शिवजयंती विशेष लेख - शिवकालीन शस्त्रभांडार

Submitted by मालोजीराव on 17 February, 2013 - 03:10

शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते.अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत,बिचवा यांचा प्रभावी वापर असेल ,पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल.शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहे.

.

उजव्या हातात पट्टा आणि डाव्या हातात मुल्हेरी मुठीची तलवार धरलेले शिवाजी महाराज

तलवार

प्रकार - कर्नाटकी धोप ,खंडा (मराठा ) ,राजस्थानी (राजपुती ), समशेर (मोगली ),गुर्ज ,पट्टा ,आरमार तलवार ,मानकरी तलवार

तलवारी च्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात .मुठी तांबे ,पोलाद ,पितळ ,हस्तिदंत इत्यादींच्या असत .
किरच,तेग ,सिरोही,गद्दारा ,कत्ती इ .उपप्रकार होत. खंडा ,मुल्हेरी,फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार .

तलवारीचे नखा ,खजाना ,ठोला ,परज ,गांज्या,अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात .
पाते पोलादी असे.वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो ,चंद्रवट,हात्तीपागी ,फारशी,जाव्हारदार प्रकारचे असे.
तलवार हाताळणे , पवित्रा घेणे,युद्धप्रकार याचे सुमारे ५२ प्रकारचे पवित्रे आहेत .
सासवड जवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा तलवार सुमारे ४२ किलोची आहे,अश्या प्रकारची भव्य आणि वजनी अशी एकमेव तलवार
भारतात आहे .(हि तलवार युद्धात वापरायची नव्हती)
शिवरायांची भवानी तलवार हि स्पानिश तोलेदो कंपनी मेड आहे असे सांगण्यात येते .पोर्तुगीज सेनापातीकडून खेमसावंत यांच्याकडे आणि त्यांच्याकडून
शिवरायांकडे हि तलवार आली.

.

तलवारी प्रकार

..

जेजुरीचा खंडा - ४० किलो वजनी सरदार पानसे यांनी हा खांदा २५० वर्षांपूर्वी देवाला अर्पण केला

.

जगदंबा तलवार परज आणि गादी

.

जगदंबा तलवार प्रतीकृती

.

तुळजा तलवार प्रतीकृती,शहाजी राजांनी हि तलवार शिवरायांना दिल्याचे सांगण्यात येते.

.

छत्रपति उदयनराजे यांच्याकडे असलेली भवानी तलवार

.

