विस्कटले कोष्टक सारे (संकेत तरही)

Submitted by UlhasBhide on 25 February, 2013 - 09:34

विस्कटले कोष्टक सारे (संकेत तरही)

संदर्भासाठी पाचही मुद्दे खाली दिले आहेत.
संकेत तरही जमली/न जमली, गझल झाली की कविता (की तीही नाही :))
जाणकार सांगतीलच.
1. तू माझी साथ दिली नाहीस याचे दु:ख नाही. दु:ख हे आहे की मीही माझी साथ दिली नाही
2. रस्तारुंदीमध्ये ते लहान देऊळ हालवण्यात आले. पण जुन्याच जागी पाहून अजुन हात जोडले जाणे चुकत नाही
3. श्रीमंत मुलाच्या अंगावरील कपडे पाहण्यात काही वेळ गुंग होऊन तो मजुराचा मुलगा पुन्हा मातीत खेळू लागला.
4. अख्खा देश रस्त्यावर आणणारे निर्भया प्रकरण दोन महिन्यांनी विस्मरणात गेले.
5. कुटुंबाला वेळ द्यायचा होता. पण जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा कुटुंब विखुरलेले होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

साथ दिली ना प्रत्यंचेने शरसंधानाकरता
अतीव झाले दु:ख त्याहुनी चाप करी थरथरता

ते जपलेले फूल न उरले वहीत माझ्या आता
मनी दरवळे गंध अजूनी त्या पानी अडखळता

विस्फारित नेत्रांनी बघता वैभव परदेशाचे
मनी घालते साद अचानक मायभूमिची ममता

राळ फेकता जाळ उफाळे किंचित कालापुरता
तप्त निखारे सत्वर निवती पुन्हा धुमसण्याकरता

उशीर झाला अंक मांडण्या योग्य रकान्यांमध्ये
अन् विस्कटले कोष्टक सारे हिशेब जुळता जुळता

.... उल्हास भिडे (२५-२-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा शेर दिलेल्या व अपेक्षित निकषानुसार चपखल वाटला नाही बाकीचे वाटले
( हे माझे वैयक्तिक मत आहे कृ गै न)

आवडली गझल

टीप : मी तज्ञ नाही सामान्य(अतिसामान्य) वाचक आहे

Happy

>>
ते जपलेले फूल न उरले वहीत माझ्या आता
मनी दरवळे गंध अजूनी त्या पानी अडखळता

उशीर झाला अंक मांडण्या योग्य रकान्यांमध्ये
अन् विस्कटले कोष्टक सारे हिशेब जुळता जुळता
<<

छान. Happy

उशीर झाला अंक मांडण्या योग्य रकान्यांमध्ये
अन् विस्कटले कोष्टक सारे हिशेब जुळता जुळता<< वा वा

ते जपलेले फूल न उरले वहीत माझ्या आता
मनी दरवळे गंध अजूनी त्या पानी अडखळता<<< मस्तच

संकेत तरहीची संकल्पना निदान पूर्ण समजून रचलेली गझल वाटली, जरी, प्रतीके पुरेशी सूचकपणे आलेली नसली तरीही.

मतल्यात एकदा 'शरसंधानाकरता' व 'थरथरता' आल्यानंतर अडखळता, ममता, जुळता ही यमके खरे तर घेता येणार नाहीत. त्यामुळे मतला थोडा सैल करणे बरे.

पु ले शु

सुंदरच जमली आहे.

वर जे संदर्भासाठी मुद्दे दिले आहेत त्यामुळे तर फारच सोयीचे होत आहे - माझ्या सारख्या सामान्य वाचकाला...

अडखळता, हिशेब हे शेर छानच आहेत.

काही ओळी फार सहज नाही वाटल्या. उदा. मतल्यातली पहिली ओळ अगदी सहज पण दुसरी ओढाताण झाल्यासारखी.

शुभेच्छा!

>>उशीर झाला अंक मांडण्या योग्य रकान्यांमध्ये
अन् विस्कटले कोष्टक सारे हिशेब जुळता जुळता

वाह वा! रूक्ष शब्द पण ऊत्तम आशय..

गझलेचा शेर म्हणजे एक प्रकारचा संवाद असतो(असायला हवा) . आपण समोरच्या व्यक्तिशी बोलत आहोत असा शेर हवा. त्यात सहजपणा हवा. वर दिलेल्या सर्व द्विपदी उपक्रमात दिलेल्या संकेतांप्रमाणे आल्या आहेत त्याबद्दल अभिनंदन. तुम्ही तुमच्या मित्राशी वरील भाषेत संवाद साधता का?

>>टीप : मी तज्ञ नाही सामान्य(अतिसामान्य) वाचक आहे << तज्ज्ञ

>>वर जे संदर्भासाठी मुद्दे दिले आहेत त्यामुळे तर फारच सोयीचे होत आहे - माझ्या सारख्या सामान्य वाचकाला<< कोणत्याही प्रकारची तरही असली तरीही असे व्हायला नको असे माझे वै. म. आहे

मतल्यात एकदा 'शरसंधानाकरता' व 'थरथरता' आल्यानंतर अडखळता, ममता, जुळता ही यमके खरे तर घेता येणार नाहीत. त्यामुळे मतला थोडा सैल करणे बरे.>>>>
धन्यवाद बेफिकीरजी,
मतल्यात काफिया कसा स्पष्ट केला जावा याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत.
तुमच्याशी चर्चा करून त्यांचं निरसन करून घेईन.
पुढच्या गझलेत असा दोष राहणार नाही असा निश्चित प्रयत्न असेल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
गजलुमियां,

