चित्रमय कविता स्पर्धा.. फेब्रुवारी.."निकल"

Submitted by उदयन.. on 14 February, 2013 - 02:46

नमस्कार,
आज व्हॅलेंटाईन दिवसाच्या आणि वसंत पंचमी च्या मुहुर्तावर चित्रमय कविता स्पर्धेचा धागा आपल्या सर्वांसाठी चालु करत आहे.

इथे एक फोटो दिला जाईल..त्यावरुन आपणास कविता, गझल लिहायची आहे..
या पुर्वी याच संकल्पनेवर माझा धागा होता.. यावर आता स्पर्धा चालु केली
फोटोग्राफ स्पर्धेचा धागा चालु असताना अत्यंत सुंदर आणि अर्थपुर्ण प्रकाशचित्रे अनुभवाला मिळाली ..ज्यावरुन उत्तम काव्य कविता / गझल तयार होईल. म्हणुनच आज चा मुहुर्त धरुन हा धागा तयार केला

या धाग्याचे जजेस आहेत ........... "प्राजु" आणि "शाम" ....दोघांनी ही परीक्षक बनण्याची विनंती स्विकारलेली आहे.

१) प्रकाशचित्रः शापित गंधर्व ( धीरज ) तर्फे

तरुणपणातील प्रेम

२) प्रकाशचित्रः जिप्सी (योगेश) तर्फे

उतारवयातील प्रेम

03_DSC01710.JPGनिकाल............


प्रथम क्रमांक :- अमेय २८०८०७ ...."स्मरणपलिते"


द्वितीय क्रमांक :- मुग्धमानसी ...."प्रवास"

तृतिय क्रमांक :- मंदार खरे.........."नियती"

नियम / सुचना :-
१) एक आयडी २ कविता देउ शकेल......कविता स्वरचितच असावी
२) दोन्ही फोटोंवर वेगवेगळ्या कविता करु शकतात अथवा एकाच फोटोवर दोन कविता
३) दोन्ही प्रकाशचित्रांवर संयुक्त रित्या कविता सुध्दा करु शकतात.
४) प्रकाशचित्र कोणते वापरत आहेत कविते साठी ते सुरुवातीला हेडिंग वर स्पष्ट पणे लिहावे उदा. "१) प्रकाशचित्रः जिप्सी तर्फे"
५) १५ दिवसांमधे एक फोटो असे महिन्याला २ फोटो दिले जातील...आणि निकाल महिना संपल्यावर लावला जाईल..
६) निकाला पर्यंत कविता इतरत्र प्रकाशित करू नये
७) कविता जास्तीत जास्त १२ ते १४ ओळींचीच असावी.
८) कवितेला समर्पक शिर्षक असावे........
९) कविता इथेच प्रतिसादामधेच टाकावी..
.

.चला मग करुया सुरुवात ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

?

प्रकाशचित्रः जिप्सी तर्फे"
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

'स्मरणपलिते'

सांज जाळते फुलांचे
दारी दिवसाच्या तेज
ऊन सुगंधी शरांची
झाडाखाली महाशेज

निळ्या आकांताने गेला
पिल्ला पाखरांचा ठाव
वसवला उजाडूनी
दृष्टीपल्याडचा गाव

वर्ख सोनेरी साचतो
कनकाची होय माती
काळ्या पहाडी नभाची
आरशांनी भरे छाती

इडापीडा पाठवावी
दारावेशीच्या बाहेर
दानी पुढच्या पिढीला
द्यावे निर्व्याज माहेर

सांज वेचताना यावे
जग जिव्हाळी धुळीत
दिव्यामध्ये स्मरणाच्या
उभ्या जन्माचे पलित

शशांकदादा, अमेयजींना ’तिथे ’उन’ हा शब्द तापलेले, गरम, तप्त या अर्थाने वापरायचा आहे. मस्त कविता, आवडलीच Happy

अमेय, कविता छान वाटली.

फक्त,
"निळ्या आकांताने गेला
पिल्ला पाखरांचा ठाव" या ओळींतील 'ठाव' हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे ते लक्षात आले नाही.

प्रकाशचित्रः जिप्सी तर्फे"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
'सांजवेध'

कशी कुठून अवेळी इथे उगवली सांज
बघ दुरून वेडावे कशी सागराची गाज
माझ्या मनातला दिस आहे अजून भरात
सख्या साथीने क्षितीज चल गाठूयात आज!

किती झेलले बहर किती वेचले चांदणे
कसे लोटत्या काळाने केले वेड्याचे शहाणे
सारे ऋतू पेलताना असे शहाणे होताना
तळी जपलेले वेडेपण आठवावे आज...
सख्या साथीने क्षितीज चल गाठूयात आज!

दिस ढळेल तरिही... रात होईल तरिही...
उद्या कदाचित माझी मीही नसेन तरिही...
जिथे येऊन भेटली होती तुझी माझी वाट
पुन्हा एकदा तिथेच भेटू देऊनी आवाज...
सख्या साथीने क्षितीज चल गाठूयात आज!