सेनापती येसाजी कंक यांच्या तलवारी

वैदिक आणि इतर वाङ्‌मयात उदा., धनुर्वेद, वीरचिंतामणी, बृहत्संहिता, युक्तिकल्पतरु इत्यादींमध्ये करवाल, असि, निस्त्रिंश, चंद्रहास, खड्‌ग, मंडलाग्र, असियष्टि वगैरे नावे आढळतात. आधुनिक काळात प्रदेश, गाव किंवा विशिष्ट व्यक्तीवरून तलवारी ओळखल्या जातात. उदा., आलेमानी (जर्मनी), मुल्हेरी (मुल्हेर, महाराष्ट्र), हुसेनी, भवानी वगेरे. शुंगकालातील सरळ, रुंद दुधारी व बिनमुठीच्या (?) तलवारींचे स्वरूप भारहूत येथील शिल्पकामात आढळते. कुशाणकालात आखूड, सरळ, त्रिकोणी टोक असलेल्या व कण्हेरीच्या पानासारखे पाते असलेल्या तलवारी होत्या. गुप्तकालात खंडा तलवार प्रचारात आली. खंड्याची मूठ-ठोला लवंगी आकाराची असते. मध्ययुगातील तलवारीचे स्वरूप अदिचनल्लूर, अमरावती, नागार्जुनकोंडा, अजिंठा, वेरूळ, भूवनेश्वर, बादामी येथील शिल्पे व चित्रे यांतून होते. अरुंद, समांतर पण सरळ, दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी त्या तलवारीची बनावट दिसते. वाकाटककालीन अजिंठा लेण्यांत दिसणारी तलवार ही टोकाला रुंद असलेल्या पात्याची दिसून येते. तिचे बामियान (अफगाणिस्तान) येथील बुद्धाच्या पाठीमागे असलेल्या चंद्रदेवाच्या तलवारीशी साम्य आहे. कोपीस म्हणजे मुठीखाली अरुंद पण टोकाकडे रुंद होणारे पाते असलेल्या तलवारींचे नमुने जावा-सुमात्रा येथील मंदिरशिल्पांत आहेत. तर खुरपी पात्याच्या तलवारींची दृश्ये अजिंठा-वेरूळ लेण्यांत आढळतात. खुरपी पात्याच्या तलवारी हिक्सॉस (इ. स. पू. अठरावे शतक) यांनी ईजिप्तमध्ये प्रसृत केल्या. खुरपी तलवारी (कुकरी, नायर) आजही केरळमध्ये आढळतात. वीरगळांच्या हातांतील तलवारी खंडा किंवा खुरपी धर्तीच्या आढळतात. तेराव्या-चौदाव्या शतकापासून भारतात इराणी व तुर्की तलवारी येऊ लागल्या. किर्क नर्दवान बिद्र, बेगमी, कुम व शुम या इराणी व याटगान; कोपीस या तुर्की तसेच घोडेस्वाराची समशेर व तेगू या तलवारी पूर्वी प्रचारात होत्या. आईन-इ-अकबरीत अशा तलवारींची वर्णने आहेत. मराठ्यांनी स्पेन, इटली, जर्मनी येथे तयार झालेली पाती घेऊन त्यांस हिंदुपद्धतीच्या लवंगी, डेरेदार व खोपडी मुठी बसविल्या. पट्टा, सकेला किंवा धूप आणि किरच या तीन तलवारी मराठी कल्पकतेतून तयार झाल्या आहेत. पात्यांची बनावट सुरुवातीस दमास्कनी या इराणी पद्धतीने व नंतर हिंदुस्थानी पद्धतीने करण्यात येई. पट्टा इतर तलवारींपेक्षा जास्त परिणामकारक आहे. भवानी तलवार ही ‘पट्टा’ पद्धतीची तलवार असावी, असा पाश्चिमात्य तज्ञांचा अभिप्राय आहे. कर्नाटकात ‘आद्य-कट्टी’ नावाची तलवार आढळते. हिचे पाते कोयत्यासारखे असते. टिपूचे सैनिक आद्य-कट्टी वापरीत. नेपाळात खंडा, कोश व कुकरी या प्रकारच्या तलवारी प्रचारात होत्या.

.

(१) हिंदू कटोरी किंवा लवंगी ठोला असलेली मूठ, (२) जडावकाम केलेली हिंदू-मुस्लिम मिश्र घाटाची मूठ, (३) मंडलाग्र व योनी चिन्हांकित नायर तलवार, (४) मुस्लिम शैलीची मूठ, (५) खोपडी मूठ असलेला पट्टा, (६) सोसून पट्टा, (७) हिंदू पद्धतीचा खंडा, (८) हिंदू कटोरी मुठीचा औरंगजेबाचा खंडा, (९) हिंदू मुठीची द. भारतीय (कुकरी/खुरपी) तलवार, (१०) इराणी मुठीची तलवार.

पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ ⇨फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. पट्टा चालविण्याचे शिक्षण लाठी-काठीच्या डावांनी दिले जाई. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात.

.

तलवारी प्रकार - चित्र साभार - अभिजित राजाध्यक्ष

.

मराठा पट्टा

.

कोफ्तागिरी असलेला खंडा

.

धोप तलवार (दुधारी)

.

मुल्हेरी मुठ

.

नक्षीकाम केलेल्या तलवारी

.

सम्राट अकबराची ढाल आणि तलवार - जे आर डी टाटा संग्रह

.

मुघल पट्टा

.

राजपुती मुठ - सोन्याची कोफ्तागिरी

.

हस्तिदंती मुठ - उत्तर भारत

.

मुठीचा एक प्रकार -मेंढा

.

