणू वर्षाव गारांचा
हवा सहवास वाटे
उबदार प्रहरांचा
तुझे पाऊल पडता
मनी ढोल वाजतो
माझ्या मनाचा मयुर
थुई थुई गं नाचतो ॥ खुळा धावतो सैरावेरा हो ॥६॥

उमेश वैद्य २०१३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users