आशा

Submitted by समीर चव्हाण on 18 February, 2013 - 00:20

छटाक आशा उशाला बाळगून झोपतो तो जिन्याच्या खाली
रोज सकाळी उठतो स्वप्नांच्या प्रसन्न लहरींचे तरंग घेऊनच
सवयीने उरकतो आंघोळ
तेल-कंगवा करून तांदुळधुतल्या कपड्यांसह पडतो बाहेर
ऐपतीप्रमाणे करतो चिल्लर शौक
टपरीवर चहा, सोबत एखाद सिगरेट
घरी निभतं थोटकांवरही

एके दिवशी येऊन म्हटला लग्न करतोय
एक फोटो दाखवला
आणि मी नीट पाहण्याअगोदर खिशात ठेवलादेखील
पसंती झाली का म्हटले तर म्हटला बातचीत चाललीय
त्याच्या नुकत्याच पिकायला लागलेल्या केसांकडे पाहत
मनात म्हटलं ठरलं ह्याचं लग्न

नंतर मी शिकायला पुणं सोडलं
आणि काही मित्रही सुटले
गेल्या भेटीत समजलं की तो एकटाच आहे
वाईट वाटलं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. राजीव.

शाम.
अनुभव जसाच्या तसा लिहिण्याचा प्रयत्न केला.
असो, आपला प्रतिसाद पुढील लिखाणात उपयोगी पडेलच.

समीर

काव्यमय ललित ! खूप आवडले
शेवट जरा 'आम' वाटला तसाही अगदीच 'सरळधोट' झालाय (थोडक्यात एखादा शेर प्रेडिक्टिबल अन सपाट व्हावा तसा काहीसा( ..वैयक्तिक मत गैर्समज नसावा))
असो कविता आवडलीच

आनंदयात्री, धन्यवाद.

वैभवः
शेवट तसा कलाटणी न देणारा आहे, मान्य.
मात्र जे अनुभवले ते लिहीले.
ब-याच अनुभूती सामान्य असतात.
त्या आहे तश्याच यायला हव्यात, असे वाटते.
धन्यवाद.

उल्हासजी:

कवितेची नेमकी व्याख्या अवघड आहे.
आपल्या काय अपेक्षित आहे ते कळले नाही.
उदाहरण द्यायचे झाल्यास नारायण सुर्वेंच्या अश्या पठडीतल्या अनेक कविता आहेत.

धन्यवाद.

समीरजी,
खिलाडूपणे प्रतिसाद स्वीकारणे खूप भावले.

खरं तर नक्की कविता कशाला म्हणायचे हे सांगता येणे कठीणच आहे.
तुम्ही म्हटलंच आहे की "कवितेची नेमकी व्याख्या अवघड आहे."
या तुमच्या विधानाशी मी पूर्ण सहमत आहे.

तुमची रचना कविता आहे की नाही याबाबत मी साशंक असल्याने तसा प्रश्न विचारला. कविता या विषयावर साकल्याने चर्चा केली जावी असं माझ्याही मनात अनेकदा येतं. परंतु, एखाद्या कवितेच्या प्रतिसादात ती न करता स्वतंत्र धाग्यात केली जावी असं वाटतं; ज्यायोगे अनेकांचे विचार समजू शकतील. याबाबत तुमचं काय मत आहे ते कळू शकेल का ?
इथेच किंवा माझ्या विपूत उत्तर दिलंत तरी चालेल.

काव्य आहे, कविता आहे पण पद्य नाही असं होतं कधी कधी. छंदमुक्त कविता , खरं तर स्फुट किंवा स्पंदनकाव्य म्हणणं योग्य ठरेल हे माझं वै. म.

(यात एक कथानक आहे, पण काव्य नाही असं वाटलं. हे ही वै.म.)

कवितेत रेखाटलेली व्यक्तिरेखा आठवताना करंदीकरांची 'धोंड्या न्हावी ' ,'कावेरी डोंगरे' ,मर्ढेकरांची 'गणपत वाणी ' आठवणे अटळ.. कारण तशा अनेकांनी हा प्रयत्न केलाय पण सामान्य माणसाचे जीवन कवितेत आणण्याचे प्रयत्न तुरळकच आहेत.
तुमच्या परिचिताचे/मित्राचे व्यक्तिमत्व कवितेत आणण्याचा हा वेगळा प्रयोग चांगला आहे, पण अजून सूक्ष्म तपशील हवे होते असे वाटले. ले.शु.

कविता चांगली आहे. कदाचित शेवटचं 'वाईट वाटलं' नसतं तर इम्पॅक्ट वेगळा झाला असता की काय असं वाटून गेलं. जश्या कधीकधी गुलजारच्या कविता/त्रिवेणी असतात.

सगळ्यांचे खूप धन्यवाद.

अनंतः

कवितेतल्या पात्राची स्टोरी काय असेल या विचारात पडलो.

तुझे विधान मी कम्प्लिमेंट म्हणून घेतले.
स्टोरी मलाही नेमकी माहित नाही.

भारतीजी:

अजून सूक्ष्म तपशील हवे होते असे वाटले

वर म्हटल्याप्रमाणे मलाही तपशील माहित नाहीत.

रूपाजी:

आपला प्रतिसाद फार पटला.
विचार केल्यावर लक्षात आले की शेवटच्या ओळीची गरज नसावी.
आपले निरीक्षण कायमचे गाठीला बांधून घेत आहे.
फ्री वर्स एक वर्षापासून लिहीत आहे आणि अंदाज घेत आहे.
धन्यवाद.

काव्य आवडेश Happy
मांडणी पण मस्तच !
शेवट काय असेल ह्याची उत्सुकता होती..... काहीतरी वेगळं असेल असं वाटलं !!
शेवटी काहीतरी अजून हवं होतं.......काय ते नक्की सांगता नाही येणार.
पण एकंदरीत आवडलं Happy