मुठीचा एक प्रकार -व्याघ्र

ढाल-

शस्त्राघातापासून संरक्षण करण्याचे साधन. ढाल गेली सु. ६००० वर्षे प्रचारात आहे. ⇨ चिलखत व शिरस्त्राण या शरीरसंरक्षक साधनांच्या वर्गात ढाल मोडते. सर्व शरीराचे रक्षण करू शकेल एवढी मोठी व मजबूत ढाल असेल, तर तिच्यामुळे मात्र झटपट हालचाल करणे जिकिरीचे ठरते; परंतु ती जर फार हलकी व लहान असेल, तर संरक्षण करण्यास ती अपुरी पडते. शिवाय एका हातात ढाल असल्यामुळे दुसऱ्या एकाच हाताने केलेले आघात जोरदार होत नाहीत. अंगावर पूर्ण चिलखत वा कवच असल्यास ढालीची गरज भासत नाही. पंधराव्या शतकापासून यूरोपात बंदुकी-तोफांचा वापर सुरू झाल्यावर ढालींची उपयुक्तता संपुष्टात आली. पौर्वात्य देशांत व भारतात मात्र अठराव्या शतकाअखेरही ढालीचा वापर चालू राहिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ढाली नव्हत्या.

कठीण पृष्ठभाग, ढाल धरण्यासाठी पकड व ढालीचा सांगाडा असे ढालीचे तीन भाग पडतात. तिचे आकारही निरनिराळे असतात. उदा., चौकोनी,अर्धगोलाकार, दुकोनी अर्धगोलाकार, त्रिकोणी, इंग्रजी आठ (8) या अक्षराकारयुक्त असलेली, सपाट (फलक) असे ढालीचे विविध आकार आढळतात. प्रत्येक आकारामागे कोणते तरी वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी ढालीचा पृष्टभाग (आघातरोधकासाठी) गेंडा, कासव, हत्ती, बैल, वाघ या जनावरांची कातडी, लाकूड, बांबू, वेत व धातूंचे पत्रे यांचा वापर केला जात असे. हल्ली मात्र प्लॅस्टिक पत्रे, वेत, बांबू यांचाही वापर होऊ लागला आहे. पोलीसी ढाली बहुधा यांच्याच बनविलेल्या असतात. ⇨ तलवारीच्या वारामुळे कातडे, बांबू किंवा वेत एकदम दुभंगत नाही. माराचा वेग जिरवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते; तसेच तांबे-पितळ या धातूंतही ती क्षमता आढळते.

ढाल पंजात धरता यावी म्हणून तिला गादीसारख्या नरम चामडी मुठी ठेवतात. ती खांद्यावर लटकविण्यासाठी तिला पट्टे असतात. ढालीचा सांगाडा लाकडी, बांबूचा वा धातूचा असतो. सांगाड्यावर पृष्ठावरण चढविले जाऊन त्यात वररोगण लावण्यात येते, तसेच या पृष्ठभागावर शंक्वाकार गुटणेदेखील ठोकतात. हा पृष्ठभाग जितका गुळगुळीत आणि ढाळदार असेल तितके शस्त्रास्त्रांचे आघात निसटते होतात. यामुळेच मराठ्यांच्या गुळगुळीत ढालींवर गोळी आदळली, तर ती निसटून उडून जाई. लांब, चौकोनी व अर्धगोलाकार स्वरूपाच्या वा तत्सम लांब ढालीमुळे योद्ध्‌याचे गळ्यापासून पावलापर्यंत शरीररक्षण होते. अशी ढाल बिनचिलखती पायदळ सैनिकांसाठी असते. ढालीच्या खोबणींतून भाले पुढे घुसविता येतात. ढालींची तटबंदीदेखील उभी करता येते. घोडेस्वार हा चिलखतधारी असल्यामुळे त्याच्या ढाली आकाराने लहान असतात, त्यामुळे अशा ढालींपासून फक्त त्याच्या तोंडाचेच रक्षण होऊ शकते. ढालीचा पृष्टभाग त्रिकोणी व टोकदार ठेवल्यास त्यावरून शस्त्रांचे वार घसरतात. मात्र हे वार चुकविण्यासाठी लहान ढालीला फिरवावे लागते. ॲसिरियन सैनिक (इ. स. पू. १०००–६००) इरल्याच्या आकाराच्या ढाली वापरीत. अशा अवजड लांब व आकाराने मोठ्या ढाली वाहण्यास व धरण्यास त्याकाळी लढाऊ सैनिकांबरोबर साहाय्यक ठेवले जात असत. वेढ्याच्या कामासाठी धातूचा पत्रा लावलेल्या लाकडाच्या लांबरुंद ढालीही प्राचीन काळी वापरात होत्या. अशा फलक ढालींचा वापर शिवाजी महाराजांच्या सेनेने वेढ्यांच्या वेळी केल्याचे उल्लेख कागदोपत्री सापडतात. सामूहिकपणे डोक्यावर पुढे, मागे व बाजूला ढाली धरून चालताना नरदुर्ग किंवा कूर्मव्यूह रचता येतो. रोमन योद्धे वेढ्यासाठी असा कूर्मव्यूह वापरीत. महाभारतातदेखील कूर्मव्यूहाचे उल्लेख आहेत.

