सहसा कुणास आम्ही काळीज देत नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 February, 2013 - 11:28

गझल
सहसा कुणास आम्ही काळीज देत नाही!
अगदी दिलेच तर ते मागून घेत नाही!!

कैफात कोण नाही? मज सांग तू कसाई!
कळते मला, अरे मी, इतका नशेत नाही!!

गेली गळून काही पाने तरी अम्हाला;
निष्पर्ण बनविण्याची ताकद हवेत नाही!

दिसतील फक्त काही तुज बेचिराख स्वप्ने.....
याहून अन्य काही माझ्या चितेत नाही!

गेला जळून अवघा, तो कापराप्रमाणे....
ज्याला तुम्ही हुडकता, तो ह्या सभेत नाही!

माझे नशीब आहे अगदी तुझ्याप्रमाणे!
मीही मजेत नाही, तूही मजेत नाही!!

माळून चांदणे ती, भेटावयास येते!
आहे तिच्यात काही, जे पौर्णिमेत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेली गळून काही पाने तरी अम्हाला;
निष्पर्ण बनविण्याची ताकद हवेत नाही!

माझे नशीब आहे अगदी तुझ्याप्रमाणे!
मीही मजेत नाही, तूही मजेत नाही!!

हे दोन शेर आवडले.
पहिल्या शेरात दुसरी ओळ अधिक उच्चारणसुलभ हवी आहे असे वाटले.
दुस-या शेरात अगदी तुझ्याप्रमाणे की तुझ्या नशीबाप्रमाणे ? असे वाटत राहिले.
धन्यवाद.

धन्यवाद समीर!
दुस-या शेराचा अर्थ असा आहे......
अरे कसाई, कोण (या दुनियेत) कैफात नसते? म्हणजेच मी जसा माझ्या कैफात आहे, तसाच तूही तुझ्या कैफात आहेस! मी जरी माझ्या कैफात असलो तरी मला हे कळते की, तू कसाई आहेस आणि तू देखिल तुझ्या तुझ्या कैफात आहेस! हे न कळण्या एवढा काही मी धुंदीत/कैफात नाही!
मतल्यातील सानी मिस-याबाबतचे मत मान्य! तुला जर सुलभ सानी मिसरा सुचला तर जरूर कळव!

ओ सर तुम्ही नशेत नाही म्हणताय तर मान्य ! पण समीर जी त्या कसायाच्या शेरबाबत काहीच वदले नाही आहेत
ते बनवण्याची या शब्दाच्या , शेरातील लयीनुसार, नाजुकपणा -हळुवारपणानुसार नसलेल्या उच्चारसुलभपणाबद्दल बोलताय्त (त्यांचे वै म असावे हे...मलातर त्यातले कळत नाही)

हा शेर मला सर्वाधिक आवड्ला......पण मी तो असा वाचला

माझे नशीब आहे अगदी तिझ्याप्रमाणे!
मीही मजेत नाही, तीही मजेत नाही!!

आता तुम्हाला या शेरातही<<<तूही मजेत नाही>>> मधला "स अव्यक्त" ठेवायचाच असल्यास गुस्ताखी मुआफ Wink

धन्यवाद वैभू, चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल!
त्याचे असे झाले समीर दुस-या शेरात असे म्हणाला म्हणून आम्ही धांदलीत दुस-या शेराबद्दलच( नंबर२चा शेर) बोललो!
माझे नशीब आहे अगदी तुझ्याप्रमाणे यात तुझ्याप्रमाणे असेही आहे व तुझ्या नशिबाप्रमाणे असेही आहे!

गेली गळून काही पाने तरी अम्हाला;
निष्पर्ण बनविण्याची ताकद हवेत नाही!

दिसतील फक्त काही तुज बेचिराख स्वप्ने.....
याहून अन्य काही माझ्या चितेत नाही!

हे दोन शेर फार आवडले.