चिरकाळोख

Submitted by अमेय२८०८०७ on 18 February, 2013 - 10:59

ही वेळ जिवाला ऐशी
ओलांडूनी मागे जाई
तिमिराच्या रक्तधुळीने
बावरते सौम्य निळाई

हे पक्षी विनियोगांचे
कोणास्तव गाती गाणी
कोणाच्या भयमोहाने
मेघांना फुटते पाणी

ताऱ्यांच्या ताणामधूनी
हे विश्व तारतो कोणी
नादाने जोगवणारी
वाऱ्याची दुखवे वाणी

अंधार सोबतीसाठी
डोळ्यांतून उजळे पारा
हृदयातून स्त्रवती पुन्हा
नित आवेगाने धारा

निबिड अरण्यामागे
वसलेले तान्हे गाव
घराघरांतून दिसतो
चिरकाळोखाचा भाव

काजळल्या वाटांवरती
अडखळते प्रकाशरेषा
शब्दार्थ शोषता होते
शोकाची गहिरी भाषा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजीव, , गं.स.
उत्साहवर्धनाबद्दल धन्यवाद

एखाद्या मूर्तीवर इतके हार आणि फुलं घातली जातात की मूर्ती दिसणं कठीण होतं.
असंच काहीसं जाणवलं ही कविता वाचताना.

अर्थात् त्या हारांतून आरपार बघण्याची क्षमता ज्या नजरेत असते त्या नजरेला ती मूर्ती दिसते; अशी मनाची समजूत घालून घेणं हे कदाचित योग्य असावं.

UlhasBhide>>>
एखाद्या मूर्तीवर इतके हार आणि फुलं घातली जातात की मूर्ती दिसणं कठीण होतं.
असंच काहीसं जाणवलं ही कविता वाचताना.>>>
अतिशय सुंदर....
अमेय तुमचे लेखन मोहकच असते.
असं वाटतं की कुण्या जुन्या काळातल्या कवीची कविता वाचतो आहोत.