प्राचीन काळात ढालीचा वापर होत असे. वैदिक वाङ्‌मय, अर्थशास्त्र वा महाभारताची प्राचीन साहित्यात चर्म्, शरावर, खेटक, फलक, फलरू या नावांनी ढालीचे उल्लेख केलेले आहेत. अजिंठा लेण्यांत त्रिकोणी, अर्धवर्तुळाकार, चौकोनी व लहान गोल (घोडेस्वार) ढालींची चित्रे आढळतात. अर्धवर्तुळाकार चौकोनी ढाली ॲसिरियन सैनिकही वापरीत असत. मोगलकालीन ढालीची माहिती आईन-इ-अकबरीत मिळते. बादशाहाचे अंगरक्षक‘चिरवा’ व ‘तिलवा’ ढाली वापरीत. ‘फरी’ ही लहान ढाल वेत किंवा बांबूंची केलेली असे.‘खेडा’ ढाल द्वंद्वयुद्धासाठी वापरण्यात येई. पन्नास रुपये ते चार मोहोर अशी ढालींची किंमत त्या काळी पडे. सांबर, रेडा, नीलगाय, हत्ती व गेंडा यांच्या कातड्याचा उपयोगही ढालीसाठी केला जाई. ढालींना रोगण देऊन त्यावर नक्षीकाम करण्यात येई. तसेच ढालीच्या पृष्ठभागावर पितळेचे टोकदार गुटणेही लावीत. अफताबे आलम्, रोशनी आलम्, सायरे आलम् अशी विविध नावे औरंगजेबाच्या ढालींना दिलेली आढळतात. गंगाजमनी नक्षीकामासाठी राजपूती ढाली प्रसिद्ध आहेत. मराठयांच्या ढाली गेंड्यांच्या कातड्याच्या असत. त्यांचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत असे. शिखांचे गुरू गोविंदसिंग यांच्या शस्त्रनाममालेत ढालीचा उल्लेख नसला, तरी शीख खालसा गेंडा आणि रेडा यांच्या कातडीच्या ढाली वापरीत. गुजरात आणि सियालकोट येथील ढाली सैनिकांना फार प्रिय असत.
भारतात गोल ढालींचाच अधिक वापर असे. या ढालींचा व्यास ३६ ते ६५ सेंमी. पर्यंत असे. ढालीवर गंगा-जमना किंवा कोफ्तगारी नक्षीकाम केलेले असे.

.

मराठा ढाली कासवाच्या पाठीच्या

.

राजपुती ढाल

.

गेंड्याच्या कातडीची ढाल

.

मोगल-मराठा ढाल

.

मोगल ढाल- संगीनजोड असलेली

कट्यारी -
प्रकार - बिचवा ,खान्ज्राली ,खंजीर ,पेशकब्ज,किंदजल,कुकरी ,जंबिया ,कर्द

यातील बहुतांश हत्यारे हि शेल्यात ठेवता येत असत.जवळ आलेल्या शत्रूस गारद करण्यास वा हातघाईच्या लढाईत याचा वापर विशेष होत असे
बर्याचदा तुटलेल्या तलवारींची पाती हीच या कट्यारी बनविण्यास वापरात असत त्यामुळे कट्यारी चे आकार छोटे मोठे असत .
किद्जल ,खान्ज्राली हेप्रकार तुर्की आहेत तर खंजीर ,पेशकब्ज,जंबिया इ प्रकार हे मोगली आहेत .
बिचवा हे मराठा शस्त्र असून दुधारी,आणि कमी लांबीचे पाते हे त्याचे खास वैशिष्ठ्य.
अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बिचवा हे लहान शस्त्र वापरूनच काढला असे अनेक इतिहासकार सांगतात.