गझलेचा शेर म्हणजे एक प्रकारचा संवाद असतो(असायला हवा) . आपण समोरच्या व्यक्तिशी बोलत आहोत असा शेर हवा. त्यात सहजपणा हवा. वर दिलेल्या सर्व द्विपदी उपक्रमात दिलेल्या संकेतांप्रमाणे आल्या आहेत त्याबद्दल अभिनंदन. तुम्ही तुमच्या मित्राशी वरील भाषेत संवाद साधता का?” >>>

खूप आवडला हा प्रतिसाद. तुमच्यासारख्या जाणकारांचे असे प्रांजळ प्रतिसाद सुधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असतात.
शेर कसा हवा याबद्दल तुम्ही दिलेलं विवेचन मी आधी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.
तसंच "पानवाल्याला देखील शेर समजला पाहिजे" अशा आशयाचंही वाचलं होतं. असो....
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुम्ही सांगितलेले मुद्दे ध्यानात ठेवीन. त्यादृष्टीने सुधारणा किती होईल याची मात्र ग्वाही देता येत नाही. Happy

तुमच्या इथल्या २ आठवड्यांच्या कारकिर्दीत हा मुद्दा तुम्ही प्रथमच मांडला आहे असं वाटतं.
यातून खालील निष्कर्ष काढता येतात :
१) इथल्या बाकी गझलांमधील सर्व शेर, तुम्ही सांगितलेला सहजतेचा निकष पूर्ण करत असावेत.
२) तुम्हाला मायबोलीचं सदस्य घेऊन फक्त दोनच आठवडे झाले असल्याने, इथल्या अजून बर्‍याच गझला वाचायच्या राहिल्या असतील.
३) मी सर्वात योग्य उमेदवार(अत्यंत दुर्मिळ शक्यता) वाटल्याने तुम्ही ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणली असावी. तसं असल्यास ते मी माझं महद्भाग्य समजतो.

तुमच्या प्रतिसादासंदर्भाने माझ्या वरील रचनेबद्दल मी असा निष्कर्ष काढू शकलो की सदर लेखन गझल नाही.

यातून खालील निष्कर्ष काढता येतात :
>>१) इथल्या बाकी गझलांमधील सर्व शेर, तुम्ही सांगितलेला सहजतेचा निकष पूर्ण करत असावेत.<<

छे छे असं काही नाही. जिथे काही बोलावसं वाटतं तिथे बोलतो.
>>२) तुम्हाला मायबोलीचं सदस्य घेऊन फक्त दोनच आठवडे झाले असल्याने, इथल्या अजून बर्‍याच गझला वाचायच्या राहिल्या असतील<< वाचायच्या राहिल्या आहेत हे नक्कीच पण खूप जुन्या रचना उगीच वर आणून निव्वळ प्रतिसाद देण्यासाठी प्रतिसाद देत नाही.
>>३) मी सर्वात योग्य उमेदवार(अत्यंत दुर्मिळ शक्यता) वाटल्याने तुम्ही ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणली असावी. तसं असल्यास ते मी माझं महद्भाग्य समजतो.<< माझ्या प्रतिसादातील एक वाक्य तुम्ही वाचलंत का? "वर दिलेल्या सर्व द्विपदी उपक्रमात दिलेल्या संकेतांप्रमाणे आल्या आहेत त्याबद्दल अभिनंदन."

>>तुमच्या प्रतिसादासंदर्भाने माझ्या वरील रचनेबद्दल मी असा निष्कर्ष काढू शकलो की सदर लेखन गझल नाही.<< बरेचसे गझलेच्या जवळपास आहात. आपण मांडत असलेले शेर हे संवाद म्हणून कसे येतील याकडे जास्त लक्ष द्या.

गझल आवडली.
संकेतांनुसार वापरलेली नवीन प्रतिकंही चपखल आहेत असं जाणवलं.
कवाफींबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
'अ' अलामत आहे असं समजता येईल काय ?

वैवकु,
वरील गझलेतील कवाफी बघा.
शरसंधानाकरता, थरथरता , अडखळता, ममता , धुमसण्याकरता , जुळता .

मतल्यात जे यमक आहे, तसे पुढे फक्त चौथ्या शेरात आहे. इतरत्र त्यातली अ ही अलामत पाळली गेली आहे. गैरमुरद्दफच्या बाबतीत माझा थोडा घोळ होतोय . म्हणून ही विचारणा. कृ गै न.

मतल्यात जे यमक आहे, तसे पुढे फक्त चौथ्या शेरात आहे. इतरत्र त्यातली अ ही अलामत पाळली गेली आहे. <<<

तसे फक्त पुढे चौथ्याच शेरात पाळले गेले आहे हाच तर प्रॉब्लेम आहे मासरूळकर.

उशीर झाला अंक मांडण्या योग्य रकान्यांमध्ये
अन् विस्कटले कोष्टक सारे हिशेब जुळता जुळता
>> वाह वाह... क्या बात!!!

रच्याकने: गझल म्हणजे फक्त व्याकरण आणि नियमच का?
वरील प्रतिसाद वाचुन आस्वाद घेणारे कमी, आणि वाकरणात्मक चिरफाड करणारे प्रतिसाद जास्त आहेत असे वाटते.. Happy