चंद्रपर्व

Submitted by -शाम on 28 February, 2013 - 23:57

प्राचीवर संथ लयीने
उगवती केशरी गीते
हलकेच कुशीवर वळता
ती मिठी सोडवुन घेते

दवबिंदूंचे चंदेरी
लवलव पात्यांवर मोती
झुळझुळणार्‍या हृदयातुन
हुळहुळते अनाम भीती

सरसरून तुटते माला
दसदिशांत किलबिल काला
चरचर हिरव्या स्पर्शाने
मातीचा गहिवर ओला

धुरकट स्वप्नांच्या काचा
पुसण्यास उताविळ वारा
मी मावळताना घेतो
अंधार समेटुन सारा

शिणल्या पायांना सलते
अंतर दोघांच्या मधले
या अशाच भेटी अपुल्या
हे असेच नाते अपुले
.....................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पनाविलास आवडला.

धुरकट स्वप्नांच्या काचा
पुसण्यास उताविळ वारा
मी मावळताना घेतो
अंधार समेटुन सारा

अगदी चित्रदर्शी.
धन्यवाद.

चंद्रपर्व.. सुंदर नाव, कविता.
शेवटचे कडवे जरा गद्य वाटले आधीच्या कडव्यांच्या तुलनेत.

धुरकट स्वप्नांच्या काचा
पुसण्यास उताविळ वारा
मी मावळताना घेतो
अंधार समेटुन सारा
>>
वाह! क्या बत है
म स्त च!
सुं द र!
पुन्हा पुन्हा वाचली

जसे दवबिंदू पानावरचे
अलगत ऊचलून घ्यावे
नकळत अपूल्या नात्या मधले
अंतर विरून जावे....!
-------------------------------------

खूपच छान....

धुरकट स्वप्नांच्या काचा
पुसण्यास उताविळ वारा
मी मावळताना घेतो
अंधार समेटुन सारा

क्या बात है!