.

कट्यारी-घोडदळ

.

कट्यारी पायदळ

.

बिचवा

.

दुधारी,मुड्प्या कट्यारी

.

अप्रतिम नक्षीकाम असलेला खंजीर

.

कुकरी आणि उना

.

वाघनखे विविध प्रकार

.

छोट्या बिचव्यासह वाघनख

.

शिवाजी महाराजांची वाघनखे (रेसिडेंट ग्रांट डफ याने नेलेली)

.

ठासणी ची बंदूक

.

अकबर बादशहाचे शिरस्त्राण,बाजूबंद,चिलखत

.

जाळीचे चिलखत

.

धनुष्य-बाण ,कुर्हाडी आणि इतर शस्त्रे

संदर्भ-
श्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक)
लॉर्ड इगरटन
रेसिडेंट ग्रांट डफ
विश्वकोश

-छत्रपतिसेवेसी सादर तत्पर मालोजीराव निरंतर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे सचित्र माहिती, या ढाली ,तलवारी,चिलखतं किती वजनी असतील शिवाय ते वापरणारे केव्हढे बलदंड असतील.. ऑसम!!!
ही वाघनखं घालायची म्हंजे शिवाजीराजांचा हात केव्हढा मोठा असेल ..सगळंच अकल्पनीय!!!
इतक्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद!!

मालोजीराव,

अतिशय सुंदर लेख! आजून वाचायला आवडेल. या शस्त्रांची उत्पादनप्रक्रिया मोठी मनोरंजक असेल यात शंका नाही.

विशेषत: वाघनखे पाहून अचंबा वाटला.

खालील चित्रातली वाघनखे एकसंध असल्यासारखी वाटतात. बहुधा ती ओतीव लोखंडापासून निर्माण केलेली असावीत.

याउलट खालील चित्रातील शिवाजीमहाराजांची वाघनखे पाहता नख्या आणि मूठ यांमध्ये जोड असल्याचं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

मालोजीराव,

जबर्दस्त लेख,...... एक व्यासंगीच करू शकेल,.....

गा. पै. बारीक निरिक्षण, नख्या आणि मुठ कशी जोडली असेल हे पहायला आवडले अस्ते.

(ईथे ते फोटोत कळून येत नाही, )

अतिशय सुंदर लेख!.. हे सर्व प्र.ही. कोठे प्रत्यक्ष पहावयास मिळतील.??

छत्रपती शिवाजी महाराज की जय ..

अप्रतिम. अप्रतिम, अप्रतिम.. Happy

आमच्या कोल्हापुरात देखील बावडयाच्या म्युजियम मध्ये शस्त्रास्त्रांचे बरेच प्रकार पहायला मिळतात.

छान माहिती.

नव्या मुंबईत शिवाजी चौक, वाशी येथे उद्यापर्यंत शिवकालीन शस्त्रभांडार प्रदर्शनार्थ ठेवलेले आहे. तिथली शिवचित्रशिल्पेही खुप छान आहेत.

इंटरेस्टिंग लिखाण.

तलवारींबद्दल थोडे त्रोटक झाले आहे. अधीक माहीती वाचायला मजा येईल.
(उदा. तलवारीस पाणी पाजणे म्हणजे काय? तलवार बाळगण्याचे नियम कसे? म्यानातून विनाकारण तलवार बाहेर काढणे निषिद्ध होते. पट्टा सामान्यतः ५ फूट लांब व लवचिक पात्याचा असतो. याच्या पात्याची गुंडाळी होऊ शकते. वापरायला तरवारीपेक्षा कठीण. तलवारीच्या पात्याची मेटॅलर्जी इ.)

