माझी शाळा

Submitted by रसप on 28 February, 2013 - 00:28

कुसुमाग्रजांच्या 'तुर्क' ह्या कवितेच्या आकृतीबंधापासून प्रेरणा घेऊन ही रचना लिहिली आहे.

अजूनही ती
आठवते मज
माझी शाळा
अजूनही पण
समजत नाही
हवीहवीशी
होती शाळा
की कंटाळा ?

अभ्यासाच्या
नावे शंखच
होता तरिही
बाकावरती
कोरुन कोरुन
नावे लिहिणे
चित्रं काढणे
खोड्या करणे
शिक्षा होणे
पट्ट्या खाणे
उठा-बश्या अन्
कान पकडणे
तरी आणखी
फिरून हसणे
मजाच होती !!

गृहपाठाची
वही भरतसे
लाल शाइने
पानोपानी
शेरे-शेरे
पुन्हा एकदा
शिक्षा होणे
फिरुन आणखी
पुन्हा हासणे !

तरी लाडका
मी बाईंचा
शिक्षा करती
तरी शेवटी
डोक्यावरुनी
हात फिरवती
गहिवरलेला

समोर माझ्या
आत्ता आहे
जी शाळा ती
माझी नाही
उंच इमारत
प्रशस्त प्रांगण
यांत्रिक सारे
मुले नि शिक्षक
असे न होते
माझ्या वेळी

छोटीशी ती
होती शाळा
एक इयत्ता-
एकच तुकडी
एकच बाई
एकच पट्टी
एकच शिक्षा
अन् डोक्यावर
हात फिरे तो
गहिवरलेला

....रसप....
२८ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_3435.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटीशी ती
होती शाळा
एक इयत्ता-
एकच तुकडी
एकच बाई
एकच पट्टी
एकच शिक्षा
अन् डोक्यावर
हात फिरे तो
गहिवरलेला

कविता आवडली.

मस्त, आवडलीच!

कवितेतला निरागसतेचा भाव पोहोचण्याइतपत प्रभावी फॉर्मॅट आहे असे वाटले.

छानय रे पण शेवटी ही कविता विशेष कुठेच पोचत नाही असे वाटले खासकरून शेवटचा भाग नसता तरी चालले असते (वै म गै न चु भु दे घे)

त्या काळची आणि या काळची शाळा किंवा शाळेच्या हृद्य आठवणी
हा या कवितेचा विषय, आणि भावना पोहोचतात.

रणजित,
माझ्या मते या आशया/विषयासाठी 'उदासीनता' चा फॉर्म सुटेबल वाटला नाही.