होता एक मित्र...माणुसकी नावाचा..!!!

Submitted by तनवीर सिद्दीकी on 27 February, 2013 - 05:32

''ये ना घरी कधीतरी '' एका मित्राची अपुरी मागणी होती
माणुसकी होते नाव त्याचे, भेटीच्छा लोचनी चाळवली होती

चटकन उठलो, सहृदय बांधिले, होती सोबतीला हास्याची पुरचुंडी
ओला आनंदाश्रूचा 'कृतज्ञ' सदरा, त्यावर जुनी आपुलकीची गुंडी

''आटपाट नगरात कोणालाही विचार'' अगदी सोप्पा पत्ता होता
कल्पकतेने बनेल रंगरंगोटीत झाकला विध्वंसी जरीपटका होता

अंती हवे असलेले छत्र गावले, थोडी शेजारी दांभिक घाण होती
मी मी करणारे जनावरच सर्व ,पण थोडी सुशिक्षित जाण होती

चव्हाट्यावरच पाय थबकला, विधिलिखिताचे भाग्यप्रताप बघून
''माणुसकी'' भिंतीवर दिसला, दिसले अस्पष्ट हंबरडे निर्माल्यातून

''दया'' दिसला सुपुत्र त्यांचा, कंजूस हसला अन खोटा आदर
कज्जळ ''आत्मा'' बाहेर आली, नजरसलाम अंथरून भ्रष्ट चादर

पोटदु:ख लपवण्यात चपखल दिसले, जगणे मात्र हतबल दिसले
वारसी क्षुल्लकशाही अंशी थोडी, गुणगान करत खोटेच हसले

''असंच चाललंय हो आता इथे'', चांगुलपणास अतिशय त्राण आहे
प्रत्येकाचे देव हजार आराध्य देवी मात्र पैसा विराजमान आहे

माणूस मरतो फुकटात इथे,कावळ्यास पिंड शिवण्या पण वेळ कुठे?
आपण रडण्याचीही किंमत मोजावी, मयताचे सामानही विकत भेटे

एक पडतो की दुसरा उचलतो, या एकतेच्या धड्यांना सजाण आहे
आता गरजू खिडकीतूनच 'जात' मागवतो,चौकातच धार्मिक दुकान आहे

हलका रडलो, जरा अवखडलो, शेवटी सावरून 'आता येतो' म्हण्टले
एक माणुसकीचा अकाल मृत्यू, अन पूर्ण हयातीचे समीकरणच बदलले

कधी एकटाच आता विचार करतो, ''माणुसकी'' मय आठवण ही येते
ते निघतानाचे ''दया''चे शेवटचे वाक्य, सर्व भान थोबाडीत मारून जाते

''या हो घरी कधीतरी'' थांबा,.. आमच्या मुलांना पण भेटायची तहान आहे
हा बघा थोरला धर्म, मधला राज्यपात, अन हा देश सर्वात लहान आहे
.
.
त्यानंतर जाणे कधी झालेच नाही हो.....!!!! ..वाटलंच नाही जावसं....!!!!

तनवीर सिद्दिकी

Group content visibility: 
Public - accessible to all site users