'पराभूत'

Submitted by अमेय२८०८०७ on 3 March, 2013 - 22:29

पोटासाठी शस्त्रे पेलून जीवन अवघे पणास लावत
गोठून जिगिषा बधीर डोळे मृत्युसंगे संगर खेळत
पराभूत सैन्याचा सैनिक समरी पडतो धारातीर्थी
नाही सरण - नसते वंदन, नश्वर कोळ शवांचे उरती
जखमांची विवरे खोल, विखार थिजतो, मिटती गात्रे
कसले हौतात्म्याचे मोल, देहा लुचती कोल्हे - कुत्रे
जन्मोत्सवी जे हसले त्याच्या, आप्तसोयरे दूर राहती
जिवास जात्या निरोप नाही, मरणवृत्त ना कोणा कळती
साकळलेला रक्तथेंबचि भाळावरती लावी विभूती
रक्तचि झाले गंगौदकही, रक्तचंदनी देहाभवती
मृत्युश्लोक नशिबी नाही, किरवंतांचे आन्हिक नाही
देह सांडला उघड्यावरती, काळ तयांचे संचित पाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईग्ग! अत्यंत परिणामकारक कविता.
पण....
तुजसाठी जनन ते मरण, तुजसाठी मरण ते जनन..

कार्गिलच्या वेळेला खरच वाटलेलं की यांच्या जखमांच्या वेदना शेअर करता आल्या असत्या तर?... तेवढेही भाग्य नाही आमचे. आज तुमची कविता वाचून पुन्हा तीच भावना जागी झाली.

अतिशय प्रत्ययकारी वर्णन.... मनाच्या आरपार गेले....

पण "कर्तव्य" करीत असता आलेलं कोणतेही मरण (माझ्यामते तरी) श्रेष्ठच ....
"तेथे कर माझे जुळती".....

अश्विनिजी, शशांक, वैभव...धन्यवाद

मरण या सैनिकाचेही श्रेष्ठच. फक्त जिंकलेल्या सैन्यातील सैनिकाच्या मरणाला असणारे हौतात्म्याचे मोल जगास अधिक वाटते अशा अनुभूतीतून आलेली ही कविता आहे. जिथे पराभवाने पूर्ण देशच नेस्तनाबूत झालाय तिथे या 'लूझींग कॉझ' साठी मेलेल्या सैनिकांवर अश्रू तरी कोण ढाळणार? .. असे काहीसे!!