>>पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ ⇨फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात.<<

फरी-गदगा नं? चामड्याची लाईटवेट ढाल व छडी.

मुजरा सरकार...
अतिशय माहितीपूर्ण आणि समयोचीत लेख ! धन्यवाद Happy

खुप आवडला लेख.
तलवारीबरोबर तलवारबाजाचे कौशल्यही तेवढेच महत्वाचे. कोल्हापूरला जून्या राजवाड्याच्या पटांगणात काही वर्षांपुर्वी असे तलवारबाज बघायची संधी मिळाली होती.

वाह मालोजीराव. फारच माहितीपूर्ण लेख.
तलवार अन् समशेर मधला फरक कळला चित्र बघूनच.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सर्वांचे ,
श्री.गिरीश जाधव यांच्याकडे बर्याच शिवकालीन शस्त्रांचे संकलन आहे....ते महाराष्ट्रभर प्रदर्शन भरवत असतात

@दिनेशदा पवार शस्त्रकला केंद्रातर्फे तलवारबाजी ची प्रात्याक्षिके तिथे दाखवली जातात...भवानी मंडप येथे मलाही पाहायला मिळालेली काही वर्षांपूर्वी

@इब्लिस प्रत्येक शस्त्राची थोडीथोडी ओळख करून द्यायची असल्याने जास्त माहिती नाही टाकता आली तल्वारीबद्दल

मी अस ऐकलं आहे कि शिवाजी महाराजांच्या काळात ज्या तलवारी वापरल्या जात त्या ४० किलो वजनाच्या असत. आणि अजून एक हे कि महाराणा प्रताप जो भाला वापरायचे तो २०० किलो वजनाचा होता.

या गोष्टी ऐकायला खूपच काल्पनिक वाटतात. म्हणजे ४० किलो वजनाची तलवार घेवून लढणे जर अवघडच वाटत. शिवाय महाराणा प्रताप २०० किलो वजनाचा भला भेऊन घोड्यावरून जायचे मग त्यांचा घोडा राणा प्रतापांचे वजन (कदाचित ते ९० किलो च्या आसपास असतील अस वाटत ) आणि भल्याचे वजन म्हणजे जवळपास ३०० किलो वजन घेऊन कसाकाय धावायचा ?

आम्ही नुकतेच जेजुरी गडावर जावुन आलो. तेथे हा खंडा/ खांदा पाहिला. काचेच्या शो केस मध्ये कुलुपात ठेवला आहे. ( अर्थात बाहेर ठेवला असता , तरीही माझ्याने उचलला गेला नसता , हे ही तेव्हढेच खरे आहे ! ! ) दर वर्षी जेजुरी गडावर भरणार्‍या , यात्रेत , हा खांदा , उचलुन तोलुन धरण्याची स्पर्धा होत असते. एका तरुणाने तब्बल २८ मिनिटे हा तोलुन धरण्याचे रेकॉर्ड केले आहे असे तेथे सांगण्यात आले.काय त्यावेळची माणसे म्हणावीत ! विश्वास बसत नाही.

मी अस ऐकलं आहे कि शिवाजी महाराजांच्या काळात ज्या तलवारी वापरल्या जात त्या ४० किलो वजनाच्या असत. आणि अजून एक हे कि महाराणा प्रताप जो भाला वापरायचे तो २०० किलो वजनाचा होता. >> काय उपयोग अश्या वजनदार शस्त्रांचा? तलवारीसाठी धार आणि अणकुचिदार टोक महत्त्वाचे असणार ना? त्याच्या वजनाने जो काही इनर्शिया येईल, तो समोरच्याचे शरीर कापण्या इतपत असला म्हणजे पुरेसा आहे. १०-२० किलो म्हणजे डोक्यावरून पाणी. तो उचलायलाच जर जास्त शक्ति खर्च होत असेल तर ते अतिशय निकृष्ट डिझाइन असावे.

माहितीपुर्ण लेख!!
सध्या श्रीमानयोगी वाचत असताना शस्त्रांची माहिती नसल्याने लढाईच्या प्रसंगाची नीट कल्पना करता येत नव्हती.. आता अंशतः का होईना कल्पना करता येईल. :आनंदी बाहुली:

Pages