विसंगती

Submitted by विजय जोशी on 24 February, 2013 - 12:28

\\ विसंगती \\

माझ्या देशावर, माझ्या राष्ट्रावर माझं प्रेम आहे, असं मी छाती ठोकून सांगत असतो !
नितीमत्तेच्या आणि शौर्याच्या गाथा गाताना मी वाघ सिंहाचे दाखले देतो !
स्वच्छता, मानवता, सदवर्तन या बद्दल मी नेहमीच उपदेश देतो !
स्वतःच्या दिव्याखालचा अंधार मात्र मी सोयीस्कर पणे विसरतो !! १ !!

घ्यायला मी नेहमीच पुढे असतो, देताना मात्र मी हात आवरता घेतो !
कायदे करताना मी अग्रेसर असतो, पण त्यांचं पालन करण्यात मला अजिबात रस नसतो !
फायदा असतो तिथे माझा हक्क मला दिसतो, जबाबदारी मात्र मी मोठ्या शिताफिने टाळतो !
शुरतेच्या कथा मी नित्याने ऐकतो, तरीही मी दुसरयाच्याच खांद्यावर बंदूक ठेवतो !! २ !!

भरल्यापोटी उपोषण करणं नेहमीच सोपं असतं, पण दारिद्य्रात मात्र रोजच उपवास असतो !
सर्व सुरळीत असताना नाही, तर अडचणीच्या वेळी मला देव आठवतो !
वर्तमानात जगताना, भूतकाळ विसरून मी भविष्याची चिंता करतो !
अपयशासाठी नशिबाला दोष देताना, कर्तव्य मात्र मी नेहमीच टाळतो !! 3 !!

दुसऱ्याच्या घरात डोकावण हा माझा आवडीचा छंदं !
त्यावर चर्चा करण्यात मी असतो सदैव दंगं !
कट्ट्यावर गप्पा मारण्यात मी असतो नेहमीच गुंग !
माझ्या घरातला सावळा गोंधळ मात्र मला दिसत नाही, कारण मी असतो बाहेरच्या जगात मग्न !! ४ !!

माझ्या भाषणाला उपस्थितांनी दाद दयावी ही असते माझी अपेक्षा !
इतरांच्या कार्यक्रमाची मात्र मी करतो नेहमीच उपेक्षा !
वेळेचं महत्व मी लोकांना पटवून सांगतो, मी मात्र वेळेवर कुठेच उपस्थित नसतो !
जीवनाच्या शर्यतीत सर्वजण पुढे निघून जातात, मी मात्र फाजील आत्मविश्वासाने गाफील राहतो !! ५ !!

पैश्याच्या क्षितीजा मागे मी आयुष्यभर धावतो, थकतो, भागतो आणि थांबतो !
शेवटी मागे वळून पाहतो, तर आयुष्याची झोळी खालीच असते !
हिशोब मांडतो तेव्हा शुन्य उरतं, पण ते कळायला अख्ख आयुष्य जातं !
कारण येताना मी रिकामाच येतो, आणि जातानाही रिकामाच जाणार असतो !! ६ !!

अभ्यासाचं वेळापत्रक मी सुंदर बनवतो, पण ते भिंतीवरच राहतं !
परीक्षेच्या अगोदर मला सर्व येतं, पण पेपर बघून मला घाम फुटतो !
मला असं नेहमीच वाटतं की मी हुशार आणि सर्वज्ञानी आहे !
पण बाहेरच्या विश्वात गेल्यावर जाणवतं, माझं ज्ञान खूपच तोकडं आहे !! ७ !!

कोणे एके काळी मित्रा तू होतास माझा फ्रेंड, फ़िलॉसॉफ़र आणि गाईड !
नेहमी सरळ रेषेत खेळणारा तू , मग का टाकलास चेंडू वाईड !
दुभंगलेला आरसा जसा जोडणं शक्यं नसतं !,
गमावलेला विश्वास मिळवणं मित्रा खूप कठीण असतं !! ८ !!

पहिल्याच भेटीत मी प्रेमात पडतो, आणि स्वर्ग सुख मिळाल्याचा आनंद होतो !
आयुष्यभराची साथ देण्याची वचने देतो, आणि हनिमुनचि स्वप्ने पाहू लागतो !
लवकरच सुगीचे गुलाबी दिवस संपतात, आणि खरे चेहरे समोर येतात !
शेवटी लक्षात येतं की ते प्रेम नसून फक्त्त शारीरिक आकर्षण होतं !! ९ !!

जनतेच्या मतांच्या होळीवर मी साजरी करतो माझी दिवाळी !
निवडून आल्यावर मात्र विस्मरतात, त्यांना दिलेली वचने कधीकाळी !
हा हा म्हणताच निघून जातो काळ, आणि सुरु होते पुढच्या निवडणुकीची तयारी !
सर्व काही विसरुन मी पुन्हा बनतो भिकारी, आणि फिरतो मतांसाठी दारोदारी !! १० !!

भारतमातेच्या मंदिरात घडताहेत अत्त्याचार आणि बलात्कार !
न्यायदेवतेच्या समोरच होत आहेत खून, चोरी आणि लुटमार !
महागाईचा भस्मासूर घडवतोय गरिबांना उपासमार !
सीमेवरती रोजच होतेय घुसखोरी आणि गोळीबार !
हे सर्व पाहून शरमेने मान खाली जाते, कारण मी असतो असहाय्य आणि लाचार !! ११ !!

विजय म. जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादा चांगला लेख म्हणता येईल ....याला कविता म्हणण्याची मला गरज वाटत नाही
(हे माझे वैयक्तिक मत आहे)

काव्यलेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !!