"अंश तुझा"

Submitted by अमेय२८०८०७ on 22 February, 2013 - 10:24

बीजांकुरी तू सत्व निर्मिले माझ्या सृजनासाठी
संस्कारांचे तत्व शिंपिले भुईत रुजण्यासाठी

आज उभा मी उंच जाहलो छायेपासून दूर
परि पानांमधुनी घुमती जुने हवेसे सूर

जरी वेगळी ओळख माझी असे तुझा मी अंश
तसाच वाढे माझ्यामधुनी पुढे आपुला वंश

तान्हे येतील अंकुर पुन्हा तरु-तनाच्या कुक्षी
ज्योत तेजवील नवारंभी गुण- सूत्रांची नक्षी

बंध लयाचा सजीव लक्षण, ना वयाचा दोष
सृष्टी करते जनन- मरण, दोहोंचा जल्लोष

कृतार्थतेने जाशील जेव्हा आलिंगण्या धरती
तुझे येतील पक्षी नांदण्या माझ्या शाखांवरती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली... Happy

"जरी वेगळी ओळख माझी असे तुझा मी अंश
तसाच वाढे माझ्यामधुनी पुढे आपुला वंश"

अंश आणि वंश मधला फरक छान नमूद केलाय....

आशय खूपच चांगला मांडला गेलाय.
फ्लो देखील छान आहे.
शेवटची द्वीपदी सर्वात आवडली.
-------------------------------------------------------------------------------------------------
मात्र,
काही काही ठिकाणचा वृत्तभंग, रसभंगाला वाव देतोय. वैम. कृगैन.

जरी वेगळी ओळख माझी असे तुझा मी अंश
तसाच वाढे माझ्यामधुनी पुढे आपुला वंश
तान्हे येतील अंकुर पुन्हा तरु-तनाच्या कुक्षी
ज्योत तेजवील नवारंभी गुण- सूत्रांची नक्षी

सुंदर ,आवडली