२) प्रकाशचित्रः जिप्सी (योगेश) तर्फे

------

पहाट, मध्यांन्न, सांज वेळ
सगळा आखीव रेखीव खेळ
आता पर्यंत होता प्रवाही
श्रम, धावपळ आता नाही

दूर राहिले सखे सोबती
कुणी न आता उरे भोवती
मागे वळूनी कशास पहाणे
आठवाचे उरले गाणे

सुर्यही थकला
पश्चिमी झुकला
आता सलतो एकच काटा
मागे रहाणार कोण एकटा?

सर्वांचे आभार

उल्हास, मला ठाव हा शब्द 'ठाव-ठिकाणा' या अर्थी (केवळ पिल्ले दूर गेली असेच नव्हे तर त्यांची ओळख, संदर्भही दूर गेले, आता त्यांना आपला काही ठाव इथे आहे असे वाटत नाही.... यासाठी) वापरायचा आहे..

मुग्धमानसी आणि जो_एस, कविता खूप आवडल्या

"प्रकाशचित्रः जिप्सी तर्फे"
---------------------------------------------------------------
"सांजवेडी"

एक हरवली सांज तुझ्यात
गहिवरला तो क्षण क्षणात
ती वेळच होती ऐन भरात
जग हरवले मी तुझ्यात

ती सांजवेडी तुझ्यासारखी
आहे दिनरात्रीशी पारखी
असते ती तिच्याच भरात
जशी असते तू तुझ्यात

सांजेसवे होऊन सारे दंग
क्षितीजावरी दाटले रंग
तुझ्यासवे बेभान क्षणात
मी हरपले भान तुझ्यात

अलवार कोवळे तिचे वय
तशी कोवळीच तू दिली सय
आठवणींच्या ह्या सागरात
चिंब मी भिजलो नखशिखांत

हे काय सगळे फक्त जिप्सीच्याच प्रचि वर कविता काय करताहेत...म्हणून मग माझी कविता (?) शागंच्या प्रचि वर (मग ती 'त ला थ' टाईप वाईट का असेना, अजून कविता या प्रचि वर आल्या की खोडून टाकू)

१) प्रकाशचित्रः शापित गंधर्व ( धीरज ) तर्फे

मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज की घंगरू तुटले रे! च्या चालीवर....:)

हातात गुंफूनी हात,
तू देशील जर का साथ,
करू आपण गं वहीवाट, बिकट या वाटेची...

असूदे चढ वा उतार,
न कधीही मानूनी हार,
चल करुया डोंगर पार, दे साथ तू मोलाची....

प्रकाशचित्रः शापित गंधर्व तर्फे
--------------------------------------------------------------------------------------------
वाट आपली

हातात गुंफुन हात जरासे
सोनेरी क्षण आठवून पाहू
चाकोरी सोडून देऊ अन्
वाट आपली शोधून पाहू

पुन्हा नव्याने वेचू रंग
जगात आपल्या होऊ दंग
तुझे नी माझे छोटेसे घर
या वळणावर बांधून पाहू

असोत चढ वा उतार आता
वा वळणावळणांचा रस्ता
एकदुजांच्या साथीने चल
नशीबालाही हरवून पाहू

प्रकाशचित्रः शापित गंधर्व ( धीरज ) तर्फे

साथ
----------------------------------------------------------

हवा तुझा हातात हात
बघण्या नवस्वप्नांची पहाट
देशील का मजला साथ
सोडून ही नित्य वहिवाट

तृणे गाती मंजुळ गान
बहरली सृष्टी टाकून कात
नाही खडूने निर्जिव खडकात
कोरले नाव तुझे ह्रदयात

असो डोंगरमाथा वा उतार
ठेव अढळ तू विश्वास
जरी असेल आज अंधार
दिसेल क्षितीजावर सुर्यप्रकाश

सगळ्याच कविता मस्त.. अमेय, मुग्धमानसी, कमालीची सुरुवात करून वेगळ्याच उंचीवर नेलीत स्पर्धा.

छान........
.
.
.
इतर माबोकरांनी सुध्दा कविता कराव्यात..:) ही विनंती

धन्यवाद सर्वांना! सगळयाच छान छान कविता आल्या आहेत. मी अजून एक कविता टाकू इच्छिते...

प्रकाशचित्रः शापित गंधर्व तर्फे
--------------------------------------------------------------------------------------------

'प्रवास'

रंग सांडले सांडले
दिशा झाल्या रे रंगीत
सारे नभ गाई गाणे
श्वास बनले संगीत

तुझे येणे असे झाले
जशी कविता सुचावी
आणि क्षणातच माझी
सृष्टी सुगंधून जावी

हात घेऊनी हातात
सांग काय बोलायचे?
दोन हात दोन डोळे
एक मन तोलायचे!

चल टाळू पायवाटा
आखू निराळा प्रवास
नको मळल्या रस्त्यांना
ओल्या स्वप्नांचा हा त्रास!!!

Pages