तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे..

Submitted by रसप on 4 March, 2013 - 04:52

किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

मेहनतीच्या पैश्यासाठी कुणी न झिजतो आता
चोर झोपतो निवांत रात्री धनी बिचारे जागे

विठ्ठलदर्शन घेण्यासाठी अनवाणी मी गेलो
तिथे पाहिले रखुमाईशी तोही फटकुन वागे !

'गजानना*ने कधी फुंकली चिलीम होती' कळता
श्रद्धा-भक्ती चुलीत जाते, व्यसन तेव्हढे लागे

खोऱ्याने ओढावा पैसा तरी पुरे ना पडतो
आणि कुणाचे भिक्षा मागूनही व्यवस्थित भागे !

….रसप....
४ मार्च २०१३

*गजानन महाराज - शेगांव

http://www.ranjeetparadkar.com/2013/03/blog-post_4.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे
>>
हाच शेर आवडला मला फक्त (यालाच मतला म्हणतात का? Uhoh )

मला आवडली
एक ओळ अशी वाचली .......<<<<<तिथे पाहिले ; तो रखुमाईशीही फटकुन वागे ! >>>>तरी वैयक्तिक मत की त्या शेरातला राबता काही जास्त भावला नाही (केवळ माझा जिव्हाळ्याचा विषय म्हणून बोललो गै न )
Happy

किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

आणि

'गजानना*ने कधी फुंकली चिलीम होती' कळता
श्रद्धा-भक्ती चुलीत जाते, व्यसन तेव्हढे लागे

आवडले..

शुभेच्छा..

किती धावलो तरी सावली येते मागे-मागे
तुझ्या भूतकाळाशी असती तुझे बांधले धागे

शेर फार आवडला.
असाच विचार तुकारामाच्या एका कवितेत येतो:
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे