सोनकोवळ्या सांजउन्हातून "तू"

Submitted by राजीव मासरूळकर on 18 February, 2013 - 03:37

=@तू@=

सोनकोवळ्या सांजउन्हातून
तुला पाहतो आतून आतून
दूर मंदिरी वाजे घंटा
रव येई तव पैंजणांमधून !

धरणावरचा वारा ओला
स्पर्शून जाता तुझ्या तनाला
सलज्ज तृप्ती तुझ्या मुखीची
मोहीत करते सांजनभाला !

गालावरची बघून तुझिया ,
आभाळीही चढते, लाली
तुझ्या पावलांना स्पर्शाया
श्वास रोखते धुंद लव्हाळी!

सूर्य थांबतो क्षितिजावरती
ढगाआडुनी तुला बघाया
गवतफुलेही तुझ्या दर्शनी
उधळून देती मधाळ फाया !

तुला लपेटून घेण्यासाठी
अंधाराला होते घाई
किर्र वनापल्याडून येऊन
चंद्र तुझी बघतो नवलाई !

घरास तुझिया , मनात माझ्या
चालत डोलत पोचतेस तू
शब्दरूप तुज देतो , कायम
मम हृदयी वसतेस तूच तू !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १४.१०.२०१०
सायंकाळी ६.०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनसळी चा अर्थही सकाळच्या कोवळ्या उन्हाची पाण्यावरून परावर्तित होणारी किरणे असा असावा असं वाटतंय..

एक प्रतिसादक आणि भारतीताई,

सोनकोवळेच योग्य आहे. जसे सकाळचे ऊन कोवळे असते तसेच संध्याकाळचेही .
आणि सकाळचे सोन्यासारखे पिवळे नि सायंकाळचे लाल असे थोडेच असते ?
Happy

सोनकोवळे ही उपमा फक्त सकाळच्याच उन्हाला द्यावी, असा काही नियमही नसावा .

असो. प्रतिसादासाठी धन्यवाद !

कविता खूपच सुंदर.

>>>सकाळचे सोन्यासारखे पिवळे नि सायंकाळचे लाल असे थोडेच असते ?<<<<<
>>>>सोनकोवळे ही उपमा फक्त सकाळच्याच उन्हाला द्यावी, असा काही नियमही नसावा .<<<<

सोप्या शब्दात सांगायचे तर
कोवळेपणा नियमांनी किंवा रंगावरून ठरत नाही. कोवळेपणा ठरतो वयावरून.
सकाळपासून सायंकाळपर्यतचा कालावधी हा त्या दिवशीच्या उन्हाचे वय असते. सकाळ हे बालपण, दुपार म्हणजे तारुण्य आणि सायंकाळ म्हणजे म्हातारपण. आणि शेवट म्हणजे अस्त. सुर्यास्त म्हणजे किरणांचा अस्त.

आणखी सोप्या शब्दात हवेय?

- म्हातारीची त्वचा कितीही मुलायम किंवा लुसलुशीत असू देत आपण तिला कोवळी म्हातारी नाही म्हणू शकणार. Wink Happy :P:

सुशांतजी , मुटे सर . . . . . .
मनापासून आभार !

मुटे सर ,
कोवळ्या म्हातारीचा विनोद लैच आवडला .
Happy
आता म्हातारी कोवळी आहे की तीची त्वचा हे ज्याचं त्यानंच ठरवावं !